किल्ले घनगड


दिवाळीत एक तरी गड झालाच पाहिजे नाहीतर दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटत नाही. या दिवाळीला राजगड ते रायगड R2R करायचं ठरलं पण जसं दिवाळी जवळ येऊ लागली तसं R2R साठी सुट्ट्यांची जुळवा जुळवा करायच चालू झालं कारण कोणाला एक दिवस फक्त लक्ष्मीपूजनची सुट्टी तर कोणाला दोन दिवस सुट्ट्या अन R2R साठी तीन दिवस तर आरामात पाहिजेत त्यामुळं R2R होईल कि नाही माहित न्हवत त्यामुळं मी दुसरा प्लॅन सुद्धा तयार ठेवला होता. दिवाळीतल्या या भटकंतीला बाबा पंक्या घरी असल्यानं ते पण येणार न्हवते त्यामुळं उरलो आम्ही ४-५ जणच आणि सुट्ट्या जास्त नसल्यानं R2R ची मोहीम बाजूला ठेवावी लागली. सगळेजण सारखं या खेपला R2R नक्की करायचा म्हणत असतात पण काही ना काही कारणांनी R2R रखडतो आता त्या राजधान्यांनाच ठाऊक त्यानां जोडणारी R2R ची मोहीम केव्हा घडून येते. विक्यानं मला विचारलं, "R2R नाही मग दुसरं कुठं जायचं?" दुसरा प्लॅन तयार होता मागच्या वेळी ६ जूनला सुधागड तालुका केला होता यावेळी त्याच बाजूचे खोपोली पट्ट्यातले राहिलेले किल्ले सोनगिरी, सोंडाई, भिवगड व कोथळीगड हे किल्ले करायचं ठरलं. नेहमीप्रमाणे मी अन विक्याने बसून, मुक्कामाची जागा व कोणता किल्ला आधी घ्यायचा हा क्रम ठरवला. नेहमी प्रमाणे सगळ्यांना आवताण धाडली यावेळी फलटण सुभ्यावर असणाऱ्या आमदार साहेबांना कसं काय वेळ मिळाला काय माहित फोन लावल्यावर येतो कि म्हणाला. या वेळेस निगडी जहागिरीतली करण अर्जुनाची जोडी येणार होती. मी, शुभम, विक्या, वैभव,शशी अन स्वप्न्या असं आम्ही सहा जण निघायचं ठरलं. जायच्या दिवशी नेमकं मला काम निघाल्यामुळे सगळं गणित कोलमडलं त्यामुळं आता कसं करायचं मग सुट्ट्या तर दोनच दिवस होत्या त्यातला पण एक दिवस गेला स्वप्न्या पुण्यात आला होता मग एक दिवस तर दिवस जायचं ठरलं. एकच दिवस मग कुठं जायचं शोधू लागलो. मी विक्याला म्हंटल घनगड नायतर रायलिंग करू मग यापैकी घनगड करायचं ठरलं. सकाळी साडे-पाच सहाला निघालो. चार किल्ल्यांचा प्लॅन पुढच्यावेळे साठी राखून ठेवला अन मग एक दिवस तर दिवस घनगडच्या नावानं चांगभलं म्हणत लागलो ताम्हिणीच्या वाटला. या वेळी पाऊस चांगल्या झाल्यानं सह्याद्रीची हिरवी झालर अजूनही तशीच होती. मुळशी झाल्यानंतर दाबून वडा सांबार हाणल्यानंतर ताम्हिणी घाटाकड कूच केलं. स्वप्न्या आलाय म्हंटल्यावर गाडी शांत कसली राहतीय. आमदार साहेबांचे शेतीतल्या वेगवेगळ्या प्रयोगांपासून ते मोदी शेठ पर्यंतच्या via जुन्या ट्रेकच्या आठवणीचे किस्से असा सगळा चर्चेचा फड रंगला. किती तरी वेळा ताम्हिणी वर खाली केल्यानं, सफारीला सुद्धा सह्याद्रीच्या घाटवाटांची ओळख झाली होती विक्या फक्त स्टेरिंग धरून बसला होता. ताम्हिणी घाट चालू झाल्यावर पिंपरी गावाचा फाटा आहे तिथून घनगडला जाता येतं. फाट्यावरून पुढं गेल्यावर Independence पॉईंट आहे मागच्या वेळी अंधारबन करायला आल्यावर हे राहिलं होतं त्यामुळं तिथं थांबलो.

