शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून केलेल्या किल्ल्यांची सफर
जसा जसा जून
उजाडू लागतो तसं ह्या सह्यगिरीच्या भटक्यांना वेध लागते ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचे.
इथल्या कडेकपारीतून अवाज घुमू लागतो "अवघा एकचि ध्यास, रायरीला शिवभेटीची लागलीसे
आस" अन सह्याद्री मंडळात भ्रमण करणाऱ्या सह्यवेड्यांना ओढ लागते ती रायगड जवळ
करण्याची. स्वराज्याच्या धन्याला छत्रपती होताना बघण्याचा हा आनंद सोहळा. गेली दोन वर्ष
रायगडावर नगारखान्यात केलेला आनंदोत्सव इथून पुढं प्रत्येक गडावर करायचा असं आम्ही
ठरवलं त्यामुळं यंदाची ६ जूनची रायगडवारी दुसऱ्या गडावर होणार होती त्यानुसार यंदाची
वारी सह्याद्रीच्याकोणत्या डोंगररांगेतली करायची याची शोधाशोध सुरु झाली. विक्यानं
आठवण करून दिली कि आपलं imagica राहीलयं सगळ्यांच्यात adventure चा किडा असल्याने, पवारसाहेबांमध्ये
तो जास्तच होता त्यामुळं विक्याला लवकर आठवलं. भरपूर वर्षांपासून पेंडिंग असेलेला हा
imagica प्लॅन कारण सुट्टी भेटली कि सह्याद्रीच्या भटकंती शिवाय दुसरं काही सुचतंच
नाही. आम्हाला कधी सलग दोन-तीन दिवस किंवा एक दिवस जरी सुट्टी मिळाली तरी आमच्या डोक्यात
सुट्टीच्या दिवसाच्या १०-१५ दिवस आधीच आमचं planning सुरु होतं ते यावेळी कुठला किल्ला
करायचा त्यामुळं दुसरी कुठली enjoy करण्यासारखी ठिकाण डोक्यात येतच नाहीत कारण ज्याचं
एकदा का सह्याद्रीत पाऊल पडलं त्याला वेड लागते ते फक्त सह्याद्रीचा मुकुटमणी शोभणाऱ्या
गडकिल्ल्यांचे अन तिथं घडलेल्या इतिहासाचे. यावेळी विक्याने imagica ची आठवण करून दिली
.आमचा खोपोली पेन कडचा पट्टा राहिला होता त्यामुळं त्या पट्टयात येणाऱ्या गडांची माहिती
गोळा करायचं काम मी सुरु केलं अन त्यानुसार प्रत्येक मोहिमेच्या एक किंवा दोन दिवस
आधी यंदाच्या भटकंतीसाठी निवडलेल्या गडांची व परिसरची चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे
ठरलेल्या ठिकाणी विक्याची अन माझी बैठक बसते त्यामध्ये निवडलेले गड त्याच्या वाटा मुक्कामाची
जागा कोणता गड आधी करायचा कोणता नंतर याची क्रमवारी हे सगळं काही ठरत ते त्या
"निवांत" चालणाऱ्या बैठकीतच तो पर्यंत आमच्या वारी गडकोटांचीच्या परिवारातल्या
कुणालाही गाडीत बसे पर्यंत यावेळी नेमकं आपण कुठं जाणार हे कोणालाही माहिती नसतंय.यावेळी
उंबरखिंड हे स्वराज्याच्या रणसंग्रामात घडलेल्या महत्वाच्या लढाईचं ठिकाण अन मृगगड,सरसगड,सुधागड
हे किल्ले व अंगात जोश अन वेळ राहिलाच तर शेवटी imagica सुद्धा करायचं ठरलं त्यानुसार
वेगवेळ्या ठिकाणी नामजाद असणाऱ्या आमच्या सरदार उमरावांना आवताण धाडली. बीड प्रांती
असणाऱ्या पंकज पासून via कोंढवा प्रभावळीचे सरदार निलेश अन फलटण सुभ्यावर असणारे आमदार
स्वप्नील तर निगडी जहागिरीतले करण अर्जुन शशी, शुभम पासून ते कधीही ट्रेकला न येणाऱ्या
फौजेचे सुभेदार राहुल,शिवा पर्यंत सगळ्यानां आवताण धाडली यातून शुभम,बाबा,पंक्या,वैभव
हे तयार झाले अन मी,विक्या असे ६ जण निघायचं ठरलं. ६ जून २०१९ ला सकाळी लवकर निघायचं
ठरलं. आम्हाला सह्याद्रीची सफारी घडवत सुखरूप गडाच्या पायथ्यला पोहचवणारी सफारी सफारी
मोहिमेवर कूच करायला तयार होती. सकाळी लवकर निघून एक-एकला उचलत एक्सप्रेस-वेला लागलो.
