आमचं राजं छत्रपती झालं...!



हिंदुस्थानच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक. विजयनगर व देवगिरीचे साम्राज्य लोप पावल्यानंतर मध्ययुगीन भारतात या भारतभूमीवर परकीयांनी उच्छाद मांडला होता तेव्हा उत्तरेकडील राजे महाराजे या परकीयांचे मांडलिक बनून त्यांची सेवा करण्यात आपली धन्यता मानीत होते त्यावेळी महाराष्ट्रात या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्याचा अग्नी पेट घेत होता. शहाजी राजांनी स्वराज्याचा पाया रचला पण त्यांना काही ठिकाणी अपयशाला सामोरे जावे लागले. स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराजसाहेब व सतत या स्वराज्याची मायमाऊली बनून राहिलेल्या स्वराज्यप्रेरिका जिजाऊ माँसाहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या शिवसुर्याने, अंधकारात होरपळून गेलेल्या या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवत इथल्या रयतेवर मायेचं छत्र धरलं अन रयतेचे राजे, रयतेचे छत्रपती झाले.


रायरेश्वरी शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली व तोरणा गडी स्वराज्याचं पहिलं रोपटं लावलं. शिवरायांनी ह्या स्वराज्याच्या रोपट्याचं बीज इथल्या गोरगरीब रयतेच्या मनात पेरलं, हे स्वतंत्र राज्याचं रोपटं वाढविण्यासाठी शिवरायांनी साऱ्या बारा बलुतेदार,अठरापगड जाती जमातींना एकत्रित केले. तोरणा गडी लावलेलं हे रोपटं सह्याद्रीच्या आश्रयाने बेलाग, बुलंद गडदुर्गांच्या अंगाखांद्यावर एक एक करीत साऱ्या गडकोटांवर ही रोपटी वाढू लागली. शिवरायांनी लावलेल्या या स्वराज्यरूपी रोपट्याला अनेक स्वराज्यावीरांनी आपल्या रक्ताचं पाणी करून वाढवलं तर अनेकांनी रणांगणी पराक्रम गाजवत हि मायभू स्वतंत्र करण्यासाठी आपले प्राण त्यागले. डोंगर दऱ्यांत वाढलेलं स्वराज्य सागरावरही अधिराज्य गाजवू लागलं. विजापूरचा आदिलशहा, दिल्लीचा औरंगजेब, जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचा पोर्तुगीज, मुंबईचा इंग्रज या साऱ्या पातशाह्यांना, फिरंग्यांना झुंज देत देत शिवरायांनी हे स्वराज्य उभारलं व त्याचा विस्तार केला. अविश्रांत श्रम आणि त्याग केल्यानंतरच राज्याभिषेकाचा विचार रायगडावर अंकुरला.

स्वराज्याच्या या स्वतंत्र, सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने शिवरायांनी राज्याभिषेकास मान्यता दिली. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई होन हि नाणी चलनात आणली. पूर्वीची फारसी पद्धतीची लेखनपद्धती बदलून संस्कृत लेखनपद्धती विकसित करून लेखनप्रशस्ती, राज्यव्यवहारकोष हे मराठीतील ग्रंथ निर्माण करून घेतले. राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला ६ जून १६७४ शिवराय चक्रवर्ती आता छत्रपती होणार.



जसा राज्याभिषेक जवळ येऊ लागला तशी रायगडाहून देशो देशी आवताण धाडली जाऊ लागली. बारा महाल अठरा कारखान्यात या आनंदमय सोहळ्याची लगबग सुरु झाली. सारी रयत आमचा राजा छत्रपती होतोय या आनंदात नाहून गेली अन हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी रायगड जवळ करू लागली. रायगड शौर्याच्या या काळ्या पाषाणावर आनंदाला उधाण आलं. राजधानी सजू लागली, या सोहळ्याला शिरकाई अन जगदीश्वराच्या रूपानं जणू देवलोकीचे देव रायगडी अवतरले. महादरवाजा, चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, वाघ दरवाजा स्वर्गलोकीची प्रवेशद्वारं शोभणाऱ्या या दरवाजांना फुला नारळांची तोरणं चढली. राजधानीची शोभा वाढवत मनोरे दिमाखात उभे होते. नगारखान्यात वाजणाऱ्या वाद्यांनी ताल धरत आसमंत दणाणून सोडला. गंगासागर, कुर्शावत आनंदाने ओसंडून वाहत होते. होळीच्या माळावर मर्दानी खेळांना रंग चढला, बाजारपेठ सजली, टाकमकीवरून घोंगावणारा वारा चारही दिशांना होऊ घातलेल्या सोहळ्याची ग्वाही देत होता. राजदरबार पै-पाहुण्यांनी फुलून गेला. राजसदरेवर सुवर्णसिंहासन सजलं. सप्तगंगा आपल्या राजाला अभिषेक घालण्यास आतुर झाल्या. गागाभट्टांच्या मंत्र उच्चाराने सारा रायगड मंत्रमुग्ध झाला.



