उन्हाळा सरू लागला कि सह्याद्रीला सुद्धा पावसाची चाहूल लागते कारण उन्हामुळे
भाजून निघून अजूनच मजबूत झालेले त्याचे ताशीव कडे, सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभी असलेली वनसंपदा, त्याच्या कुशीत उन्हात पाण्याच्या शोधत असणारे
प्राणी, उन्हांमुळं उजाड पडलेला सह्याद्रीचा माथा हे सारेच वरुण
राजाच्या वर्षावात नाहून निघण्यासाठी आतुर असतात. मग ह्यात सह्याद्रीची वारी
करणारे वारकरी तरी कसं काय मागं राहतील.
जसा जसा जूनचा महिना सरू लागतो तसा सह्याद्री त्याच्या भाळी चढलेला पिवळा भंडारा
उतरुवून हिरवा शालू पांघरण्यासाठी सज्ज असतो तसं आमचं जून चालू झाला कि यंदाचा स्वातंत्र्यदिन
कोणत्या गडावर साजरा करायचा याची शोधाशोध चालू होते. तसा वर्षातून दोन वेळा आमचा
स्वातंत्र्यदिन साजरा होतो. एक म्हणजे १५ ऑगस्ट तर दुसरा ६ जून जेव्हा इथल्या
भूमीवर परकीयांनी उच्छाद मांडून संपूर्ण रयत नागवून ठेवली होती कित्येक वर्ष ह्या
महाराष्ट्राची भूमी परकीयांच्या अंधकारात हरवून गेली होती तेव्हा इथला अंधकार दूर
सारून रांगड्या सह्याद्रीच्या साथीनं इथल्या रयतेत स्वातंत्र्याची मशाल पेटवून
स्वराज्य निर्माण करून महाराजांनी रयतेवर मायेचं छत्र धरलं होतं तो शिवराज्याभिषेक दिन म्हणजे
आमच्यासाठी स्वातंत्र्यदिनच. नेहमीप्रमाणे जून मध्ये रायगडाची वारी करून राजं
सिंहासनाधीश्वर होताना बघून होऊन धन्याच्या उत्सवात नगारखान्यात केलेल्या
जल्लोषानं मन भरून आलं होतं. ६ जूनला रायगड अन ७ जूनला अंधारबनची भटकंती करून झाली
होती.

त्यामुळं आता चाहूल लागली
होती ती १५ ऑगस्टची. छत्रपती शिवरायांनी, छत्रपती शंभू राजांनी
त्यांच्या पुढे किती तरी मातब्बर सरदारांनी असंख्य मावळ्यांनी भारतभूमीला स्वतंत्र
ठेवण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली. छ. शिवरायांनी या मातीत क्रांतीची बीजं पेरली
होती त्यामुळेच पुढे जेव्हा इंग्रजनी कावेबाजपणे इथं सत्ता गाजवायला सुरुवात केली तेव्हा
याच मातीत जन्मलेल्या क्रांतिकारक,
स्वातंत्र्यसेनानी यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यापैकीच एक
म्हणजे उमाजी नाईक ज्यांना आद्यक्रांतिकारक म्हणून आळोखले जाते. इंग्रज अधिकारी मॉकिन
टॉस आपल्या एका पत्रात लिहोतो,
"उमाजीपुढे छत्रपती
शिवरायांचा आदर्श होता त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता."
ज्या गडकिल्ल्यांच्या साथीने महराजांनी हा स्वराज्याचा डोलारा उभा केला त्याच
गडकिल्यांच्या साथीने क्रांतिकारकांनी इंग्रजांन विरुद्ध स्वातंत्र्याचा लढा उभा
केला. त्यामुळे गडकिल्ल्यांच्या साथीने इथं घडलेल्या इतिहासातून प्रेरणा घेत या
मातीत दुसरे शिवाजी तयार होऊ नयेत म्हणून १८१८ साली इंग्रजांनी तोफा लावून
महाराष्ट्रातील किल्ले पाडले त्यांच्या वाटा उधवस्त केल्या त्यामुळेच हे किल्ले
सुद्धा स्वातंत्र्याची प्रतीके आहेत म्हणूनच आम्ही वारी गडकोटांची परिवारातर्फे
दरवर्षी गडकिल्ल्यांवर स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो.
त्यामुळे यंदा कुठे जायचं याची शोधा शोध चालू झाली. पुण्याच्या आजूबाजूचे आता जवळ
जवळ सगळे किल्ले करून झालेत त्यामुळे १५ ऑगस्टसाठी नवीन ठिकाण शोधायचं होत.
