मागेच रविवारी
राहून गेलेला ढवळगड व दौलतमंगळ (भुलेश्वर मंदिर) केला व गेला रविवार कानिफनाथच्या समोर
असलेला मिनी केंजळगड करून आलो होतो. शनिवारी रात्री विक्याला फोन केला," हा जाऊ
रे उद्या" कुठं जायचं ते सकाळी भेटल्यावर ऑन द स्पॉट ठरणार होतं. सकाळी सहाला
विक्याला गाठलं अन कुठं जायचं ठरवू लागलो पाउसामुळं वडकीतून ज्वाला मारुतीची वाट धरन
सोयीचं न्हवतं तर कानिफनाथला "ट्रॅकिंग" वाल्यांची गर्दी वाढत होती त्यामुळं
रविवारसाठी नवीन नवीन ठिकाण शोधू लागलो. हि
दर रविवारची भटकंती म्हणजे मोठ्या ट्रेकसाठी ठरलेल्या तारखांपैकी पुढची तारीख येईपर्यंत
पुरणारं टॉनिक म्हणजे संडे भटकंती. आज सासवड नगरी फिरायचं ठरलं. तसेच वेळ मिळाला तर
जाता जाता सोनोरी गावात असलेला सरदार पानसे यांचा वाडा पहायचा होता.

पुर्वी इथं
सहा वाडया होत्या कालांतराने त्याचे गावात रुपांतर झाले.
वटेश्वरापाशी ‘वरखेडवाडी’, सिद्धेश्वरपाशी ‘सरडी’, सदतेहे बोरीचे पटांगण, ‘संवत्सर गांव’ सोपानदेवापाशी, ‘दाणे पिंपळगाव’ टाकमाई मंदीरापाशी, जुन्या भैरवनाथाजवळ ‘सनवडी’ जसा काळ बदलत गेले तसं या वाड्यांचे स्वरूप व विस्तार बदलून त्याचे सासवड गावात रुपांतर झाले म्हणुन सासवड अशी अख्यायिका
आहे. जाताना हिरवळीने नटू पाहणारा आमचा वडकीचा मिनी केंजळगड दिसत होता तर मागे धुक्यात
हरवलेलं कानिफनाथ मंदिर दिवे घाट सर करताना ज्वाला मारुतीचं देऊळ दिसत होत. घाटावर
आलो तर लांबवर धुक्यातून डोकावणारा मल्हारगडचा तट दिसत होता. सासवडपासून जवळच नारायपूर
रोडवर चांगावटेश्वर मंदिर आहे. चांगदेव महाराज इथे साधनेला बसले होते त्यांनी पूजेसाठी
मातीच्या गोळ्याचे लिंग बनविले होते व पुढे त्याचे रूपांतर स्वयंभूलिंगामध्ये झाले
त्यामुळे या मंदिरास चांगावटेश्वर नाव पडले. सण १७०० साली सरदार आबाजीपंत पुरंदरे यांनी
मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिर पुर्वाभिमुखी असून मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम
अप्रतिम आहे, तीस चौकोनी अखंड पाषाण स्तंभावर सभामंडपात उभा आहे. प्रवेशद्वारावरील
स्तंभावर तपस्वी, दधि-मंथन करणारी स्त्री, गरुड, युगुल, लढत असलेले मल्ल, तीन नर्तकी
असे शिल्प कोरलेले आहे. तसे कमल पुष्पे, शृंखलांच्या माला, नृत्यांगना यांचे सुबक व
कोरीव काम केलेले दिसते.
 |
चांगावटेश्वर मंदिर
|
मानवी जीवनाच्या निरनिराळ्या प्रसंगातील भावनांचा उत्कृष्ट
रसाविष्कार करण्याच्या नयनरम्य कलाकृती विविध प्राणी गेंडा, अश्व, व्याघ्र, यांच्या स्तंभावरील शिल्पकला इथं पहायला मिळतात. सभामंडपाच्या मध्यभागी मोठा व
देखणा नंदी असून त्यावर नंदीच्या गळ्यातील माळा, घंटा तसेच विविध अलंकार कोरलेले
आहेत. गर्भगृहात प्रवेश करताना पायरीवर खालच्या बाजूला कीर्तिमुख तर वर कोरलरली गणेश
मूर्ती पहायला मिळते. गर्भगृहात महादेवाची सुंदर पिंड आहे तिचे दर्शन घेऊन मंदिर परिसर
पाहण्यासाठी निघालो. एखादा कोट असल्याप्रमाणे मंदिराला तटबंदी आहे.