गाडीत बसल्यानंतर
शुभम पंक्या अन बाबाला कळलं कि नेमकं कुठं जायचं आहे ते. सगळ्या सरदार उमरावांच्या
पंक्याच्या भाषेत इथाली तीथाली ख्याली खुशहाली घेत एक्सप्रेसला विक्याचा पांढरा घोडा
शंभरी क्रॉस करू लागला तेवढ्यात चर्चा सुरु झाली ती पंक्याने आणलेल्या नव्या कोऱ्या
सॅमसंगच्या सत्तर हजाराच्या मोबाईलची अन गॅजेट्सचा किडा असलेल्या बाबाकडून त्याचं इन्वेस्टीगेशन
चालू झालं माग डिक्कीत वैभव आपला एकटा मागच्या झालेल्या किल्ल्यांची त्याची उजळणी
चालू होती. वाटेत मळवली आलं कि आठवण येते ती लोहगडाची, २०१३ साली भर पावसात डोक्याएवढ्या
कारवीतून उतरत केलेला भाजे लेणी ते लोहगड ट्रेकची. माझा अन विक्याचा एकत्र केलेला हा
पहिला ट्रेक. लांबूनच लोहगड विसापूर डोळ्यात साठवत पुढे निघालो खोपोली exit पासून खाली
उतरून पाली रोडला लागलो वाटेत imagica च्या समोर असणाऱ्या साई हॉटेल मध्ये नाश्त्याला
थांबलो. नावावरून तर चांगलं हॉटेल वाटलं होतं पण चव न्हवती विक्याचा शब्दात म्हंटल
तर "बकवास परत नसतो येत" त्यामुळं हाय ते इडली,डोसा, मेदुवडा सांबार दाबून
हाणल्यानंतर गाडी उंबरखिंडीच्या मार्गाला लागली. पाली-खोपोली रोडवर शेमडी गावचा फाटा
लागतो तिथून थोडंच अंतर आत गेल्यावर वाटेत उंबरखिंडीची पाटी दिसते. आम्ही सकाळी ९ च्या
सुमारास उंबरखिंडीत पोहोचलो. पुणे-रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या कुशीत
दडलेली उंबरखिंड. १६६० साली शायस्ताखन स्वराज्यावर चालून आला होता.पुण्यात त्यानं आपला
तळ ठोकला होता त्यावेळी त्याला चाकणचा संग्रामदुर्ग सोडता दुसरा कोणताही गड जिंकता
आला न्हवता त्यावेळी त्याने त्याच्या फौजेतील सरदार कारतलब खानाला कोकणच्या मोहिमेवर
पाठवले. वीस हजारांची फौज घेऊन कुरवंडे घाट उतरून उत्तर कोकण घेऊ पाहणाऱ्या कारतलब
खानाच्या फौजेची मराठ्यांच्या फौजेने केलेली फजिती म्हणजे उंबरखिंडीची लढाई. कुरवंड्या
घाट उतरून सुखरूप आलो असं कारतलब खानाला वाटलं असलं पण झाडीत दबा धरून बसलेल्या मराठ्यांच्या
फौजा खान घाट उतरयचीच वाट बघत होत्या. चावणी गाव नजीक हि लढाई सुरु होती जवळच असलेल्या
टेकडीवर खुद्द शिवाजी महाराज युद्धवेश परिधान करून या लढाईची पहाणी करीत होते. आपण
चारही बाजूने वेढले गेलोय हे खानाच्या लक्षात आल्यावर महाराजांसमोर त्याने गपगुमान
शरणागती पत्करली. खानाला वाटत होतं तो त्याने आखलेल्या मार्गने कोकणात उतरतोय पण त्याची
झालेली हालत बघून मावळे म्हंटले असतील "तू आया नहीं लाया गया हैं "असा हा
महाराजांचा गनिमीकावा. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याने आखलेल्या युद्धतंत्रात
त्यालाच अडकवून विजय कसा मिळवतात हे दाखवाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या यद्धतंत्राची
व गनिमी काव्याची अनुभती म्हणजे उंबरखिंडीची लढाई. चावणी गावच्या अलीकडे आंबा नदीपात्रात
या लढाईच्या समरणार्थ शौर्य स्मारक आहे त्या पराक्रमाच्या अखंड परंपरेला मुजरा करून
आजूबाजूच्या परिसराची मुलुखगिरी केली.
![]() |
समरभूमी उंबरखिंड |
घरात बसून
पुस्तकात वाचलेला इतिहासाचं कौतुक वाटतं पण तोच इतिहास त्याच जागेवर अनुभवणं याला इतिहास
जगणं म्हणतात अन आम्ही वारी गडकोटांची परिवार तो अभिमानाने जगत आलो आहोत. आंबा नदीच्या
पात्रात असलेलं हे स्मारक पावसाळा सोडून इतर वेळी हे पात्र कोरड पडत त्यामुळे विक्याने
गाडी थेट नदी पात्रात टाकली. पाण्याच्या प्रवाहामुळे इथं लहान मोठी खळगी झालेली आहेत
असंच एक बाबाच्या size चं खळगं सापडलं तेव्हा पंक्या अन विक्यान बाबाला उचलून खळग्यात
टाकला. सेल्फी काढायला सेल्फी स्टिक विसरली होती पण बाबा असल्यावर कशाला लागतंय ते
दांडक त्याच्या पेक्षा लांब बाबाचा हात जातुया.