पावसाळा सुरु झाला की सगळ्यांनाच सह्याद्रीची ओढ लागते. बाबा म्हंटला
मुंबईवरून राहुल्या जाकीर येतायत फिरायला कुठं जायचं सांग तेव्हा मी बाबाला मढे
घाट सुचवला पण त्याच वेळी मढे घाटाची माहिती गोळा करीत असताना मला केळद गावा जवळ
असलेल्या भोर्डी गावातल्या केळेश्वर मंदिर व तिथं असलेल्या वीरगळींची माहिती
मिळाली. तिथे पडलेले मंदिरांचे अवशेष व वीरगळींची झालेली दुरावस्था मिळालेल्या
फोटोंमध्ये दिसली मग ठरवलं कि यावेळीचा स्वातंत्र्यदिन साजरा करायचा तो भोर्डी
गावात. मग सगळ्यात आधी विक्याला कळवलं अन स्वातंत्र्यदिनाच्या मोहिमेचा बेत
सांगितला. जुलै मध्ये नागपूरवरून जया आला होता मग जिवलग गॅंग सड्डा अड्डा सोबत राजगडाची
वारी करून आलो. राजगडाच्या वेळेसच पुढं भोर्डीला जाऊन मंदिराची पाहणी करावी म्हंटल
पण राजगड उतरायला उशीर झाल्यामुळे रहित केले. मंदिराबाबत थोडं कुतूहल होत कारण मढे
घाटाच्या अगदी जवळच असलेल्या गावात हे मंदिर आहे तरी त्या संबधीची जास्त माहिती
कुठं मिळत नाही. मंदिराचा अन तिथं पडलेल्या अवशेषांचा जो काही अंदाज बांधला तो
फक्त गुगल मॅपवर बघितलेल्या फोटोजवरूनच त्यामुळे १५ ऑगस्टला वीरगळींची स्वछता व १६
ला उपंड्या घाट ते मढे घाट हि भटकंती करायची ठरलं तसं साऱ्यांना आवतन धाडली स्वप्न्या, बाबा, पंक्या, शिवा, राहुल्या सगळ्या सगळ्यानं सांगितलं. यातून फक्त दोनच आसामी तयार झाल्या बाबा
अन पंक्या बाकी मग मी व विक्या,
शुभम असे पाच जण फिक्स
झालो त्यात नंतर सहाव्याची नवीन भर पडली ती पंक्याचा भाऊ प्रशांत. नेहमीप्रणामाने
डौलानं भगवे फडकवत सह्याद्रीची सफारी
घडवून आणणारी सफारी मात्र यावेळी न्हवती गाडीचं काम निघाल्यामुळे यंदा फटफटी वरच
भोरडी गाठायचं ठरलं त्यात पाऊस आणि रात्री मुक्कामाची जागा गाठायची म्हंटल तर अवघड
त्यामुळं लागेल तेवढंच सामान घेतलं. १५ ला सकाळी सहाला निघायचं ठरलं दरवेळेप्रमाणे
निघायला उशीर मी, विक्या, शुभम, पंक्या व बाबाची वाट बघत सोमजी चौकात थांबलो शेवटी ७:३० ला
पंक्या व बाबाने दर्शन दिलं. उशीर का झाला म्हंटल्यावर बाबा पंक्याला शिव्या
घालतोय अन पंक्या बाबाला तर तिकडं विक्याच तर येगळंच म्हशीच्या पाठीवर बॅच ठेवून
फोटू काढतंय तिथून निघून पुढे कात्रजला पोटपूजा उरकली सफारीमूळ कसं रॉयलपणे
फिरायची सवय लागली होती टुव्हीलर म्हंटल कि नकोच पण यावेळी पर्याय न्हवता आता
टुव्हीलरवर मज्जा येईल पण तंगतडतोड करून घरी येताना सफारीची खरी आठवण येते. पाऊस
असल्यामुळं फुल्ल पॅक होऊन गाड्या नसरापूरच्या दिशेनं दिमटवल्या. सफरी नसली म्हणून
काय झालं गाडयांना लावलेले नेहमी निघताना मोहिमेची शान असणारे वाऱ्याला भेदत भर
पावसात डौलानं फडकणारे दोन भगवे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजर रोखून धरत होते.