 |
स्तंभावर कोरलेलं शरभ शिल्प
|
 |
नर्तकी शिल्प
|
दहा ते बारा फुटांचं
दगडी बांधकाम व त्यावर त्याच उंचीचे विटांचे बांधकाम आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला
बंधारा आहे बंधारा ओसंडून वाहत होता तिथं थोडं पावसाळी फोटो सेशन करून आम्ही संगमेश्वर
मंदिररकडे निघालो. कऱ्हा व भोगावती (चांबळी) या नद्यांच्या संगमतीरी संगमेश्वर मंदिर
वसलं आहे. पशेवेकालीन असलेलं हे मंदिर त्याची स्थापत्य कला व बांधकाम शैली पाहण्यासारखी
आहे. घडीव पायऱ्या चढून वर आल्यानंतर प्रथम लागतो तो नंदीमंडप अन त्यात असेलेला शिल्पांकित
नंदी. नंदीमंडपातुन सभामंडपात प्रवेश करतेवेळी डाव्या हाताला देवडीत शेंदूर लावलेली
गणरायाची मूर्ती आहे तर उजव्या हनुमंताची. मंडपाच्या केंद्रस्थानी दगडी कासव कोरलेले
आहे. मंडपात दक्षिणोत्तर दोन प्रवेशद्वारे आहेत.
 |
संगमेश्वर मंदिर |
मंडपातील स्तंभावर जयविजय मूर्ती कोरलेल्या
दिसतात. गर्भगाराच्या दगडी चौकटीवर व त्याशेजारील स्तंभावर वेलबुट्ट्यांचे मनोहर नाजूक
नक्षीकाम आहे.पाऊस चांगला झाल्यानं कऱ्हामाई ओसंडून वाहत होती अन समोर धुक्याची चादर
घेऊन पहुडलेला पुरंदर दिसत होता. संगमेश्वर मंदिराकडून परतत असताना वाटेत सरदार गोदाजी
जगताप यांची समाधी लागते. गोदाजी जगताप म्हणजे खळद बेलसरला झालेल्या स्वराज्याच्या
पहिल्या लढाईत रणांगण गाजवणारे स्वराज्यवीर त्यांची हि समाधी. मायभूमी शत्रूच्या जाचातून
मुक्त करण्यासाठी लढलेल्या या शूरवीरांच्या अडगळीत पडलेल्या समाधीवर आज झाड झुडपं वाढता
आहेत तर दुसरीकड गोदाजी जगताप यांच्या समाधीच्या अलीकडेच पेशवा बाळाजी विशवनाथ भट याची
समाधी आहे तिथं मात्र उद्यानात यथोचित स्मारक पहायला मिळतं दोन्ही शूरवीरच मग स्मारकाकडे
दुर्लक्ष का याच वाईट वाटत.
 |
सरदार गोदाजी जगताप यांची समाधी
|
समाधीचं दर्शन घेऊन पुढे सासवडच्या गल्ली बोळांमधून निघालो.
पुढे सोपानकाका मंदिराकडे जाताना गावात असलेलले जुने वाडे दिसतात काही वाड्यांची पडझड
झाली आहे तर काहींनी जुन्या
वाड्याचे अवशेष तसेच ठेवून नवीन बांधकाम केलं आहे. ग्रामदैवत भैरवनाथाचं दर्शन घेऊन सिद्धेश्वर मंदिर व सोपानकाका मंदिर पुढच्या खेपला करायचं ठरलं अन पाहून बाजी पासलकरांच्या
समाधी कडे निघालो. स्वराज्याचे पहिले सरसेनापती होण्याचा मान बाजी पासलकर यांना मिळाला.थोरले
महाराजसाहेब शहजी महाराजांनी बंगळूरहून पुण्यालाजी मंडळी पाठवली होती त्यात बाजी पासलकरांच
नाव अग्रस्थानी होतं. बाल शिवबाला सह्याद्री व बार मावळ यांची ओळख बाजी पासलकरांनी
करून दिली. बाजी खळद बेलसरच्या लढाईत फतेखानला धूळ चारत बेलसरच्या रणमैदानात पराक्रम गाजवून
गेले. बाजींच्या समाधीचं दर्शन घेऊन तिथंच शेजारी राहणाऱ्या मित्राची भेटगाठ घेऊन सोनोरीकडं
निघालो.
 |
पानसे वाडा प्रवेशद्वार |
सरदार पानसे पेशव्यांच्या
तोफखाण्याचे प्रमुख होते. इ.स. १७५७ ते १७६० या काळात पानसे यांनी मल्हारगड बांधला.
