रणसंग्राम फोंड्याचा, किल्ले फोंडा, गोवा
परशुरामाची
यज्ञभूमी गोमांचल पर्वत, गौ म्हणेज बाण.
परशुरामाचा बाण जिथपर्यंत पोहचला तो गोमंत म्हणेजच गोमंतक आणि आजचा गोवा. मौर्य, कदंब, यादव, बहामनी पुढे आदिलशाही, पोर्तुगीज अशा
प्रमुख राजवटी गोव्यात नांदल्या त्यातल्या कदंबांनी गोव्यावर सर्वाधिक वर्षे सत्ता
गाजवली. गोवा म्हटलं की
पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर योतो तो अथांग पसरलेला निळाशार समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावर चमचमणारी सोनेरी वाळू अन किनारपट्टीवर डोलणाऱ्या नारळाच्या बागा. गोव्याबद्दल
प्रत्येकाच्या मनात कुतूहल हे असतेच. गोवा प्रत्येकाला कोणत्या कोणत्या कारणाने खुणावत असतो. कधी कोणाला
गोयंकरांच्या शांत, मनोसक्त, निवांत जगण्याच्या
शैलीमुळे खुणावतो तर कोणाला "आरं तिकडं लय स्वस्त
भेटते" हे एकच वाक्य खुणावते, कॉलेजमध्ये असताना जिवलग
मित्रांनी गोव्याचा प्लॅन केला नसेल तर ते जिगरी
असूच शकत नाहीत, कारण गोवा म्हणजे तरुणाईसाठी
जणूकाही पंढरपूरचं झालंय एकदा का होईना गोव्याचा वारीला गेलंच पाहिजे. देवाने गोव्यावर
नैसर्गिक सौंदर्याची मुक्तहस्ताने केलेली
उधळण त्यामुळेच
प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गोवा खुणावतच असतो.
गडकोटांची वारी करणाऱ्या
या वारकऱ्याचा कंपनीच्या कामानिमित्त गोव्याची वारी करण्याचा योग आला. मग त्यात गोव्यात
जिथं जिथं मराठ्यांनी पराक्रम गाजवून फिरंग्यांना धूळ चारली अशे अनेक किल्ले, ठिकाणं पाहण्याचा योग आला. मग त्यात खुद्द
शिवाजी महाराजांनी बारदेश मध्ये केलेली मोहीम अन त्यात मांडवी नदी काठी असलेल्या
रुईश मागुश किल्ल्यावर केलेला हल्ला असो वा मराठयांच्या आरमाराची धास्ती घेऊन
पोर्तुगीजांनी अजून बळकट केलेला अग्वाद असो की तिकडं दक्षिण गोव्यात कारवार नजीक
बेतूलला छ. शिवाजी महाराजांनी बांधलेला बेतूल किल्ला असो वा मराठयांच्या फौजांनी
पोर्तुगीजांना समुद्राचं खारं पाणी पाजत जिंकलेला खोलगड म्हणजेच आजचा cabo de rama fort पासून ते छ.
संभाजी महाराजांनी जिंकलेला दिल चाहता हे फोर्ट अशी ओळख असलेला पण मराठ्यांच्या इतिहासात आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणारा शापोरा असो वा फोंड्यावर मराठयांच्या तडाख्यातून
थोडक्यात वाचलेल्या विजराई आल्व्हरने शंभू राजांच्या रुद्र अवतार बघून स्वतःला
कोंडून घेतलेलं गोव्यातलं सर्वात जुनं चर्च बॅसिलिका ऑफ बॉम जीजस पर्यंत गोव्याचा
सारा मुलुख पाहण्याचा योग आला. गोव्यातल्या रयतेच्या कल्याणासाठी अन स्वराज्य
वाढवणासाठी शिवरायांनी, शंभू राजांनी अन
मावळ्यांनी जीवाची बाजी लावत पोर्तुगीज व आदिलशाहच्या फौजांना धूळ चारत जो काही
पराक्रम घडवला तो इतिहास आजपर्यँत फक्त वाचला होता तोच मराठयांचा पराक्रमी इतिहास
आज जगता आला अनुभवता आला. त्यापैकीच एक किल्ला म्हणजे किल्ले फोंडा. जिथं तीन
मोठ्या लढाया झाल्या दोन छ. शिवरायांच्या अधिपत्याखाली तर दुसरी छ. संभाजी
महाराजांच्या कारकिर्दीत. आदिलशाहाने हा किल्ला बांधला पुढे तो १५४९ साली
पोर्तुगीजांनी जिंकला त्यानंतर पुन्हा आदिलशाहीने हा किल्ला आपल्या ताब्यात ठेवला.