नसरापूर मध्ये गाडीला थोडं हवा पाणी बघून पुन्हा फटफटी राईड चालू झाली. १५ ऑगस्टची
सुट्टी असल्याने राजगड तोरणाला गर्दी होती. तोरणा राजगडच्या
वाऱ्या करून नसरापूर ते वेल्हे रस्ता कसं नुसता तोंड पाठ झालाय आंबवणे, पाल, विंझर, साखर, वाजेघर, मार्गसनी गुंजन मावळात सह्याद्रीच्या कुशीत वसलेली हि गाव अन सह्याद्रीचा
मुकुटमणी शोभणारे ढगांच्या आड दडून बसलेले राजगड अन तोरणा. एक स्वराज्याची पहिली
राजधानी तर दुसरं स्वराज्याचं पहिलं तोरण हे सार डोळ्यात साठवत आमची दौड चालू
होती. बाबा म्हंटला वेल्ह्यातला वडापाव भारी ये मग वेल्हे गाठल्यावर हॉटेल तोरणा
मध्ये आजीबाई वडे सोडतच होत्या मग पहिल्यांदा फक्त सहाची ऑर्डर दिली ते खात होतो
तेव्हड्यात आजीबाईंनी आवाज दिला,
"सोडू का रे पोरांनो अजून, वडापाव तर भारीच होता अन परत पुढं खायला काय मिळल याची गॅरंटी न्हवती त्यामुळं
सगळेच दाबून हाणत होते मग वडे सोडू का म्हणून पुढचा आवाज यायच्या आधी आम्हीच आवाज
दिला अजून सहा सोडा दाबून वडापाव हाणल्यानंतर गाडयांची दौड केळदच्या दिशेने वळवली.
डाव्या हाताला धुक्यात हरवलेला प्रचंडगडाचा पसारा होता तर उजव्या हाताला अथांग
पसरलेलं गुंजवणे धरण. राजगड घेऱ्यातील गावे गुंजन मावळात येतात तर तोरणा घेऱ्यातील
गावे कानंद खोऱ्यात. आजवर वेल्ह्याच्या पुढे कधी आम्ही गेलो न्हवतो त्यामुळं इथून
पुढच्या मुलखाची नव्याने ओळख होणार होती. वेल्हे झालं कि भट्टी गाव लागते या
गावातून तोरण्याला जायची वाट आहे जी कोकण दरवाजा जवळ निघते. भट्टी गाव झालं कि
इथली दुर्गमता जाणवू लागते चिंचोळे रस्ते, नागमोडी वाटा वरून रापराप आदळणारा पाऊस त्यात मी बाबा, वाट सरळ असली तरी वाकडं तिकडं चालणाऱ्या राम्याच्या धूम बाईकवर स्वार होतो तर
पंक्या अन त्याचा भाऊ प्रशांत प्रत्येक चढला बिचाऱ्या स्प्लेंडरचा जीव काढत होते
तर तिकडं विक्याची FZ बुंगाट होती. सफरीत बसून सह्याद्रीच्या
घाटवाटांची सफारी करून भागलं त्यामुळं आता फटफटीवर बसून ह्याच घाटवाटांची राईड करत
भोरडी गाठायचं होतं.
 |
घसरगुंडी
|
सुट्टी असल्यानं सगळ्या
जत्रेचा ओढा मढे घाटाकडं होता. रायलिंगकडे जाणारा सिंगापूर फाटा झाला कि उजव्या
हाताला येणारा फाटा म्हणजे भोरडीचा अन सरळ जाणारी वाट केळद मढे घाटकडे जाते. भोरडी
म्हणजे सह्याद्रीनं आपल्या कवेत सामावून घेतलेलं गाव. चहूबाजूंनी वेढलेल्या
डोंगरांमध्ये वसलेलं हे गाव. दुपारी बारा वाजता आम्ही गावात पोहचलो. गावची वस्ती
फाट्यापासून आत दोन एक किलोमीटर मध्ये आहे. मंदिर लोकवस्तीत असेल वाटलं होत पण
मंदिर लोकवस्तीपासून थोडं लांब होतं. गावात गेल्यावर मंदिराचा रस्ता विचारला मग
त्या दिशेनं निघालो पण पावसामुळं सगळी कड नुसता चिखल त्यामुळं गाडयांची घसरगुंडी
चालू होती मग अलीकडंच गाड्या लावून चालत निघालो. मंदिराकडे येणारी जी वाट मुख्य
वाट होती पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळं बंद झाली होती. अर्धा तास झालं चालत होतो
पण मंदिर काही सापडत न्हवत. सगळी कड गर्द झाडी, दाट जंगल फिरून फिरून परत
त्याच जागी येत होतो. मग अर्धे इधर जाव अन निम्मे उधर जावची स्कीम राबवली जंगलात
सगळे इकडं तिकडं भटकत मंदिराची वाट शोधत होतो पण वाट तर लांबच राहिली झाडीमुळे
मंदिर सुद्धा दिसत न्हवतं एक तास झालं मंदिर शोधत होतो. त्यामुळं परत
माघारी फिरावं लागल कि काय असं वाटत होतं सगळे जण गाडी लावलेल्या दिशेनं निघालो
तेव्हा मला भात शेतीच्या पलीकडे आत जंगलात जाणारा रस्ता दिसला तेव्हा मी पोरांना सांगितलं
अगोदर मी एकटाच जाऊन बघून येतो तिकडं मंदिर आहे की नाही ते जाताना वाटत एक ओढा
लागला तो पार करून मी झाडीच्या दिशेनं निघालो चहूबाजूनं वेढलेल्या गर्द झाडीत
असलेलं केळेश्वर मंदिर नजरेस पडलं अन मग या इकडं सापडलं मंदिर म्हणत सगळ्यांना
मंदिराकडं बोलावलं त्यात पंक्या वढ्यातून येताना पाण्यात पडला. तासभर शोध शोध
शोधल्यानंतर मंदिर सापडलं शेवटी काय त्या शंभू महादेवालाच काळजी. पावसामुळं एवढा
वेळ वाट शोधण्यात गेला जी मुख्य वाट होती तिथं झाडीत गुडघाभर पाणी साचलं होतं
त्यामुळं दुसरी कडून जाणं भाग पडलं.
