सफर जुन्नरची

सह्याद्रीच्या वारकऱ्यांना ह्या बुलंद , बेलाग साह्यकड्यांची वारी करायला फक्त निम्मित लागते मग ऊन , वारा , पाऊस काहीही असो भटक्यांना त्याची फिकीर नसते कारण ह्या वारकऱ्यांना सह्याद्री अन सह्याद्रीचा मुकुटमणी शोभणारे गडकिल्ले सतत खुणावत असतात . मग आमच्या परिवाराची कार्टी तरी याला कसा अपवाद राहतील . आमचं तर असय , जसं एखादा कार्यक्रम करणारे कलाकार तारखा धरतात तसंच काहीसं वर्षातल्या काही तारखा आम्ही धरून ठेवल्यात . प्रजासत्ताक दिन , ६ जून शिवराज्याभिषेक सोहळा , स्वातंत्र्य दिन अन वर्षाचा शेवट याव्यतिरिक्त इतर दिवशीही भटकंती चालूच असते म्हणा पण गेली ३ - ४ वर्षे जो काही सह्याद्री पालथा घातला त्यात आमच्या या ठरलेल्या तारखांच्या मोहीमा आजपर्यंत कधी चुकल्या नाहीत अन त्या कधी चुकणार हि नाहीत . त्याच कारण लिहीत गेलो तर त्यावर एक वेगळा ब्लॉग होईल आणि तो होणारच आहे . त्यामुळेच दरवर्षी प्रमाणे यंदाही वर्षाचा शेवट अन सुरुवात गडावरूनच होणार . त्यात जोडून सुट्ट्या आल्यात म्हंटल्य...