![]() |
मुख्य प्रवेशद्वार, किल्ले फोंडा |
राज्याभिषेक
सोहळ्यानंतर महाराजांनी कोकणातील आदिलशाहीचा मुलूख मारण्यास सुरुवात केली तेव्हा
बेळगावच्या घाटाखालील बाजू म्हणजेच आदिलशाहीच्या ताब्यात असलेला फोंडा किल्ला
घेण्याचे महाराजांनी ठरवले. याआधी एकदा १६६६ साली मराठ्यांच्या फौजांनी फोंडा
काबीज करण्याचा प्रयत्न केला होता पण लढाईत आदिलशाही सैन्याला पोर्तुगीजांनी मदत
केल्यामुळे त्यावेळी माघार घ्यावी लागली होती पण यावेळी २००० घोडदळ आणि ७००० पायदळ
घेऊन फोंडा किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी मराठ्यांच्या फौजा सज्ज होत्या. १८
एप्रिल १६७५ साली मावळ्यांनी फोंड्यावर हल्ला केला त्यावेळी किल्लेदार होता
आदिलशाहीचा सरदार मोहम्मद खान फोंड्याचा हल्ला चालू असतानाच मराठ्यांच्या एक
तुकडीने चंदर आणि आजूबाजूची गावे जिंकून घेतली. १६ मे १६७५ साली महाराजांनी फोंडा
स्वराज्यात सामील करून घेतला. फोंडा जिंकल्यानंतर महाराजांनी गडाची दुरुस्ती करून
नवीन बांधकाम केले. फोंडा पुढे स्वराज्यातच राहिला व महाराजांनी येसाजी कंक यांची तिथे किल्लेदार म्हणून
नेमणूक केली. पुढे शंभू राजांच्या उत्तर कोंकणात सिद्दी व
पोर्तुगीजांसोबत चकमकी चालूच होत्या. छ. संभाजी
महाराजांनी २१ जुलै १६८३ साली पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या चौल व
रेवदंड्याच्या किल्यावर हल्ला करून किल्याला वेढा टाकला.
![]() |
किल्ले फोंडा |
हा वेढा उठवण्यासाठी तिकडे गोव्यात गव्हर्नंर
प्रयत्न करू लागला. चौलचा वेढा उठवण्यासाठी त्याने रणनीती आखली मराठयांच्या
ताब्यात असलेल्या फोंडा किल्यावर आक्रमण करून मराठ्यांचे लक्ष विचलित करायचे. शंभू राजांना
सुद्धा नेहमी दुट्टपीपणा करत सिद्दी व मुघलांना मदत करणाऱ्या फिरंग्यांचा माज
उतरवायचा होता. पण गोवा शहरात जाऊन हल्ला करणे शक्य न्हवते त्यामुळे शंभू राजे
सुद्धा विजरईला गोव्याच्या बाहेर आणायचा प्रयत्न करीत होते. तेव्हा विजरई
फोंड्यावर चालून येतोय हे कळल्यानंतर त्यांनी चौल रेवदंड्याचा वेढा तसाच चालू
ठेवला व अर्धी फौज घेऊन ते फोंड्याच्या फोंड्याच्या मदतीला धावून गेले. गोव्याचा विजरई कोंदे दि आल्व्हर याने ३०००चे
सैन्य घेऊन फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी फोंड्याचे किल्लेदार होते येसाजी कंक आणि मावळे
फक्त ३००. पोर्तुगीजांच्या हल्ल्यात किल्ल्याच्या पहिल्या तटबंदीला भगदाड पडले.