 |
सह्याद्री एक मायाजाल
|
सह्याद्रीत वाट चुकणं
किंवा पुढं जायला वाटच नसेल तर इथं आपल्या वाटा आपणच शोधाव्या लागतात. ह्या
सह्याद्रीत अनेक गुपितं दडलेली आहेत त्यांचा फक्त शोध घेता आला पाहिजे इथं
वावरताना इथल्या वास्तू त्यांचा इतिहास आपल्याला आकर्षित करू लागतो मग आजूबाजूला
दाट जंगलात पसरलेल्या शांततेत समरस होऊन सह्याद्रीच सौंदर्य न्याहाळत या गुपितांचा
आस्वाद घ्यायचा. केळेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात पडलेल्या
अवशेषांवरून मंदिर प्राचीन असल्याचं कळत पण आज मंदिराचं प्राचीन बांधकामापैकी एकही
बांधकाम शिलक नाही आज जे मंदिर आहे ते गावकऱ्यांनी बांधलेलं आहे. इथचं मंदिराच्या
आवारात बांधकामाचे अवशेषश पडलेला आहेत त्यात चौथरे, घडवलले दगड, तीन चार लहान नंदी आहेत तर एक कान तुटलेला मोठा नंदी आहे. मंदिराच्या बाजूलाच
एक जागा आहे त्याला देवाचे न्हाणी
घर म्हणतात त्यात महादेवाची पिंड आहे पावसामुळे त्यात सगळं पाणी भरलेले होतं.
मंदिराकडे येणाऱ्या वाटेवर दोन्ही बाजूला दोन मोठ्या वीरगळी आहेत. तीन चार फूट
उंचीच्या या वीरगळ आहेत त्या सुस्थीत होत्या. त्यावर चार भागात नक्षीकाम केलेले
आहे सगळ्यात वरती महादेवाच्या पिंडीची पूजा करतानाचे शिल्प कोरलेलं आहे तर त्याचा
खालच्या बाजूला चार पाच महिला उभ्या असलेल्या दाखवलेल्या आहेत तर तिसऱ्या भागात
दोन योध्यांच्या लढाईचे चित्र दाखवलेलं आहे तर सगळ्यात खालच्या भागात दोन
प्राण्यानांची झुंज दाखवलेली आहे.
 |
वाटेवरची वीरगळ
|
 |
तुळशीच्या आकाराच्या झाडीत असलेल्या वीरगळी
|
 |
वीरगळीवरील योद्धा
|

इथचं पुढे झाडीत तुळशीच्या आकाराचे पडलेले अवशेष आहेत. आम्ही ते बघण्यासाठी
आतमध्ये झाडीत निघालो इथं खाली बसून जाण्याशिवाय पर्याय नाही. हे थोडस तुळशी सारखे
दिसणारे अवशेष म्हणजे वीरगळीच होत्या अश्या आकाराच्या वीरगळी आम्ही प्रथमच बघत
होतो. बहुतेक वीरगळींवर दोन तीन योध्यांच्या लढाईची चित्रे दाखवलेली असतात पण यावर
मात्र मधोमध एकच सैनिक कोरलेला आहे त्याच्या एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातात
तलवार आहे. अशा अनेक वीरगळी आणि मंदिराचे अवशेष दाट झाडीत इथं वाईट अवस्थेत पडून
आहेत. आम्ही त्या हलवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच वजन भरपूर होत ह्या वीरगळीं
पर्यंत पोहचणच थोडं मुश्किल आहे पण मनुष्यबळ असेल तर ह्या अस्ताव्यस्त पडलेल्या
वीरगळी बाहेर काढणं सहज शक्य आहे. हे सार पाहून झाल्यावर मंदिराकडे निघालो तिथं
सगळा पसारा ठेवून, फोटोत मी ज्या वीरगळी बघितल्या होत्या त्या शोधण्यासाठी आम्ही निघालो तेव्हा मंदिराच्या
डाव्या बाजूला असलेल्या झाडीत आम्हला या वीरगळी सापडल्या त्यांची अवस्था बरीच वाईट
होती झाडीमध्ये सगळे अवशेष पडलेले होते त्यावर शेवाळ चढलेल होत त्यात काही वीरगळी
होत्या तर काही सतीशिळा होत्या.