कुंडलिका दरी 

कुंडलिका दरीचा अद्भुत नजारा इथुंन दिसतो. सह्याद्रीत यावं तर या बेलाग कातळ कड्यांशी सलगी करायला. इथल्या दऱ्या खोऱ्यातून वाहणारा भर्राट वारा अंगावर झेलायला. कुंडलिका दरीचा माथा म्हणजे उंचच उंच कातळ कडे अन कुशीत असलेलं घनदाट जंगल. या घनदाट जंगलाचा चांगलाच अनुभव आम्ही अंधारबनच्या वेळी घेतलाय. गगनाला भिडणाऱ्या या कातळ काड्यांच्या कुशीत जिवलगांसोबत घालवलेले क्षण म्हणजे आयुष्य हेच क्षण कॅमेरात कैद करून घनगडकडं निघालो. पिंपरी गाव झाल्यानंतर सरळ न जाता डाव्या हाताची एकोलेची वाट पकडली. एकोले हे घनगडच्या पायथ्याचं गाव आहे. मागच्या वेळी सुधागडवरून घनगडच दर्शन झालं होतं. रस्त्याची हालत लईच वाईट होती त्यामुळं हळूळू जात होतो. साधारण दहाच्या आसपास एकोलेत पोहचलो. गावात गाडी लावून गडाची वाट धरली मुक्काम नसल्यानं नेहमीच वझं पाठीवर न्हवत. गावातून गडावर जायला मळलेली वाट आहे. कोरसबारस मावळात कोकणात उतरनाऱ्या घाटवाटांवर घनगड विराजमान आहे. १० मिनिटांची चढाई केल्यावर पुरातन शिवमंदिराचे अवशेष दिसतात इथून पुढं थोडं चालून गेल्यावर गारजाई देवी मंदिर लागतं.

गारजाई देवी मंदिर

मंदिरासमोर दगडी दिपमाळ व वीरगळीचे अवशेष आहेत. पायथ्या पासून गडाच्या प्रवेशद्वारा पर्यंत पोहचण्यासाठी अर्धा तास लागतो. गारजाई मंदिरापासून पुढे आल्यावर गडाचा मुख्य दरवाजा दिसतो. दोन बुरुजात बांधलेला हा दरवाजा सुस्थितीत आहे पण या प्रवेशद्वाराला लागून असलेली तटबंदी ढासळलेली आहे. प्रवेशव्दारासमोर कातळात कोरलेली गुहा आहे. प्रवेशद्वारातुन आत आल्यानंतर बाजूला कातळातून तुटून आलेला कडा अडकला आहे त्यामुळे इथं नैसर्गिकरित्या उलट्या व्ही आकाराची कमान तयार झाली आहे. या कातळातून जागोजागी पाणी झिरपत असल्याचं पहायला मिळत.



गडाच्या प्रवेशव्दारापासून डाव्या बाजूला पाण्याच टाक आहे यातील पाणी पिण्यासारखं आहे इथून पुढची वाट गडमाथ्यावर जाते. पुढे १५-२० फुटांचा रॉकपॅच लागतो इथं अगोदर पायऱ्या होत्या इंग्रजांनी केलेल्या हल्ल्यात त्या उध्वस्त झाल्या आहेत त्या जागी आता लोखंडी शिडी लावलेली आहे हि शिडी चढून वर आल्यानंतर दगडी पायऱ्या लागतात व गडाचा दुसरा दरवाजा लागतो या दरवाज्यातून आल्यावर गडमाथ्यावर पोहचलो. प्रवेशद्वारातुन वर आल्यानंतर ढालकाठी दिसते अन त्यावर डौलानं फडकणारा भगवा. बुरुजावर दिमाखात उभी असणारी ढालकाठी म्हणजे स्वराज्यचं निशाण, मावळ्यांनी रणांगण गाजवून गड स्वराज्यात सामील झाला त्याचं हे निशाण. इथं काही वास्तूंचे अवशेष दिसतात.

