जावं सह्याद्रीत...!
सह्याद्री
म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आणि इथले गडकिल्ले म्हणजे त्या विद्यापीठातील विषय. सह्याद्रीच्या
या दऱ्या खोऱ्यात पाऊल पडलं कि आपसूकच हे विद्यापीठ आपल्याशी बोलू लागत अन इथले विषय
असलेले गडकिल्ले इथं घडलेल्या इतिहासातून प्रेरणा देत आलेल्या आव्हानांना कसं सामोरं
जायचं यासोबत आयुष्य जगण्याची कला शिकवतात. जावं त्या सह्याद्रीच्या कुशीत धरावी ती
गडाची आडरानातली अनवट वाट अनुभवावी ती पाय जड करणारी चढण. जावं सह्याद्रीत त्या कडेकपारीतून
घुमणारा शिवनामाचा गजर ऐकून व्हावं तृप्त. जावं सह्याद्रीत त्या बेलाग कातळ कड्यांशी
सलगी करायला अनुभवावा त्या राकट कड्यांमधून ओघळणारा मायेचा पाझर. जावं सह्याद्रीत पहावी
ती सूर्यनारायणान सूर्योदय अन सूर्यास्ताला मुक्त हस्ते केलेली रंगांची उधळण. जावं
सह्याद्रीत कराव्यात गुजगोष्टी सह्याद्रीचा अनमोल दागिना असणाऱ्या त्या गडकोटांसोबत.
कधी काळी गजबजून गेलेला गड आज ओस पडलाय गडावर गेल्यावर इथं घडलेल्या इतिहासाशी एकरूप
झालं कि हेच ओस पडलेले दगड धोंडे आपल्याशी बोलू लागतात. गडावर गेल्यावर ठेवावा माथा
त्या महाद्वाराच्या पायरीवर मायबाप जाणत्या राजाच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती
झडू द्यावी आपल्या भाळी. कधी लावलाच कान स्वर्गाचं दार शोभणाऱ्या त्या महादरवाज्याला
तर स्वराज्याच्या विजयी बातम्यांनी झडलेल्या नौबती अन गडावरील आनंदी वार्तांनी वाजलेले
सनईचौघडे ऐकू येऊ लागतात तर कधी ढाली अन तलवारीचा संबळ कानी येऊ लागतो. नारळ फुलांनी
सजलेली तोरणं पाहून चालतं व्हावं गडावर.
तटाला असलेल्या फांजी वरून भोवतालचा गड डोळ्याखाली
घालत चालू करावी गडफेरी. वाटेत काही वास्तू, सैनिकांच्या राहुट्यांचे अवशेष तर सरदार
सचिवांच्या वाड्यांचे असवशेष दिसतील आज इथं नुसतं गवत माजलं असलं तरी कधी काळी याच
वास्तूंसमोर मांडलेल्या रांगोळ्या दिसू लागतील. सदरेवर गेल्यावर आज छप्पर उडून गेलेली
जोती व तळखडे दिसतील पण हेच तळखडे शिवकाळात सदरेवर चालणारा राज्यकारभार,न्यायनिवाडे
नजरेसमोर उभा करतात. चालता चालता जावं गडदेवतांच्या दर्शनाला कुठल्या गडावर या गडदेवतांच्या
देवळांचा जीर्णोद्धार झाला तर कुठल्या गडावर हेच गडदैवत कुठं तर आड पडलेले दिसतात त्यात
कातळात कोरलेला शक्तीचं प्रतिक असणारा हनुमंतराया तर विद्येची देवता असणारा गणराज दिसतो
तर कुठं, मावळ्यांना हर हर महादेव या एका गर्जनेनं दहा हत्तीचं बळ देणारा शंभू महादेव
दिसतो. वेगवेगळ्या रुपात पहायला मिळणाऱ्या सगळ्या देवता प्रत्येक गडावर पहायला
मिळतात त्यामुळं ह्या भटक्यांना मंदिरात जाऊन गर्दी करायची वेळ नाही. आली आज गडांवर
ऊन, वारा, पाऊस झेलत अनके राजवटी पाहिलेले गडदेवता आज आपले ऐतिहासिक अस्तित्व टिकवून
आहेत.