 |
वाईट अवस्थेत पडलेल्या वीरगळी
|
 |
महादेवाची पिंड, केळेश्वर मंदिर
|
मंदिरच्या चहुबाजूनी घनदाट झाडी वाढलेली आहे आणि त्या मधोमध मोकळी जागा आहे
त्या जागेत हे मंदिर आहे. गावातल्या लोकवस्तीपासून मंदिर थोडं लांब आहे त्यामुळं
गावकऱ्यांशिवाय जास्त कोणी इकडं फिरकत नाही. वीरगळींला बाहेर काढून त्यांची
साफसफाई करण्यासाठी लागणाऱ्या सामानाची जमवाजमव चालू केली. मंदिराच्या बांधकामाचे
काम चालू असल्यामुळे पाणी आणि बादली तिथेच मिळाली. आता इथून पुढच्या कामात
सगळ्यांना हाय नाय तेवढा सगळा जोर लावावा लागणार होता कारण झाडीत पडलेल्या ५० किलो
पासून १००-१५० किलो पर्यंतच्या दगडी शिळा उचलून बाहेर आणायच्या होत्या. सगळ्यांना
काम वाटून दिली बाबाला पाणी आणून द्यायचं होत तर शुभमने वीरगळ उचलायच्या आधी
त्याची साफसफाई करणे अन त्याखाली काय साप इच्चू बिच्चू हाय का insure करणे व मी विक्या पंक्या यांनी वीरगळी उचलून बाहेर
मंदिरासमोर आणायच्या असं सगळं काम कसं एकदम शिस्तीत चालू झालं. अगोदर लहान लहान
वीरगळी उचलताना काय नाय वाटलं पण मोठ्या ३-४ फुटांच्या वीरगळी बाहेर काढताना भर
पावसात घाम फुटू लागला. आम्ही वीरगळ झाडीतून काढून बाहेर आणीत होतो तर बाबा अन
प्रशांत त्यावर पाणी मारत होते आता म्हणाल आम्हला भर जंगलात एवढं पाणी मिळालं कसं
काय? मंदिराच्या
बाजूला देवाचं न्हाणी घर आहे त्यामध्ये महादेवाची पिंड आहे पण पावसमुळे ते पूर्ण
भरून त्याला पाण्याच्या टाकीचं रूप आलं होत तिथं साफसफाईला लागेल तेवढं पाणी होतं.
मला दम लागला कि विक्या जोर लावायचा विक्या दम लागला पंक्या अजून दाबून जोर
लावायचा. पंक्याला फकस्त थोडं inspire
करायचं कस तर अगदी जीवधन चढताना केलं होत तसं मंग बघायचं पंक्या कसा जोर
लावतोय. बादली एकच होती त्यामुळं बाबाच्या इकडून तिकडं सारख्या चकरा चालू होत्या.




काही वीरगळी इतक्या जड होत्या कि दोघा तिघांनाही उचलून नेणं शक्य नव्हतं अश्याच
पलटी मारल्या तर वीरगळीचं नुकसान होण्याची शक्यता होती म्हणून मग पावसामुळं तर
आधीच चिखल साचला होता त्यात थोडा अजून चिखल जमवून झाडांच्या फांद्या टाकून तिथली
दगडं बाजूला करून अलगद चिखलात पलटी मारत मागं पुढं सरकवत सरकवत सगळ्या वीरगळी
बाहेर आणीत होतो. आतापर्यंत बारीक पाऊस चालूच होता पण मध्येच पावसानं जोर धरला
त्यामुळं थोडं विश्रांती घेतली सगळ्यांना भुका लागल्या होत्या जवळ होती ती बिस्कीट
आणि भेळ. सह्याद्रीत भटकताना भूक लागल्यानंतर खायला जवळ काही नसेल तर चुरमुरे आणि
फरसाण हे भूक भागवण्यासाठी महत्वाचं अस्त्र आहे पिशवीत का एकदा हात घातला कि माणूस
खातच जातो. यांन पोट तर भरतच नाही व नंतर परत भूकहि लागत नाही अन तिसरी सगळ्यात
महत्वाची गोष्ट म्हणजे परसाकडली तिकडं नेमकं काय होत ते हिथं सांगत नाही कधी
सह्याद्रीत भटकायला गेल्यावर उपाशी असला तर एकदा घ्या अनुभव कारण भेळ खावं अन खुद
जान जाव. पण वारी गडकोटांची परिवारानं गेली ४-५ वर्ष सह्याद्री चढताना वाटत कुठं
भूक लागली किंवा पावसामुळं चूल नाही पेटली तर याच अस्त्रावर आमच्या पोरांनी मोठं
मोठे ट्रेक सर केलेत पण नंतर परसाकड गेल्यावर काय होत ते इचारू नका. खाऊन झाल्यावर
पावसानं विश्रांती घेतली होती मग आम्ही कामावर जोर दिला.