घनगड मुख्य प्रवेशद्वार 

गडमाथा लहान असल्यानं इथं जास्त काही अवशेष पहायला मिळत नाहीत फक्त प्रवेशद्वारला लागून असलेला मोठा बुरुज आहे. घनगडाचा मुख्य वापर टेहळणीसाठी होत असे. कोकणातून घाट माथ्यावर येणाऱ्या मालावर लक्ष ठेवण्यासाठी गडाचा वापर होत असत. कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी म्हणजे घनगड. गडमाथ्यावरून तैल-बैल सुळका सुधागड हा परिसर स्पष्टपणे नजरेस येतो तर सुधागडच्या मागे असणारा सरसगड सुद्धा दिसतो. गडफेरी उरकून गड उतरायला घेतला. दुपारी दीड-दोनच्या सुमारास गड उतरून खाली आलो. खाली आल्यावर सोबत आणलेली दिवाळी खाऊन आता कुठं जायचं याचा विचार सुरु झाला, अजून भरपूर वेळ असल्यानं तैल बैल सुळका बघायला किंवा देवकुंड करायचा प्लॅन होता. वेळ होता त्यामुळं देवकुंड करायचं ठरलं. स्पेशल धबधबा बघायला आम्ही कधीच गेलो नाही कारण वॉटरफॉल म्हंटल कि जत्रेची ठिकाण त्यामुळं त्यापासून थोडं लांबच अन गेलं तर असं ऐनवेळीच गर्दी नसल्यावर. देवकुंडला आमच्या पैकी फक्त शुभम जाऊन आला होता त्यामुळं वाट त्यालाच माहित होती. पुन्हा देवकुंडला जाण्यासाठी ताम्हिणीकडं निघालो. ताम्हिणी उतरून भिरा गाठलं.




भिरा गावातून डॅमकडे जाणाऱ्या रोडने देवकुंडकडे निघालो. जंगलात जाणाऱ्या वाटेच्या अलीकडे पार्किंग आहे तिथं असणाऱ्या हॉटेल चालकाला व गाईडला विचारलं आत धबधब्या पर्यंत जायला कितीवेळ लागेल सगळं विचारलं पण दिवाळी आधीच मोठा पाऊस होऊन गेला होता त्यामुळं देवकुंडला चालू असलेला जमावबंदीचा कलम १४४ अजूनही चालूच होता हे आम्हाला माहिती न्हवत तिथं प्रशासनाकडून तसा बोर्डच लावला आहे त्यामुळं सगळी स्कीम गंडली तैल बैला सोडून एवढं देवकुंड साठी आलो पण इथं बंद होत तरी जायचा विचार केला पण सगळं ठरवे पर्यंत चार वाजले अन जायला दोन तास परत बाहेर यायला तितकाच वेळ त्यात वाट चुकलो तर तिथंच खेळत बसावं लागल म्हणून पुढच्या वेळी कधी तरी करू म्हंटल तिथं टाकून बसलेले दोन गाईड म्हणत होते चला मी नेतो तुम्हाला म्हणून त्या दोघांना रामराम ठोकून निघालो तिथून. ताम्हिणी मार्गे रस्ता खराब असल्यानं जाताना एक्सप्रेसन जायचं ठरलं. कालच निघायचं होतं पण कालचा दिवस वाया गेल्यानं सगळी स्कीम गंडली त्यात विक्या सारखं मला ऐकवत होता बघ मह्या काल निघालो असतो तर अत्तापर्यंत तीन गड उरकून सूर्यास्त बघायला चौथ्या गडावर असतो. पुढं भिरा वरून खोपोलीकडं निघालो वाटेत भोराईचा डोंगर उर्फ सुधागड दिसतो तर पुढं पालीत असलेला पगडीचा किल्ला उर्फ सरसगड लागला सरसगड आल्यावर ६ जूनच्या वेळी रात्री सरसगड चढताना चुकलेली वाट, चायनीज वाल्याकडं बनवलेलं जेवण, भक्ती निवासात केलेला मुक्काम या कधीही न विसणाऱ्या आठवणी डोळ्या समोर उभ्या राहतात. पालीत बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी थांबलो. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने म्हणजेच बल्लाळच्या नावाने प्रसिद्ध आहे. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले. मंदिराची रचना अशा प्रकारे केली आहे कि सूर्योदयावेळी सूर्याची किरणं थेट मूर्तीवर पडतात इथली गणरायाची मूर्ती स्वयंभू आहे.
गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन निघालो. मागच्या वेळी स्वप्न्या न्हवता त्यामुळं जाताना पुन्हा उंबरखिंड करायचं ठरलं. मागच्या वेळी जूनच्या सुरुवातीला आलो होतो तेव्हा आंबा नदीला पाणी न्हवत सगळ्यांना पोहायचं होतं त्यामुळं यावेळी दिवाळीत नदीला थोडं तरी पाणी असावं अशी अपेक्षा होती. स्मारकपर्यंत जास्तोर सूर्या शेठ तर गायब झाले होते अंधार पडायच्या आत स्मारकापर्यंत पोहचयच होत. साडे सहाला उंबरखिडीत पोहचलो. विक्यानं मागच्या वेळी गाडी थेट नदी पात्रात टाकली होती पण यावेळी थोडं पाणी होतं. गाडी अलीकडंच लावून स्मारकाकडं निघालो. वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढत स्मारकाजवळ आलो. उंबरखिंडीत मराठ्यांच्या फौजांनी मोघली फौजेचा उडवलेला धुव्वा अन छत्रपती शिवरायांनी आपल्या गनिमीकाव्याचा युद्धतंत्रानं कारतलब खानची केलेली फजिती अन रणांगण गाजवून मिळवलेला विजय पुन्हा एकदा हा इतिहास जागा करत सगळयांनी त्या शौर्यतीर्थाला वंदन केलं.