मल्हारगड, महाराष्ट्रात सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला आहे. दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी
मल्हारगडाची निर्मिती केली गेली. मल्हारगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सोनोरी गावात पानसे
यांचा वाडा आहे. सोनोरी गावात शिरताच दोन भरभक्कम बुरुजात बांधलेलं प्रवेशद्वार नजरेस
पडत व त्याला लागून असलेली तटबंदी. वाडयात गजाननाचे व लक्ष्मीनारायणाचे सुंदर मंदिर
आहे. सभामंडपातून गाभाऱ्याकडे जाताना देवडीत रथावर आरूढ असणाऱ्या देवतेचं शिल्प पहायला
मिळतं.
 |
लक्ष्मीनारायण मंदिर
|
हि देवता म्हणजे सूर्यदेव. वेदांमध्ये सूर्यला आत्मा म्हंटले आहे तर यजुर्वेदामध्ये
चक्षो सूर्यो जायत म्हणजे भगवंताचे डोळे. वेदकाळात प्रथम मंत्रा द्वारे सूर्याची पूजा
केली जात असे यानंतर मूर्ती व त्यानंतर सूर्याची
मंदिरे बांधली गेली. पुराणात सूर्य हा ऋषी कश्यप व आदितीचा पुत्र म्हणून उल्लेख आहे. सूर्याला
छाया व सज्ञा या दोन पत्नी आहेत. शनी,यम, अश्विन कुमार व यमुना नदी व महाभारत मधील
कर्ण हे सूर्याचे पुत्र पुत्री आहेत. सूर्याच्या मूर्तीचे दोन प्रकार पहायला मिळतात
एक रथावर आरूढ असलेली सूर्यदेवाची मूर्ती तर दुसरा दोन्ही हातात कमळ घेतलेली मूर्ती.
या मंदिरात रथावर आरूढ असलेली मूर्ती आहे. ज्यात रथाला सात घोडे व सारथी अरुण तर एक
हात मुद्रेत व दुसऱ्या हातात कमंडलू असलेले ध्यानस्थ सूर्यदेव आहेत.
 |
सूर्यदेव
|
मंदिर पाहून मंदिराच्या
मागे असलेल्या प्रवेशद्वाराने आत गेलो. तिथं काही खोल्या दिसल्या, आतमध्ये एक आज्जी होत्या
आम्हाला वाटलं असंच आल्या असतील पण या आजी इथंच वास्तव्याला आहेत त्यांना विचारून आतमध्ये
गेलो. आत बऱ्यापैकी बांधकाम शिल्लक आहे. दगडीतळखडे व त्यावर लाकडी खांब लावून छत उभारलं
आहे. तिथेच कारंज सुद्धा आहे. उजव्या हाताला तीन खोल्या आहेत त्यांना कुलुपं होती तर
डाव्या हाताला एक खोली आहे तिथं या आज्जी रहात असत. आजींसोबत गप्पा मारत काही काळ तिथंच
थांबलो. ह्या वाड्यात या आज्जी एकट्या राहत होत्या तर बाकीचे कुटुंबीय सगळे पुण्यात
रहायला होते.
 |
पानसे वाडा
|
आपल्या पूर्वजांचा वारसा सांभाळत या अज्जी इथच रहात होत्या पण ह्या पडक्या वाड्यात एकटं राहणं थोडं हॉररच वाटत होत. सहा बुरुजांची तट
बंदी असलेला हा वाडा झाडी झुडपांनी वेढलेला आहे, काही ठिकाणची तटबंदी ढासळलेली आहे.
वाड्याकडे सहसा कोणी फिरकत नाही त्यामुळं हा वाडा दुर्लक्षित आहे. वाड्यापासून थोडं
पुढं एक बारव आहे. जुन्या काळात बांधलेली दगडी बारव आहे. पाणी उपसणायसाठी इथे अगोदर मोट होती त्याचे अवशेष पहायला मिळतात. गावकरी पिण्यासाठी इथल्याच
पाण्याचा पाण्याचा वापर करतात. दहा
वाजत आले होते रविवारी सुद्धा आम्हाला टाईम लिमिट असल्यानं सकाळी १० पर्यंत सगळं उरकत
घेऊन निघालो. आज सासवड मधील पुरातन मंदिर व पानसे यांचा वाडा झाला.
 |
बारव
|
सासवड नगरी म्हणजे
निसर्गसौंदर्यानी, ऐतिहासिक वास्तूनीं, साहित्यकांच्या लेखणीनं, स्वातंत्र्यवीरांच्या
पराक्रमाने नटलेली प्राचीन नगरी म्हणजे सासवड. रविवारी बाहेर नाही पडलं तर पुढचा आठवडाभर
काही तर राहून गेल्यासारखं वाटत राहतं त्यामुळं दिवस सार्थकी लागल्याचं समाधान घेऊन
पुढच्या रविवारची वाट बघत घराकडं निघालॊ, असा हा विक्याचा व माझा संडे भटकंतीनामा.
भटकंती दिनांक
२८/०७/२०१९
सासवड मधील पुरातन मंदिरे व पानसे वाडा
 |
चांगावटेश्वर मंदिराचा कोट
|
 |
चांगावटेश्वर मंदिरातील नंदी
|
 |
संथ वाहते कऱ्हामाई
|
 |
गणराय
|
 |
पानसे वाडा
|
 |
बुरुज व त्याला लागून असलेली तटबंदी
|
Khup chan
ReplyDelete