 |
सगळ्या वीरगळी बाहेर काढल्यानंतर
|
सगळ्या वीरगळी बाहेर
काढून झाल्या. त्यांवर भरपूर शेवाळ चढलेल होत कितीही पाणी मारलं तरी वाढलेले शेवाळ
निघत न्हवत तेव्हा वीरगळींवरची शेवाळ आणि माती काथ्या, कपडा एवढंच काय तर ते हाताने घासून पोरं स्वछता करू लागली. वीरगळ म्हणजे ज्या
वीरांना युद्धप्रसंगी लढताना वीरगती प्राप्त होते त्या वीरांची आठवण पुढच्या
पिढयांना राहावी म्हणून एका दगडी शिळेवर त्या वीराची लढतानाची चित्रे, महादेवाची पूजा करतानाची चित्रे शिल्पांकित केलेली असतात त्याला वीरगळ म्हणतात
तर सतीगळ किंवा सतीशिळा म्हणजे धर्मपालन व पतीप्रेमाने सती जाणाऱ्या स्त्रीची आठवण
म्हणून सपाट दगडावर सतीचा हात कोरलेला असतो त्या हातात बांगड्यांचा चुडा असतो.
त्याच्यावर हाताच्या बाजूला चंद्र सूर्य कोरलेले असतात. जो पर्यंत चंद्र सूर्य
तळपत आहेत तो पर्यंत सतीची कीर्ती राहील असा त्याचा अर्थ होतो. आम्ही बाहेर
काढलेल्या वीरगळींमध्ये चार वीरगळी होत्या तर चार सतीगळ होत्या. मंदिराच्या उजव्या
बाजूला देवाच्या न्हाणी घराजवळ बरेच लहान लहान नंदी आहेत तिथे आम्हला एका तुटलेल्या वीरगळीचा
आर्धा भाग सापडला तो उचलून त्याची साफसफाई करून सगळ्या वीरगळीं सोबत ठेवला. तेव्हा
तिथेच मंदिराच्या चौकटीचे पडलेले अवशेष दिसले. प्रत्येक पुरातन मंदिरात प्रवेश
करताना वरती जशी गणेशपट्टी असते तशीच गणेशपट्टी तिथे आम्हला दिसली पण त्या दगडी
पट्टीवर कोरलेला आकार थोडा हनुमान सारखा वाटत होता तर थोडा गणपतीसारखा मग ती नेमकं
गणेशपट्टी आहे कि हनुमान पट्टी यावरून पंक्याच्यात अन माझ्यात जुंपली.
 |
मारुतीराया कि गणराया
|
 |
स्वच्छतेनंतरच्या वीरगळी
|
सगळ्या वीरगळी बाहेर काढून स्वच्छ करून झाल्या
होत्या नंतर परत आधीच्या ठिकाणी काही अवशेष सापडतायत का याचा आम्ही शोध घेत होतो
पण मंदिराच्या बांधकामाचे बरेच मोठे पुरातन अवशेष दाट झाडीत पडून आहेत पावसात तिथं
पर्यंत पोहचणं अवघड होतं त्यामुळं आम्ही थोडं आवरत घेतलं पाच वाजत आले होते. सकाळी
झाडीत पडलेल्या शेवाळ चढलेल्या अस्ताव्यस्त पडलेल्या वीरगळी आणि आता कामानंतरच्या
वीरगळी. पोरांनी चार तास भर पावसात घाम गाळून केलेली मेहनत समोर दिसत होती. काम
करताना कोणी माग पुढं बघितलं नाही त्यात दगडी शिळांच वजन असो कि वीरगळींखाली काय
असेल याची कशाचीही पर्वा न करता शुभमने घातलेला हात असो कि बाबानं बादलीची कडी
तुटोस्तर उपसलेले पाणी असो. आम्ही वारकरी सह्याद्रीचे या ब्रीदवाक्याला साजेशी
कामगिरी ह्या वारी गडकोटांचीच्या वारकऱ्यांनी केली होती. लोकांना दिसायला या
वीरगळी म्हणजे फक्त दगड दिसतील पण या ज्या वीरांच्या स्मरणार्थ हि लहान-सहान
स्मारक उभी केली गेली आज इतिहासाला त्या वीरांची नावं माहीत नसली तरी ज्यांनी या
मातीसाठी रणांगणात रक्त सांडलं त्या वीरांच्या स्मारकांची अशी माती होता काम नये
यासाठी वारी गडकोटांची परिवाराने स्वातंत्र्यदिनी त्या ज्ञात अज्ञात वीरांच्या
स्मरणार्थ केलेली हि छोटीशी सेवा. काम उरकल्यानंतर सगळा पसारा आवरून आता मढे
घाटाची वाट धरायची होती. त्याआधी सोबत आणलेल्या तिरंग्याला वंदन करून राष्ट्रगीत
करून भोरडी वीरगळ संवर्धन मोहिमेचे सांगता केली. यावेळी राष्ट्रगीत एकदम ओके एका
सुरात झालं कारण यावेळेस पवार साहेबानी सूर थोडा कमीच लावला होता बरकां.