उंबरखिंड

नदीला प्रवाह होता पण नदीत गुडघ्या एव्हडंच पाणी होत. त्यामुळं पोहायचं राहिलं पण जेवढ हाय तेवढ्या पाण्यात पोरं पोहायला तयार झाली पोहणं कसलं एवढ्या पाण्यात नुसतं पालथं पडायचं अन अंग भिजवायचं. काही झालं तरी आंबा नदीच्या पात्रात डुबकी मारूनच जायचं होत. सगळे पाण्यात उतरलो फक्त वैभव नाही आला मग त्याला फोटो काढायचं काम लावलं. पात्रात मोठी मोठी खळगी होती आम्ही ते शोधत होतो पण अंधारात काय सापडत न्हवत शेवटी विक्याला सापडलं. ह्या खळग्यानसमोर टबबाथ सुद्धा फिका आहे त्या खळग्यात थंडगार पाण्यात पडून रहायचं आपल्या वरून वाहत जाणार पाणी अन पाण्याचा प्रवाह एवढा कि माणूस त्या कातळवरून घसरत पुढं जायचा.

उनाड 

सात-साडे सात वाजत आले होते त्यामुळं आवरत घेतल अन आवरून आमच्या मार्गाला लागलो पुढं खानपूरच्या अलीकडं नेहमीच्या ठिकाणी जेवून एक्सप्रेसवेला लागून घराकडं निघालो. या वेळच्या दिवाळीला पाहिजे तशी भटकंती झाली नाही एका दिवसात कधी सह्याद्रीचा निरोप घेऊ वाटत नाही कारण दोन दिवस तरी त्याच्या सानिध्यात राहिल्या शिवाय मन भरत नाही पण नाईलाजानं निरोप घ्यावा लागतो. आज या दिवसभरात सकाळी सवाष्णीच्या घाटावर तैनात असलेला घनगड केला तर दुपारी देवकुंड करायला गेलो पण नाही झाला मग जाताना गाडीच्या खिडकीतूनच दिसणाऱ्या सुधागड सरसगडच्या आठवणी जाग्या करत जाता जाता बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं अन पुन्हा एकदा उंबरखिंड गाठली त्या शौर्यतीर्थाला वंदन करून त्या चांदण्यारातीच्या उजेडात खळ्ळ अवाज करत वाहणाऱ्या नदीत पोहणं नाही पण आहे त्या लहान सहान गोष्टीत जिवलगांसोबत घेतलेला आनंद म्हणजे आयुष्य जगणं होय.

भटकंती दिनांक ३०/१०/२०१९
सहभागी सरदार उमराव -
विक्या उर्फ विकास पवार
स्वप्न्या उर्फ स्वप्नील ननवरे
शुभम पवार
वैभव पवार
अन मी म्हणजे मीच.

जिगरी 







घनगड वरील शिडी 


घनगडचा दुसरा दरवाजा 





Comments

Popular posts from this blog

रणसंग्राम फोंड्याचा, किल्ले फोंडा, गोवा

आमचं राजं छत्रपती झालं...!

संडे भटकंतीनामा - ऐतिहासिक सासवड नगरी व सरदार पानसे वाडा