शंभू राजे येईपर्यंत येसाजी कंक व मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करत किल्ला लढवत
ठेवला. छ. संभाजी राजांनी फोंडा गाठून पोर्तुगीजांच्या सैन्यालाच वेढा घातला तेव्हा
विजरई अन त्याच्या सैन्याने माघार घेतली. शंभू छत्रपतींचा रुद्र
अवतार बघून पोर्तुगीज सैन्य मिळेल त्या वाटेने गोव्याकडे पळत सुटले. पोर्तुगालला आपल्या
राजाला लहिलेल्या पत्रात तो लिहतो शत्रूने खुलं युद्ध जाहीर केले आहे गोव्यामध्ये
पोर्तुगिजांचा कोणताही पुरावा सापडत कामा नये अशी त्यांनी शपथ घेतली आहे. मराठा सैन्याने
पोर्तुगिजांचा पाठलाग केला खुद्द गव्हर्नर दोन वेळा मरता मरता वाचला. गोव्याचा
गव्हर्नर एवढा घाबरला कि त्याने बॉम जीजस चर्चमध्ये स्वतःला चार दिवस कोंडवुन
घेतले. पण या लढाईत मराठयांचा विजय झाला किल्ला स्वराज्यातच राहिला यामध्ये
पायदळाचे प्रमुख येसाजी कंक व त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांनी मोठी कामगिरी
बजावली. या लढाईत कृष्णाजी कंक धारातीर्थी पडले तर येसाजी कंक जायबंदी झाले. गोव्यात
फोंडा आणि आजूबाजूच्या परिसरात मराठी लोकवस्ती सर्वात जास्त आहे. आज या किल्ल्याला
गोव्यात शिवाजी किल्ला म्हणून आळोखले जाते. गडावर आता शिवकालीन बांधकाम उरले नाही. आज जे काही बांधकाम आहे ते गोवा सरकारने सुशोभीकरण करून
संवर्धनाचे काम केले आहे. गडावर छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.
![]() |
गारदी मी माझ्या राजाचा |
गोव्यात
गेल्या नंतर शिवशंभुच्या पदस्पर्शाने अन मावळ्यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या
किल्ल्याला नक्की भेट द्या. कामानिमित्त चार- पाच वेळा गोव्याच्या वाऱ्या झाल्या
त्यात नेह्मीचाच ऐकून असलेला गोवा सोडून बाकी खूप काही पाहता आलं गर्दीने गजबजलेले
समुद्र किनारे सोडून दिवसा निळंशार पाणी अन सांज होताना मावळत्या सूर्याने उधळल्या
रंगछटानी सजलेले, अथांग पसरलेले समुद्र किनारे. गोव्यात भटकायला सोबत होते ते
ऑफिसचे मित्र हेमंत व मोहन. आपल्या
कोकणातल्या पेक्षा थोड्या वेगळ्या धाटणीची असलेली गोयंकरांची कोंकणी ऐकायला
मिळाली. गोव्यात आलो होतो खरं तर कंपनीच्या कामासाठी पण काम असो वा काहीही असो आवड
असली कि सवड मिळतेच अन एकदा का सवड मिळाली कि आपण कुठलं सोडतोय.
![]() |
छ. शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेला किल्ला, किल्ले बेतूल |
![]() |
रुईश मागुश फोर्ट |
प्रसिद्ध चित्रकार मारिओ दे मिरांडा यांनी काढलेले छ. शिवाजी महाराजांचे चित्र, रुईश मागुश फोर्ट |
![]() |
आग्वाद फोर्ट |
![]() |
खोलगड उर्फ cabo de rama |
![]() |
किल्ले शापोरा |
![]() |
Reis Mogas Fort |
![]() |
Basilica of Bom Jesus |
![]() |
बेतूल वरील तोफ |
👌👌👌
ReplyDelete