 |
वारी गडकोटांची परिवार
|
 |
राष्ट्रगीत
|
केलेल्या कामासमोर एक
सेल्फी तो बनताय सगळ्यांचे फोटो काढून झाल्यावर आवरल्यानंतर शाकाल अन गांधीजी
म्हणजे आमचे बाबाजी सापडले. शाकाल कसा एकदम दाढी वाढलेला गुळगुळीत टकलं तर चष्मा
घालून हातात तिरंगा घेऊन मढे घाटाच्या यात्रेला निघालेले बाबाजी. गाड्या काढून मढे
घाटाच्या मार्गाला लागलो. मढेघाटावरची सगळी जत्रा परतत होती अन आम्ही मढे घाटाकड
जात होतो. पूर्ण दिवस भोरडीतच गेल्याने व मुक्कामाचा काही प्लॅन नसल्याने उपांड्या
घाट ते मढे घाट या घाटवाटांच्या भटकंतीचा बेत पुढच्या वेळेसाठी राखून ठेवला आज
फक्त धबधबा जिथपर्यंत कोसळतो तिथपर्यंत उतरून परत यायचं ठरवलं. केळद गावातच
गर्दीचा अंदाज आला, सुट्टी असल्यानं
इथं सगळी पर्यटकांची जत्रा भरली होती. अलीकडंच गाड्या लावून आम्ही मढे घाटकडं
निघालो. मढे घाट म्हणजे मढे या नावातच इथला इतिहास दडलाय "आदी लगीन
कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं" हे एक वाक्य ऐकलं कि आजही आपल्या डोळ्यासमोर
सिंहगडाचा सगळा रणसंग्राम उभा राहतो. ज्यांनी स्वराज्यकार्यासाठी आपल्या प्राणांची
आहुती दिली. आऊसाहेबांना व महाराजांना दिलेला शब्द जपला अन कोंडाण्यावर मुघलांची
धूळधाण उडवून गड स्वराज्यात आणण्यासाठी ज्या सिंहाने आपला देह सोडला त्या नरवीर
सुभेदार तानाजीराव मालुसरेंचा देह हाच घाट उतरून पुढे कोकणात शिवथर मार्गे उमरठला
गेला होता. अश्याच अनेक देश आणि कोकणाला जोडणाऱ्या घाटवाटात इतिहासाची अनेक गुपित
दडलेली आहेत त्यांच्या वाटा तुडवल्याशिवाय ती कळत नाहीत. साडेपाच सहा वाजत आले
होते अजून भरपूर उजेड होता आम्ही मढे घाटा कडे निघालो तेव्हा आजूबाजूची सगळी जण
आमच्या पोरांकडं बघत होती सगळी कापडं चिखलान माखलेली पाठीवर त्या मोठं मोठ्या बॅगा
अन त्यात हातात तिरंगा घेऊन सगळ्यांच्या पुढं बाबाजी. मढे घाट म्हणजे इतिहासाचा
स्पर्श झालेला अन त्यात ढगांचा कापूस पिंजून तुफान कोसळणाऱ्या धबधब्यांना झेलत खडा
टाकलेला सह्याद्री हा सगळा नजारा जगायचा असेल तर गर्दी नसेल त्या दिवशी सवड काढूनच
इकडं यायला पाहिजे. सगळीकडं धुक्याची चादर पसरली होती वेळ कमी होता त्यामुळं आम्ही
पटपट चालत घाट जिथून चालू होतो त्या घळीतून उतरू लागलो अन वरून कोसळणाऱ्या
धबधब्यापाशी येऊन पोहोचलो.
 |
मढेघाट
|
अजस्त्र कड्यावरून कोसळणाऱ्या ह्या धबधब्याची प्रचंडता कोसळताना होणाऱ्या
त्याचा आवाजातच सामावली होती. मी विक्या व शुभम मनसोक्त याखाली भिजलो अंधार पडत
होता त्यामुळं लवकर आवरत घेतलं अन पुन्हा वर साधू लागलो. सकाळपासून काय लका तुम्ही
काहीच चालत नाही म्हणणारा, पहिल्यांदाच
आमच्या सोबत आलेला पंक्याचा भाऊ प्रशांत चढताना मात्र गपगार पडला नळी दुखतीया, नळी दुखतीया म्हणत चढला कसबसं. वर आल्यावर कणीस शोधत होतो सगळी कड नुसती गर्दी
होती त्यामुळं गाड्यांजवळ जाऊनच कणीस खाऊ म्हणून निघत होतो तेवढ्यात मढे घाटावर
जत्रेनं घातलेला धिंगाणा बघून केळद गावचे काका आमच्या पोरांकडे बोट दाखवून तिथल्या
पर्यटकांना सांगत होते, " हि बघा पुण्याची पोरं कशी नियोजन करून शिस्तीत
फिरत्यात हि पोरचं निसर्गाचा खरा आनंद घेत्यात." हे ऐकून दिवसाचं सार्थक
झाल्याचं समाधान मिळालं कारण सह्याद्री enjoy करायला नाही अनुभवायला आणि जगायला शिका फिरायला आणखी मज्जा
येईल.