विक्याच अन
माझं आता पुढचा गड कोणता घ्यायचा मृगगड कि सुधागड हे चालू झालं. सुधागड चढायला जास्त
असल्यानं तो आधी करायचा ठरलं त्यामुळं पालीच्या दिशेने पुढे निघालो जाताना वाटेत दूरवर
तैल-बैला सुळका अन डोकावणारा घनगड दिसतो. पुढे पाली गावात गेल्यावर सरसगड दिसू लागतो.
सुधागड सर करण्यासाठी दोन वाटा आहेत एक पच्छापूरची शिडीची वाट अन दुसरी धोंडसे गावातून
जाणारी वाट.पच्छापूरची वाट थोडी सोपी अन गड लवकर गाठणारी होती म्हणून आम्ही ती वाट
निवडली. पण गुगलरावच्या कृपेने धोंडसे गावात येऊन पोहोचलो. धोंडसे गावातून जाणारी वाट
हि लांबून अन जंगलातून जाणारी होती तसेच हि वाट थेट सुधागडच्या महादरवाज्या पर्यंत
जाते एवढी माहिती मी वाचली होती. साधारण ११ च्या सुमारास आम्ही गावात पोहचलो गावात
गाडी लावून गडाकडे जाणाऱ्या वाटेला लागलो गावातून गडमाथा तर जास्तच उंचीवर दिसत होता
त्यामुळं लईच तंगडतोड करायला लागणार हे फिक्स होत मुक्काम सरसगडला करायचा असल्यानं
सोबत जास्त काही सामान न्हवतं. गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ओढ्यावरच्या पुलाच्या
अलीकडूनच डाव्या हाताची वाट धरली अन उजव्या हाताला ओढा ठेऊन शेतातल्या बांधा बांधावरून
निघालो. गडाची वाट दाखवणाऱ्या दिशा दर्शक पाट्या लावल्या आहेत असं गावकऱ्यांनी सांगितलं,
आम्ही नुसतं चालतंच होतो पण पाटी काय दिसत न्हवती गड उजव्या हाताला होता ओढ्यातून गडाच्या
दिशेने जाणाऱ्या अनेक मळलेल्या वाटा दिसत होत्या तेव्हा ओढा ओलांडून त्या वाटेने निघालो
पुढे चालू लागलो पण पाटी काय दिसत न्हवती तेव्हा लक्षात आलं कि रस्ता चुकलोय त्यात
बाबाचं चालू होत चला इकडचं बरोबर हाय मी तुम्हाला नेतो बरोबर म्हणत म्हणत रस्ता चुकलो
मग काय वाट शोधायला अर्धे इधर जाओ अर्धे उधर करत मी शुभम बाबा वैभव जिकडं तिकडं पांगलो
पण वाट काय सापडत न्हवती.
धोंडसेची वाट महादरवाजातून भोराई मंदिराकडे कडे जाते एवढं
मला माहिती होतं त्यानुसार विक्याने सेव्ह केलेल्या ऑफलाईन मॅपवरून अंदाज काढत त्या
दिशेनं चालू लागलो. बाबा सांगत होता ती वाट टकमक टोकाकडं जाणारी होती पंक्याला वैतागून
नेमकं वाट दाखवत होता कि टकमक टोक काय माहित त्यानं असंच मला रोहित भैय्याच्या घरचा
रस्ता माहित आहे म्हणून गाडीवरून कात्रज फिरवलं होतं बाब्याला शिव्या घालत पवार साहेबांनी
दाखवलेल्या वाटेवर पाऊल टाकत चालू लागलो आता विक्यानं सांगितलेली वाट त्याच्या सारखीच
येडीवाकडी झाडीतून काट्याकुट्यातून जाणारी असंच एका घसाऱ्या वरून उतरत असताना ओढ्याच्या
पलीकडं झाडाला लटकवलेली बारीक सुधागड नावाची पाटी पंक्याला दिसली त्या पाटीच्या दिशेनं
निघालो.
![]() |
शेवटी दिसली |
पंक्याचं जसं वय वाढतंय तस डोळे तीक्ष्ण होत्यात वाटतंय भावाला एवढ्या दाट झाडीतून बारीक पाटी दिसली. सह्यद्री एक मायाजाल आहे. इथं आत शिरणाऱ्या वाटांसोबत बाहेर पडायच्या वाट सुद्धा माहित असाव्या लागतात. इथल्या रानावनातून चालताना मौजमजे सोबतच आपले कान डोळे उघडे ठेवावे लागतात कधी कोणता प्रसंग येईल याची खात्री नसते. इथं वाट चुकल्यानंर गोंधळून न जाता संयमाने पुढचे निर्णय घ्यावे लागतात म्हणून तर सह्याद्री पालथा घालणं म्हणजे कुण्या येड्या गबाळ्याचं काम न्हवे. ओढ्याचं पात्र मोठं होतं इथं वाहून आलेले मोठाले दगड यावरून पावसाळ्यात कोसळत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह काय असेल याचा अंदाज येतो पण आमच्या पोरांना आधी पवायचं सुचतं पण पाणी नसल्यानं राहिलं.