स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराज साहेबांनी केलेला स्वराज्य संकल्प आपल्या पुत्राच्या हातून पुरा होताना स्वराज्य प्रेरिका जिजाऊ माँसाहेब आनंदाने पहात होत्या अन तो दिवस उजाडला तीनशे वर्षांचा पारतंत्र्याचा काळोख बाजूला सारून रायगडी सार्वभौम राज्याचा सूर्योदय झाला. सदरेवरच्या राजसिंहासनाकडे महाराजांची पाऊले पडू लागली तर इकडे गारदी देहभान विसरून आपल्या राजाची गारद देऊ लागला, आस्ते कदम...आस्ते कदम... आस्ते कदम...महाराज गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित राजश्रीया विराजीत सकलगुणमंडित न्यायालंकारमंडित अखंडलक्ष्मीअलंकृत शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज श्रीमंत राजा शिवछत्रपती कि जय...! 


आज रायगडी झालेला हा शिवछत्रपतींचा जयघोष दिल्लीपतीच्या तख्ताला हदरावुन सोडणारा होता. मराठ्यांची पोरं आजवर सरदार पुत्र म्हणून ओळखली जायची आमचं धाकलं धनी शंभूराजं आज स्वराज्याचं पहिले युवराज झालं. पारतंत्र्याच्या जोखडात अडकून पडलेल्या महाराष्ट्रानं आज स्वातंत्र्याकडं झेप घेतली हि झेप पुढे गरुड झेप झाली मराठ्यांच्या विजयाचा वारू अटक पावतो जाऊन पोहचला म्हणूनच हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा शिवा, बाजी, तानाजी, सूर्याजी सारख्या अश्या कैक स्वराज्यविरांच्या बलिदानपूर्तीचा, हा सोहळा भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाचा, हा सोहळा महाराष्ट्र अस्मिता जागविणारा, हा सोहळा रयतेवर मायचे छत्र धारण करणाऱ्या राजांचा. गावोगावी साखऱ्या वाटल्या जाऊ लागल्या, तोफांची सरबत्ती झाडली गेली, नौबती झडू लागल्या, ह्या स्वराज्यचे ह्रदय असलेल्या साऱ्या गडकोटांवर मावळ्यांनी जल्लोष केला. रायगडाच्या उगवतीला दिमाखात उभा असलेला, २५ वर्षे महाराजांचा सहवास लाभलेला स्वराज्याच्या सुखदुःखांचा सोबती दुर्गराज राजगड आनंदाने हा सोहळा बघत होता तर तिकडं सागराला आलेलं उधाण त्यात उसळणाऱ्या लाटा शिवलंका सिंधुदुर्ग हसत हसत आपल्या कवेत घेत होता. आज या सोहळ्याने दुर्गदुर्गेश्वर रायगड सुद्धा तृप्त झाला. स्वतंत्र सार्वभौम राज्याचे राजे छत्रपती झाले हा आनंदोत्सव रयतोत्सव झाला.


जून उजाडला की आम्हा भटक्यांच्या काळजात वाजणारी ६ जूनची धून अन रायगड भेटीची ओढ यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळं रहित झाली, यंदा रायगडी मुजऱ्यास स्वतः जाऊ शकत नसलो तरी आमचं मन मात्र रायगडीच राहणार. रायगडावर जल्लोषात होणारा हा स्वराज्यत्सोव यंदा प्रत्येक घराघरात साजरा होणार. एकदा का हा करोना उरकला कि रायगडी वसलेल्या धन्याला तीन हात मुजरा घालून पुन्हा एकदा त्याच उत्सहात जिवलगांसोबत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर इतिहासाचा जागर करत सध्या पॉज झालेली वारी गडकोटांचीच्या परिवाराची गडकिल्ल्यांची वारी पुन्हा त्याच जोशात प्ले करू. 

 - महेश निलंगेकर 


Comments

Popular posts from this blog

रणसंग्राम फोंड्याचा, किल्ले फोंडा, गोवा

संडे भटकंतीनामा - ऐतिहासिक सासवड नगरी व सरदार पानसे वाडा