गाड्यांजवळ आलो आणि तिथेच
कणसाची ऑर्डर दिली. बोलता बोलता कणीस भाजणाऱ्या मावशी जवळ रायलिंग अन बोराट्याच्या
नाळीचा विषय काढला तेव्हा मावशी ज्या चालू झाल्या त्या थांबतच न्हवत्या त्याच कारण
म्हणजे बोराट्याची नाळ उतरल्यावर येणार गाव म्हणजे या धुमाळ मावशीचं माहेर मग
त्यांनी पुढं रायगडापर्यंत कस जायचं सगळी सगळी माहिती सांगितली एवढंच काय तर
त्यांचं माहेरचं नावही सांगितलं कशासाठी तर आम्हला बोराट्याची नाळ उतरल्यावर काय
मदत लागलीच तर भोसल्यांच्या घरी जाऊन या जिजाबाईंची ओळख सांगितली तर सगळी मदत
करतील ते. अशी हि सह्याद्रीची माणसं. त्यांच्या जवळ मशरूम होते त्यांनी आम्हला गळंच
घातली कि मशरूम घेऊन जा अन कालवण करा म्हणून, कणीस खाऊन झाल्यावर गाड्या बाहेर काढल्या. पाऊस थांबला होता
पण दिवसभर पावसातच असल्यानं थंडी वाजत होती त्यामुळं फुल पॅक होऊन गाड्या परतीच्या
मार्गाला लावल्या. वेल्हा गाठलं तेव्हा अंधार पडला होता रेंज नसल्यामुळं सकाळ
पासून घरी काय फोन न्हवता त्यामुळं पुढं वेल्ह्यात गेल्यावर घरी फोन केला. वेल्ह्यातून
निघाल्यानंतर सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर पावसाच्या जलधारा अंगावर झेलत
रात्रीच्या अंधारात गुडूप झालेल्या तोरणा व राजगड या दोन गडपुरुषांना नमन करत
नसरापूरच्या मार्गला लागलो पुढे हायवेला लागून जय भवानी हॉटेल मध्ये जेवण उरकून
घराकडची वाट धरली. आजवर गडांवर साजरा केलेल्या स्वातंत्र्यदिनांपैकी यंदाचा स्वातंत्र्य
दिन सगळ्यात आठवणीतला आहे. मातीसाठी बलिदान दिलेल्या त्या वीरांच्या स्मारकांची
माती होता कामा नये म्हणून केलेली हि भोरडी वीरगळ संवर्धन मोहीम. सह्याद्री पालथा
घालताना इथल्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच या दऱ्याखोऱ्यात कडेकपारीत घडलेल्या
इतिहासाची जाणीव आपल्याला होते. सह्यादीचा वा गडांचा आजवर पुस्तकांतून वाचलेला
इतिहास त्या जागी गेल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो व त्यातूनच जाणीव होते
कि दगड धोंड्यातुन पोलादी मनगटांच्या साथीने उभं केलेल्या स्वराज्याचं अन या
आपल्या ऐतिहासिक वारश्याचं देणं आपण लागतो त्यातूनच वारी गडकोटांच्या परिवाराने
केलेली हि छोटीसी सेवा.
दि. १५ ऑगस्ट २०१८
या भटकंतीतले इरसाल नमुने :
पवार साहेब, विक्या म्हणजे विकास पवार.
बाबा, बाबाजी म्हणजे निलेश हडगे.
पंक्या, शाकाल म्हणजे पंकज गायकवाड.
शुभम पवार, प्रशांत गायकवाड.
अन मी म्हणजे मी.
वारी गडकोटांची परिवार.
 |
वीरगळ संवर्धन झालेलं काम
|
 |
बाबाजी
|
 |
नुसता जोर
|
 |
शाकाल अन बाबाजी
|
👌👌🙏🙏
ReplyDeleteKhup chan
ReplyDelete👌👌👌👌👌
ReplyDeleteमी या मंदिरात नेहमी जात असतो.मंदिर विषयी जास्त कोणाला माहिती नाही.सद्या मंदिरच काम जोरात सुरू आहे व लवकरच एक चांगलं पर्यटन स्थळ बनेन.....
ReplyDelete