ओढा ओलांडून
वाटेला लागलो इथून पूढची वाट दाट जंगलात होती त्यामुळं बाहेर जाणवणारा सूर्याशेठचा
प्रकोप कमी होणार होता पण जंगलातून जाणाऱ्या वाटेची चढाई खडी होती त्यामुळे थोडी लागणार
होती त्यासाठी आमची टॉवेल गॅंग सज्ज होती. धोंडसे गावातून जाणारी वाट सहसा कोणी निवडत
नाही जास्त तर पच्छापूरच्या वाटेने जातात पण आम्ही ती माघारी न फिरता त्याच वाटेनं
निघालो होतो.घनदाट झाडीतून जाणारी वाट होती इतकी कि सूर्य डोक्यावर होता पण त्याची
किरणं आमच्या पर्यंत पोहचत न्हवती. खडी चढाई असल्यानं प्रत्येक जण उठत बसत धापा टाकत
गळ्यात टाकलेल्या टॉवेलने घाम पुसत चढत होता वाटेत हनुमान शिल्प आहे त्याचं दर्शन घेऊन
पुढची वाट सर करू लागलो वाटेत पाण्याचं टाकं आहे त्याच्यावर कुण्या अज्ञात वीराचे हातात
ढाल व तलवार घेतलेलं कातळात कोरलेले शिल्प आहे इथून पुढं जाताच बुरुजाचे व अवशेष तटबंदीचे
अवशेष दिसू लागले. तब्बल तीन साडेतीन तासांची तंगडतोड केल्यानंतर शेवटी महादरवाज्यात
येऊन पोहोचलो. हुबेहूब रायगडाच्या महादरवाज्याची प्रतिकृती असणारा महादरवाजा. गोमुखी
असलेल्या या महादरवाजावर दोन शरभ शिल्प कोरलेले आहेत तर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत.
![]() |
हनुमान मूर्ती |
![]() |
वीर शिल्प |
महादरवाज्यातून
वर आल्यानंतर अजून एका पडलेल्या दरवाजाचे अवशेष दिसतात इथून पुढची वाट भोराई देवी मंदिराकडे
घेऊन जाते. सुधागडाला तसा मोठा इतिहास आहे. १६४८ साली हा गड स्वराज्यात सामील झाला
आधी या गडाचे नाव भोरप गड होते महाराजांनी ते बदलून सुधागड ठेवले. भोर संस्थानाची राजधानी
असलेला हा गड. याच गडाच्या पायथ्ययला असलेल्या पच्छापूर गवात संभाजी महाराज औरंगजेबाचा
मुलगा अकबर यांची भेट झाली होती. भोराई देवी मंदिरासमोर अनेक वीरगळ व सतीगळ यांचं संवर्धन
करून जतन केल्या आहेत. भोराई देवी मंदिर पासून पुढे गडफेरी साठी निघालो पुढे धान्याची
चार कोठारं लागतात.
![]() |
गोमुखी आकाराची रचना असलेला महादरवाजा |
![]() |
महादरवाजा |
सुधागडावर विस्तृत जागा भरपूर आहे त्यामुळं आपल्याला इथं अनेक बांधकाम
पाहायला मिळते त्यात पंत सचिवांचा वाडा, ध्यानाची कोठार, बांधीव टाकी, पडलेले अवशेष,
भोराई मंदिर, शिव मंदिर. भोराई मंदिरात भली मोठी घंटा आहे.
![]() |
मंदिर परिसरात असलेल्या वीरगळ |
मंदिराच्या आवारात एक दीपमाळ असून त्यावर एक हत्ती
कोरला आहे. सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकारवाडा हा इ.स. १७०५ साली बांधलेला
आहे. गडावरून सरसगड तैलबैला घनगड हा प्रदेश स्पष्टपणे नजरेत येतो. सगळ्यांच्या उड्या,फोटो,
वैभवचा बॉडी शो सगळं सगळं झालं. तीन वाजत आले होते पुढं सरसगड करायचा असल्यानं गडफेरी
आटोपती घेऊन परतीची वाट धरली. गड उतरत असताना नटूरे क्लीकर वैभव इंग्लिश मधून
vloging करत होता अन आम्ही त्याला नुसतं या या करत उतरत होतो. बिअर ग्रिल्स भाऊंच्या
स्टईलनं उतरत तास-दिडतासत गड उतरून खाली आलो.
