रायलिंग पठार
डिसेंबर उजाडू लागला कि या वर्षाखेरला कुठली भटकंती करायची याची शोधाशोध चालू होते. जसं भटकंतीचा दिवस जवळ येतो तसं विक्याची अन माझी फोनाफोनी वाढू लागते. या वर्षाखेरला दिवाळीच्या वेळेसचा राखून ठेवलेला प्लॅन सोनगिरी अन बाकीच्या चार किल्ले करायचं ठरलं होतं त्यानुसार ३१ व १ कि १ अन २ तारखेला जायचं हा प्रश्न होता कारण कॉलेजला होतो तेव्हा बरं होतं पाहिजे तेव्हा सुट्टी घेत होतो पण आता ३१ ला सुट्टी मिळत न्हवती त्यामुळं १ व २ तारीख ठरली. वारी गडकोटांचीच्या सगळ्या सरदार उमरावांना आवताण धाडली बाबा तर घरी होता त्यामुळं तो येणार न्हवता पंक्या,शुभम,वैभव,विक्या व मी असं पाच जण जाणार होते. ठरल्याप्रमाणं निघायच्या आदल्या दिवशी रात्री मी विक्या शुभम फायनल प्लॅन ठरवायला बसलो कुठला किल्ला आधी कुठला नंतर मुक्काम कुठं करायचा हे सगळं ठरवेपर्यंत ११ वाजले. पंक्याला आधीच सांगितलं होत असं असं उद्या जायचं आहे त्यावेळेस येतो बोलला व नंतर रात्री सडे अकराला फोन करून म्हणतोय जमायचं नाही उद्या मग आधी त्याला चार शिव्या ऐकवून विक्याला फोन केला असा असा शॉट झालाय पंक्या नाही म्हणतोय कसं करायचं कारण चार किल्ले करायचं म्हंटल कि पाच जण तरी पाहिजेतच त्याशिवाय त्या भटकंतीला रूप नाही येत. आता उरलो आम्ही चारच त्यात वैभव आला तरी असं पण वैभव नटूरे क्लिकरच आपलं इंग्लिश vloging करत त्याच्याच नादात असतोय त्यामुळं आम्ही तिघेच मी विक्या शुभम असल्यामुळं फक्त एक दिवसच जायचं ठरलं मग परत आता कुठं जायचं हे ठरवे पर्यंत साडे-बारा एक वाजले अन रायलिंग पठार करायचं फिक्स झालं. सोनगिरी अन बाकीच्या चार किल्ल्याचा कागदावर असलेला प्लॅन दिवाळी पासून रखडतोय त्याला कधी मुहूर्त लागतोय काय माहिती. सकाळी सहाला निघून लागलो पुणे-बेंगलोर हायवेला. नसरापूरवरून वेल्ह्याकडे निघालॊ. तोरणा, राजगड, मढेघाट, भोर्डी ह्या वाऱ्या करून नसरापूर ते वेल्हे रस्ता कसं नुसता तोंड पाठ झालाय आंबवणे, पाल, विंझर, साखर, वाजेघर, मार्गसनी गुंजन मावळात सह्याद्रीच्या कुशीत वसलेली हि गाव अन सह्याद्रीचा दागिना शोभणारे आभाळाशी स्पर्धा करणारे दोन गडपुरुष राजगड अन तोरणा. एक स्वराज्याची पहिली राजधानी तर दुसरं स्वराज्याचं पहिलं तोरण हे सार डोळ्यात साठवत आमची दौड चालू होती.
१ जानेवारी असल्यानं तोरण व राजगडला जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. वेल्हे झाल्यावर डाव्या हाताला नावाला जगणाऱ्या प्रचंडगडाचा आवाका संपत न्हवता तर अथांग पसरलेलं गुंजवणी धरण ह्यांच्यातून वाट काढीत आमची सह्याद्रीची सफारी भट्टी गाव पास करून सिंगापूर जवळ करीत होती. भट्टी गावातून वर आल्यानंतर लांबवर जागोजागी ढगांचे पुंजके दिसत होते ते कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी थांबलो तिथेच रोडच्या कडेला रोड रोलर लागला होता मग काय त्याच्या वर फोटोशूट चालू झालं. साऊथ स्टाईलच्या पोज मधलं फोटोशूट उरकून केळदकडे जाणारा रोड सोडून उजव्या हाताने सिंगापूरकडे निघालो. आतापर्यन्त पाठमोरी असणारी तोरणा व राजगडची जोडगोळ भव्य एकत्र रूपात दिसत होती. संपूर्ण आकाश निरभ्र असल्यानं तोरण्याची बुधला अन राजगडाची संजीवनी यांना जोडणाऱ्या दांडावरून केलेली तोरणा ते राजगडची भटकंती डोळ्यांसमोर उभी राहिली. फाट्यावरून ७ ते ८ किलोमीटर सिंगापूर व मोहरी आहे. अर्ध्यापर्यंत रस्ता चांगला आहे तर पुढं मोहरी पर्यंत पूर्ण ऑफ रोडच आहे. सिंगापूर झाल्यानंतर मोहरीहुन आत रायलिंगकडे जाणाऱ्या दिशेनं निघालो.