चालताना दिसेल डौलानं फडकणाऱ्या भगव्याची ढालकाठी त्या स्वरज्य निशाणाला अन परकीयांपासून
हि मायभूमी स्वत्रंत ठेवण्यासाठी या मातीला रक्ताचा अभिषेक घालणाऱ्या शूरवीरांच्या
पराक्रमाच्या अखंड परंपरेला तीन हात मुजरा करून व्हावं धन्य. गडफेरी मारताना तहान लागल्यावर
करावी वाट वाकडी अन जावं कातळ फोडून त्याच्या पोटात खोदलेले बाराही महिने पाणी असणाऱ्या
तलाव टाक्यातल थंडगार पाणी प्यावं अन यावं पुन्हा त्याच वाटेवर चालताना काही ठिकाणी
ढासळलेली तटबंदी दिसले पण जरा निरखून बघितलंच तर त्याच ताटाला बिलगून छातीचा कोट करून
लढणारे मावळे दिसतील अन मग जाणीव होईल कि आज हा तट का ढासळलेला दिसतोय. ताटाला जागोजागी
बुरुज दिसतील त्यातले काही पडले असतील पण आज सुद्धा हे बुरुज आपल्या राजाच्या एक आदेशावर
गनिमावर तोफा डागायला सज्ज आहेत. या गडकोटांच्या सहवासात गेलं कि ढासळलेले तट, बुरुज,
माना टाकलेल्या कमानी हि सांगू लागतील मावळ्यांच्या पराक्रमाच्या गाथा.
गडफेरी झाल्यावर
धरावी गगनाला भिडणाऱ्या त्या बालेकिल्ल्याची वाट. बालेकिल्ल्याच्या त्या दरवाजात उभं
राहून घ्यावा येणारा वारा अंगावर अन निघावं राजवाड्याकडं. आज फक्त उरलेले राजवाड्याचे
उरलेले चौथरे पहायला मिळतील पण हेच चौथरे एके काळचं गडाचं वैभव, ऐशवर्य डोळ्यांसमोर
उभं करतात. त्याच बालेकिल्यावरून सह्याद्रीचा आसमंत अन आभाळाशी स्पर्धा करणारी डोंगररांग
डोळ्यांत साठवत मावळतीला जाणाऱ्या सूर्यनारायणाला नमस्कार करत परतीची वाट धरावी. गड
म्हणजे फक्त उंच डोंगरावर बांधलेलं दगड धोंड्याची बांधकाम न्हवेत तर याच दगड धोंड्यात
जीव ओतून उभा केलेला छत्रपती शिवरायांचा अभियांत्रिकी अविष्कार म्हणजे हे गडकिल्ले.
जसे प्रजेच्या रक्षणार्थ रजा तसेच या भूमीच्या रक्षणार्थ हे दुर्ग. त्यामुळंच जावं
सह्याद्रीत ढासळलेल्या गडकोटांकडून कठीण काळात सुद्धा आपल्या अस्तित्वाची लढाई कशी
जिंकावी याची शिकवण घ्यावी. जावं सह्याद्रीत त्याच्या रहाळात चालणाऱ्या अन मनानं श्रीमंत
असणाऱ्या गावगाड्यातून जगण्याची कला अंगीकारावी. जावं सह्याद्रीत पहावा त्याचा अवतार
कधी उन्हात पिवळा मळवट भरून बसलेला मल्हार भासेल तर कधी हिरवी झालर पांघरून रौद्ररूप
धारण करून आपल्या माथ्यवरून अजस्त्र जलधारणांचा अभिषेक करणारा महादेव भासेल. जावं सह्याद्रीत
अन शिकावं पाठीवरच ओझं पेलत आयुष्याचा चढ कसा सर करावा. जावं सह्याद्रीत, गिरिशिखरांवर
वास करण्याऱ्या सह्याद्रीपती शोभणाऱ्या त्या स्वराज्यच्या धन्यासमोर व्हावं नतमस्तक.
जावं सह्याद्रीत निसर्गानं उधळलेला सौंदर्याचा अविष्कार पहावा. जावं सह्याद्रीत त्याच्या
साथीनं नियतीनं मांडलेला मराठ्यांच्या इतिहासाचा जागर घ्यावा जगून. या दगडात अन जंगलात
काय ठेवलंय म्हणणाऱ्यांनी चार भिंती पलीकडचं जगणं सोडून जावं कधीतरी सह्याद्रीत त्याच्यासोबत
मैत्री करायला.
Nice blog 👍 keep it up bro
ReplyDeleteKhup sundar ❤️
ReplyDelete