आता पुढचं
लक्ष होतं सरसगड. फक्त सकाळच्या इडलीवर पोरांनी ६ तासांची तंगडतोड केली होती त्यामुळं
आता पोटात कावळं आरडायला लागली होती म्हणून आधी पालीत जाऊन काय तर खाऊन सरसगड सर करायचा
ठरलं. सुधागड ते पाली ८ ते ९ किलोमीटरच अंतर होत. उशीर झाल्यानं गडावरून दिसणारा सूर्यास्त
काय सापडणार न्हवता. पालीत वडापाव खाल्यानंतर मी अन विक्या रात्रीच्या बेतासाठी चिकन
घ्यायला निघालो. सगळी जमवा जमव करे पर्यंत अंधार झाला त्यामुळं गडावर आता जायचं कि
सकाळी हा प्रश्न निर्माण झाला. गड चढायला एक-दीड तास अन त्यात सगळं सामान घेऊन अंधारात
चढायचं म्हंटल्यावर दोन-अडीच तास लागणार होते तरी गडावर जायचा निर्णय झाला. पाली मंदिराच्या
अलीकडूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे तिथं दुकाना जवळ बसलेल्या भावाला गडावर कसं जायचं
विचारलं त्याने सांगितलेल्या वाटेनं चालू लागलो त्यानं त्याच्या घर पर्यंत वाट दाखवली
आणि इथून वर जावा म्हणून सांगितलं. भाऊ तिथं टाकून बसला होता वाटतं काय सांगत होता
ते सुद्धा नीट न्हवत कळत त्यानं जस सांगितलं तस मोबाईलच्या उजेडात वाट धरून निघालो.
घरं झाल्यानंतर चढायला सुरवात झाली. गड गावाजवळ असल्यानं गडावर चांगलाच राबता असणार
त्यामुळं वाट मळलेली अन प्रशस्त असणार हे नक्की होतं पण आम्ही चालत होतो ती वाट निमुळती
होत जात होती पुढं ती गुरांची वाट होती त्यामुळं काय तर गंडतय हे लक्षात आलं आणि त्यात
बाबाला राहुल्याचा फोन आला त्याला बाबाची लई काळजी इथं आधीच किर्रर्र अंधार
त्यात वाट सापडत न्हवती अन याचा फोन. विक्यानं मॅपवर चेक केलं तर कळलं आम्ही दुसऱ्याच
वाटवर आलो होतो परत त्या वाटेवर जायचं म्हंटलंतर उशीर होईल अन असच खेळत बसलो इथंच रात्र
जायची म्हणून खालीच मुक्काम करायचा निर्णय घेतला अन आलो तिथून नीट खाली आलो. उतरताना सुद्धा बाबा व शुभमच चालू होत इकडून नाही इकडून आलो होतो या साईडन उतरू भूक लागल्यामुळं सगळ्या वाटा सेमच दिसत होत्या चढताना बाबा लीड करत होता आम्ही माग माग तर वाट चुकलीय हे लक्ष्यात आल्यावर माघारी फिरताना शुभम लीड करत होता. मळलेली वाट सोडून गुरांच्या वाटला लागलेली गुरच आम्ही. खाली रोडच्या
कडला सगळे विचार करत बसलो आता नेमकं जेवण कुठं बनवायचं व मुक्काम करायचा कुठं यावर सगळ्यांनी आपापली सूत्रं
हलवायला चालू केली समोरच एक चायनीजचं दुकान होत तिथं विक्या म्हंटला तिथं जेवण बनवायचं पण तो परवानगी देईल
कि नाही खात्री न्हवती तेव्हा थेट त्यांना जाऊन भेटलो तेव्हा तिथं त्यांनी विचारलं
तुम्ही कुठले काय इकडं कुठं असं विचारू लागले त्यांना आमची सगळी माहिती देऊन असा असा
शॉट झालाय त्यामुळं आम्ही तुमच्या इथं जेवण बनवतो आणि काय होतील ते पैशे देतो. आमच्या
सगळ्यांचे एक सारखे दिसणारे मळलेले टीशर्ट,जाड जाड शूज, दिवसभर उन्हानं काळवंडून मऊ
झालेली तोंड बघून भाऊंना काय वाटलं काय माहित पण भाऊ तयार झाले. सगळं सामान काढून त्या
हॉटेल मध्ये ठेवलं. जेवण बनवायच्या तयारीला मी,वैभव,पंक्या,शुभम,बाबा सगळे आपआपल्या
positions घेऊन तयार झालो. आमच्या मुदपाकखान्याचे प्रमुख जर मोहिमेत आम्हाला वेगवेळ्या
पद्धतीनं जेवण बनवून खायला घालणारे आमचे खानसामा विक्या उर्फ पवार साहेब हे सुद्धा
सज्ज होते. दरवेळी सारखं चूल नसून आता हॉटेल मधला मोठा गॅस होता त्यामुळं एकीकडं तांदूळ
अन चिकन शिजायला टाकलं.सगळं करून झालं होतं थेट हॉटेल मध्ये जाऊन त्यांच्याच गॅस वर
आपलं जेवण बनवायचं एवढच बाकी होत अन या भटकंतीत ते ही झालं.