मोहरी जवळ येत होतं तसं लिंगाण्याचा माथा डोकं वर काढत होता. दहाच्या आसपास मोहरी गावात पोहचलो. आमच्या आधी आलेल्या काहींनी रस्ता खराब व अरुंद असल्यानं गाड्या अलीकडंच लावल्या होत्या पण सफारीला अश्या रस्त्यांची सवय झालीय अन तिला विक्या सारखा adventureचा किडा असलेला ड्राव्हर सुद्धा लाभलाय त्यामुळं महाराष्ट्रातला कुठलाही रस्ता अन घाट असुद्या विक्या अन सफारीची जोडी हीटच असणार. मोहरी गावातील वस्ती झाल्यानंतर जिथं रायलिंगला जायला वाट फुटते तिथं गाडी लावून रायलिंग पठाराकडं निघालो. सुरवातीची वाट दाट झाडीतून असल्यानं सूर्याशेठचा प्रकोप तेवढा काही जाणवत न्हवता. रायलिंगला दोन वाटा जाताता एक नेहमीची वापरातली तर दुसरी डोंगराला वेढा मारत जाणारी वाट. आम्ही अगोदर नको उगा जास्तीची तंगडतोड म्हणून पहिली वाट निवडली पण नेमकं जिथं या दोन्ही वाटा वेगळ्या वेगळ्या होतात तिथून आमची पावलं बरोबर दुसऱ्या वाटेकडं पडू लागली आता पायांना सुद्धा मळलेली सोयीस्कर वाट नको झालीये म्हणून तर वाट वाकडी करत शिरलो झाडीत. हि दुसरी वाट म्हणजे पठाराच्या उजव्या बाजूच्या दरीच्या कडेने जाणारी वाट पण हि काट्याकुट्यांची दाट माजलेल्या गवतातुन जाणारी हि वाट लावणारी वाट आहे. काही ठिकाणी कातळातून पाझरत असलेल्या पाण्याने चिखल झाला आहे तर काही ठिकाणी कंबरे एवढं गवत. या वाटेवरून जाताना देशावरून कोकणात उतरणाऱ्या अनेक नाळा दिसतात तर लांबवर डोंगराच्या आडोश्याला असलेली चार-दोन घरांची वस्ती दिसते.
पावसानं तयार झालेल्या देश व कोकण यांना जोडणाऱ्या वाटा म्हणजे इथल्या माणसांनां जोडणारी नाळच आहे. रायलिंग पठाराला वेढा मारत तासाभरात आम्ही रायलिंग पठारावर असलेल्या लहान टेकडीवर आलो इथं येई पर्यंत जाम भूक लागली होती झाडाची सावली बघून बसलो. दरवेळी सह्याद्रीत असलं कि आमचा सकाळचा नाश्ता म्हणजे रात्रीच चिकनच कालवण अन भात सकाळी चुलीवर हे मिक्स करून त्याची बिर्याणी बनवायची हाच आमचा नाश्ता. पण यावेळी मुक्काम नसल्यानं दुपारी जेवायच्या टायमिंगला आम्ही बोरं, लाडू अन ब्रेड, हर्शीचा (डार्क चॉकलेट) नाश्ता केला याशिवाय पर्याय न्हवता. नाश्ता उरकून पठाराकडं निघालो. मुख्य पठारावर येऊन उभा ठाकलो समोर होता लिंगोबाचा डोंगूर अन त्याच्या मागे होता रायरीचा डोंगूर. आजवर नुसतं फोटुत बघितलेला लिंगाणा आज प्रत्यक्ष बघायचा योग्य आला. लिंगाणा म्हणजे जणू ह्या सह्याद्री मंडळात असलेलं स्वयंभू शिवलिंगच अन त्या उभा असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगड. लिंगाणा स्वराज्याचं कारागृह तर राजधानी रायगड स्वराज्याचं राजगृह. रायगड मधला "राय" तर लिंगाणा मधला "लिंग" या शब्दांना जोडून तयार होत "रायलिंग". रायलिंग वरून लिंगाण्याच्या पोटात खोदलेली गुहा दिसते तर काही पायऱ्यांचे अवशेष दिसतात. प्रत्येक सह्यभटका लिंगाणा सर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतो त्याचे बेलाग कडे साहसी वीरांना खुणावत असतात. रायलिंग पठारावरून दिसणार पाने, दापोली हि गावं तर काळ नदीचं खोरं, उजव्या बाजूच्या सह्याद्रीच्या रौद्र डोंगररांगा न्याहळता येतात.