बाब व पंक्या
या दोन शाकाहारी बोकडांना नेहमी प्रमाणे बाबाच्याच स्टाईलची भाता सोबत खायला veg ग्रेव्ही
बनवली. भूक आता कंट्रोल होतं न्हवती आडवा तिडवा हात मारत चिकन फस्त झाल्यावर सगळं उरकून
सामानाची आवरा अवर करून हॉटेलच्या मालकाला धन्यवाद सांगून पैसे द्यायला गेलो तेव्हा
त्यांनी पैसे घ्यायला नकार दिला नंतर आग्रह केल्यांनतर त्यांनी घेतले. आता टेंट टाकायला
कुठं व्यवस्थित जागा न्हवती म्हणून आजचा मुक्काम बल्लाळेश्वर मंदिराच्या भक्त निवासात
करायचं ठरलं. भक्त निवासात २० रुपयात एवढी सोय होत असल्यावर कशाला दुसरीकडं जायची गरज.
भक्त निवासात गेल्यावर कुणी हातपाय धुतले तर कुणी अंघोळ उरकली. सकाळी लवकर उठून सरसगड
सर करायचा होता. दिसभरातल्या पायपिटीमूळ पडल्या पडल्या कधी झोप लागली कळलं नाही. कुठंही
जाऊद्यात काही झालं तरी अडीअडचणीला सह्याद्रीच्या भटक्यांना मदत ही मिळतेच अनेकदा याचा
अनुभव आम्हाला आला आहे. सूर्योदय गडावरून पाहायचा होता पण पोरांना भक्त निवासातली सोया
जरा जास्तच आवडली सकाळी लवकर कोणाला जागच अली नाही. आता सूर्योदय तर गेला त्यामुळं
पटापट आवरून गडाच्या दिशेनं निघालो. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या
माथ्यावर वसलेला किल्ला म्हणजे सरसगड. आपल्या आगळ्या वेगळ्या आकारामुळं सरसगड लांबूनच
लक्ष वेधून घेतो. सकाळी सातला गड चढायला सुरु केला. रात्री कशामुळं वाट चुकलो हे आता
लक्षात येत होतं घरांची वस्ती संपल्यानंतर उजव्या हाताला झाडीत जायचं होत आम्ही सरळ
गेलो त्यामुळं चुकलो. सरसगडाची चढाई दोन टप्प्यातली आहे पहिला लहान टप्पा झाडीतून जाणारा
आहे वर आल्यानंतर खडी चढाई आहे जी आपल्याला कातळात खोदलेल्या पायऱ्यांजवळ घेऊन जाते.
झाडीचा टप्पा झाल्यानंतर वरून ऊन त्यात घामटा काढणारी खडी चढण.
मी विक्या
पुढे होतो तर मागून बाबा पंक्या येत होते सगळे घामाघूम झालो होतो शर्ट काढून पण बघितला
पण चटके बसत होतो त्यामुळं आहे तसंच चालू लागलो पंक्या शर्ट काढून येडीवाकडी
चाल टाकत गड सर करू लागला. शुभमच्या पायाला ठेच लागल्यामुळं तो आमच्या
मागन हळूहळू येत होता. वैभवची कालच्या तंगडतोडीची नशा अजून काय उतरली न्हवती त्यामुळं
तो आला नाही खालीच थांबला. सरसगडाचं मुख्य आकर्षण म्हणजे दोन खड्या कातळ कड्यात कोरलेल्या
पायऱ्या. जिथून पायऱ्या चालू होतात तिथं भुयार आणि छोटी गुहा आहे तिथं जाऊन बघितलं
पण वटवाघळांनी केलेली सगळी घाण अन त्याचा वास येत होता दिसत तर काहीच न्हवतं. पायऱ्या
चढून वर आल्यावर पहिला दरवाजा लागतो तो म्हणजे दिंडी दरवाजा. दिंडी दरवाजाच्या दोन्ही
बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्याआहेत.
![]() |
सरसगडावरील कातळ कोरीव पायऱ्या |
गडाचा आकार
पगडी सारखा आहे म्हणून यालाच पगडीचा किल्ला सुद्धा म्हणतात. दरवाज्यातून पुढे वर जायला
थोड्या पायऱ्या आहेत पण विकास भाऊंच्यात adventure किडा असल्यानं भिडला कातळाला अन
तो ३०-४० फुटांचा रॉकपॅच सर करून वर आला वर आल्यानंतर डाव्या बाजूला पाण्याची टाकं
आणि दोन प्रशस्त गुहा आहेत. इथे आम्हला काही मंडळी भेटली हि मंडळी उस्मानाबादहून राज्याभिषेक
सोहळ्यासाठी रायगडावर अली होती आणि काल रायगड करून आज सरसगड करायला आली होती नवीन भटके
भेटलेत म्हंटल्यावर तिथंच चर्चेचा फड रंगला. यावर्षी रायगड वारी केली नाही त्यामुळं
काल रायगडावर घडलेल्या त्या आनंद सोहळ्याचा सारा वृतांत यांच्या कडून कळला त्यांच्या
सोबत बोलत बालेकिल्ल्याकडे निघालो. वाटेत धान्याची कोठारे, शस्त्रागारे व राहण्याचे
अवशेष दिसतात व पुढची वाट बालेकिल्ल्यावर जाते. गडमाथा लहान असल्याने बालेकिल्ल्यावर
जास्त काही वास्तू किंवा अवशेष नाहीत. बालेकिल्ल्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे व सुधागड,
तैलबैला, घनगड व पालीगाव हा प्रदेश न्याहळता येतो.
![]() |
सरसगडच्या गुहेतून |
पुढं मृगगड
करायचा असल्यानं सरसगड आटोपता घेऊन आम्ही उतरायला चालू केले. दहा वाजत आले होते त्यामुळं
उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. उतरत असताना मृगगड करायचा कि नाही यावर चर्चा चालू
झाली कारण सुधागडला तंगडतोड करून सगळ्यांचीच थोडी लागली होती अन आज ७ तारीख मोहिमतला
आमचा हा शेवटचा दिवस आणि मृगगड केला तरी दुपारी ३ पर्यंत आम्ही मोकळं झालो असतो मग
नंतर काय करायचं म्हणून दुसऱ्या प्लॅनची जुळवा जुळव चालू केली. आमचं कस कमी वेळात पण
पद्धतशीर अन शिस्तीत जास्त भटकून कसं होईल याचा विचार आम्ही आधी करतो त्यामुळं विक्यानं
मला विचारलं मृगगड सोडून दुसरं काय करू शकतो. कोकणात उतरलोय म्हंटल्यावर समुद्र जवळ
होता मग लगेच थोडं गुगलरावच्या मदतीनं जलदुर्गांची माहिती काढली अन कोर्लई आणि रेवदंडा
किल्ला करायचं ठरलं. सरसगडावर असताना मृगगड होता प्लॅन मध्ये लगेच वार असं काही फिरलं
कि गड उतरतानाच plan change झाला अन गिरिदुर्गावरून थेट जलदुर्ग गाठायचं ठरलं. पालीतुन
ते रेवदंडा हे अंतर ६५ किमी. होतं म्हणजे कोकणातले रस्ते म्हटल्यानंतर दोन तासांचा
रस्ता. सकाळ पासून काही खाल्ल न्हवतं त्यामुळं भूक लागली होती रोहा पास झाल्यावर लईच
नारळाची झाड असलेल्या एका हॉटेलला थांबलो. कोकणात आलोय म्हंटल्यावर माश्यावरच ताव मारणार
पण बोटी बंद असल्याने ताजे मासे न्हवते त्यामुळं पुढं जेवायचं ठरलं इकडं आम्ही जेवायला
काय काय आहे बघेपर्यंत पकंज भाऊ हॉटेल मध्ये परसाकडला जाऊन आला. रेवदंड्याला जेवायचं
म्हणून तसंच पुढे निघालो.साडेअकराच्या सुमारास आम्ही पालीहून निघालो होतो दुपारी १
वाजता रेवदंड्याला पोहचलो.सह्याद्रीची लेकरं समुद्राशी मैत्री करायला जातायत म्हंटल्यावर
सफारी पण फुल जोश मध्ये होती.
रेवदंड्याचा
किल्ला हा पोर्तुगीजांनी बांधला कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते त्या खाडीवर असलेल्या
रेवदंडा या गावात हा किल्ला आहे. इथं पोर्तुगीजांनी संपूर्ण रेवदंड्यालाच तटबंदीच चिलखत
घातलेलं पाहायला मिळतं. रेवदंड्याला झालेली मोठी लढाई म्हणजे १६८३ साली संभाजी महाराजांनी
चौल व रेवदंड्यावर हल्ला चढवून किल्ल्याला वेढा घातला त्यात पोर्तुगिजांचा मोठं नुकसान
झालं पण पोर्तुगीजांनी गोव्यात फोंड्यावर हल्ला केल्यानं संभाजी महाराजांना वेढा उठवावा
लागला.
पुढे १७४०
व १८१७ साली पुन्हा रेवदंडा मराठ्यांच्या ताब्यात आला. आम्ही किल्ला पाहण्यासाठी निघालो
तेव्हा तिथं काम करणाऱ्या यक्तीसोबत चर्चा केली असता कळलं कि किल्ल्याचा काही भाग हा
खाजगी मालकीचा आहे. रेवदंड्यात जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला आहे. त्या तटबंदीच्या
उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पोर्तूगिजांचे
राजचिन्ह कोरलेले आहे. किल्ल्यात सगळी कड झाडी झुडपं वाढलेली आहेत रेवदंडा किल्ल्यावर
सातखणी मनोर्याचे सात पैकी चार मजले बाकी आहेत .या मनोर्याला ‘‘पोर्तुगिज आरमाराचा
रखवालदार म्हणत.