रायलिंगवरून रायगडाचा नागरखाना, जगाचा ईशवर असलेल्या जगदीश्वराचा कळस, बेलाग भवानीकडा तर आभाळ भेदू पाहणार टाकमकीचं टोक दिसत होत. दुपारचे तीन वाजत आले होते उन्हामुळं शरीर काय तिथं थांबू देत न्हवत अन लिंगाणा व पाठमोऱ्या रायगडात गुंतलेले मन काय तिथून हलू देतं न्हवतं शेवटी तिथंच कातळावर पाठ टेकून थोडा वेळ पडी दिली. सरत्या वर्षात जानेवारीत केलेला सातारा मुलुख भाग-२ पासून ते घनगड पर्यंतच्या जगलेल्या भटकंतीचा त्या निरभ्र आकाशाकडे पाहत आकाशपटलावर त्या आठवणी उभ्या करीत होतो. सूर्यास्ताला थोडाच वेळ बाकी असल्यानं सूर्यास्त करून जायचं ठरलं तो पर्यंत वेगवेळ्या कोनातून सह्याद्रीचं फोटोसेशन चालू होतं. जसा माथ्यावरचा सूर्य पश्चिमेला कलत होता तशी आमची आतुरता वाढत होती. जशी भगव्या झेंड्याला सोनेरी जरी असावी अगदी तसंच काहीसं सह्याद्रीचं रूपड दिसत होत. भगव्या रंगानं व्यापून टाकलेलं आभाळ अन त्यात सोनेरी किरणांचा वर्षाव. रायलिंगवरूनच रायगडी चिरविश्रांती घेणाऱ्या छत्रपती शिवरायांना वंदन केलं. माथ्यावरून मावळतीला जाणारा सूर्य रायगडी निजलेल्या त्या स्वराज्याच्या शिवसुर्याला वंदन करत अस्ताला जातो.
हा डोळे दिपवून टाकणारा नजारा कॅमेऱ्यात कैद केला. आजवर केलेल्या भटकंतीत आम्ही पहिल्यांदाच एवढा वेळ म्हणजे ६-७ तास ते हि एका लहानश्या पठारावर बसून होतो का कुणास ठाऊक तिथून उठायला मन तयार होत न्हवत कारण समोर होता स्थितप्रज्ञ लिंगाणा अन त्याच मागं शिवतीर्थ दुर्गदुर्गेश्वर रायगड. संध्याकाळचे सात वाजत आले होते त्यामुळं परतीच्या मार्गाला लागलो पुढं बोराट्याच्या नाळीकडून येणारा बोलण्याचा आवाज जवळ येत होता. लिंगाण्याच्या पायथ्याला सरबत विकायला गेलेल्या गावातील महिला घराकडं परतत होत्या त्यात एक लहानशी शुभांगी होती आम्ही गावाकडं निघालो होतो अंधार पडला होता तिची आई मागून येणार असल्यानं ती एकटी आमच्या सोबत येत होती. सुट्टीच्या दिवशी आईला मदत करायला जाणारी ही शुभांगी अंधारात आम्हाला लीड करत पुढं चालत होती तिच्यासोबत गप्पा मारत आम्ही परत मोहरीकडं निघालो. काल सोनगिरी अन बाकी चार किल्लयांची मोहीम भले रद्द झाली असली तरी आजची भटकंती म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात तेही दोन स्फुर्तीस्थानांच्या दर्शनाने एक अभेद्य लिंगाणा तर दुसरा शिवतीर्थ दुर्गदुर्गेश्वर रायगड. या एकाच दिवसात कधीही न संपणाऱ्या आठवणींचं गाठोडं घेऊन परतीच्या मार्गाला लागलो.
भटकंती दिनांक - ०१/०१/२०२०
सहभाग
शुभम, विक्या, वैभव अन मी.
Comments
Post a Comment