![]() |
सातखानी मनोरा |
किल्ला पाहून
झाल्यावर जेवणासाठी हॉटेल शोधू लागलो. किल्ल्यापासून जवळच असलेल्या हॉटेल मध्ये जेवण
करायला गेलो मासे नसल्यानं प्रॉन्स समाधान मानून आहे ते वरपुन आम्ही कोर्लाई किल्ल्याकडे
निघालो. रेवदंडा ते कोर्लाई हे ७-८ किमीचं अंतर होतं. किल्ल्याकडे जाणारा कोर्लई गावातून
जातो गावात शिरल्यानंतर जिकडं तिकडं सुकट वाळलायला टाकलेली दिसत होती पुढं किल्ल्याकडे
जाणारा कोस्टल रोड होता एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला समुद्र. किल्ल्याच्या पायथ्याला
असणाऱ्या lighthouse साठी हा रोड होता. गाडी लावून लाईटहाऊसच्या बाजूने गडाकडे निघालो.
छोट्या टेकडीवर हा किल्ला असल्याने जास्त पायपीट करायची गरज न्हवती काय दहा ते पंधरा
मिनटात किल्ल्याच्या प्रवेशदारावर पोहचलो.
दक्षिणोत्तर
पसरलेला हा किल्ला १५२१ मध्ये पोर्तुगीजांनी बांधला. पोर्तुगीज व निजाम यांच्यात या
गडासाठी लढाया देखील झाल्या. गडाचे बांधकाम सुस्थितीत आहे. गडावर बांधीव टाक्या आहेत,
इमारतींचे अवशेष व चर्च पाहायला मिळते. डाव्या बाजूला कुंडलिका खाडीच्या दिशेला एक
प्रवेशद्वार आहे, येथून खाली ऊतरण्यासाठी पायर्या आहेत. पश्चिमेला समुद्राकडे निमुळती
होत जाणारी तटबंदी तिथे खाली बुरुजावर चार तोफा पहायला मिळतात. आम्ही गड बघत असताना
इंग्लिश मधून वैभवच vologing सुरु होतं. इथं गड पाहायची वेळ मर्यादित आहे संध्याकाळी
पाचला गडाचे दरवाजे बंद होतात.
![]() |
कोर्लई वरील चर्च |
गडावर आमच्या
शिवाय इतर कोणीच न्हवत त्यामुळं तिथले कर्मचारी आम्हला खाली हाकलत होते इथं आमचे फोटोच
उरकत न्हवते त्यामुळं शेवटी दरवाजे बंद करून ते निघून गेले होते त्यामुळं तुटलेल्या
दरवाजतून बाहेर पडून आम्ही खाली आलो अन लाईटहाऊस पहाण्यासाठी निघालो. लाईटहाऊसची सिग्नल
यंत्रणा व कार्यप्रणालीची माहिती घेतली. सहा-साडेसहा वाजत आले होते. दोन दिवस कसे गेले
कळलं नाही अजूनही जाता जाता काय होतंय का हे बघत होतो त्यामुळं जाताना मोहिमेची सांगता
बीचवरच्या सूर्यास्तानं करायचं ठरलं जवळच असलेल्या नागाव बीचकडे निघालो. समुद्र किनाऱ्यावरचा
सूर्यास्त म्हणजे अथांग पसररलेल्या सागरावर सूर्यानं मुक्त हस्ते केलेली रंगांची उधळण
हा नजारा डोळ्यात साठवीत कॅमेऱ्यात कैद केला.
![]() |
सांज |
हि केलेली
दोन दिवसांची भटकंती म्हणजे समरभूमी उंबरखिंडीत शौर्यतीर्थ असलेल्या स्मारकाला वंदन
करून शिवराज्याभिषेक दिनाची सुरवात करत सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी असलेला सुधागड
सर करून, बल्लाळेश्वराच्या माथ्यावर विराजमान असलेला सरसगड करत, पोर्तुगीजांना पाणी
पाजणाऱ्या मराठयांच्या फौजा अन छत्रपती संभाजी महाराजचं रौद्ररूप पहाणारा रेवदंड्याचा
जलदुर्ग तर दुसरीकडे पोर्तुगीज स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेला कोर्लई करून दोन
दिवसात चार किल्ले करत वारी गडकोटांची परिवारांन दिमाखात मोहीम फत्ते केली. दोन दिवसच
पण कधीही न संपणाऱ्या सह्याद्रीच्या साथीनं जिवलगांसोबत जगलेल्या आठवणींचं गाठोडं घेऊन
घराच्या वाटेवर परतीच्या प्रवासाला निघालो.
![]() |
फतेह...! |
भटकंती दिनांक
६ व ७ जून २०१९
उंबरखिंड,
सुधागड, सरसगड, किल्ले रेवदंडा, किल्ले कोर्लई व नागाव बीच
सहभाग -
विक्या उर्फ
विकास पवार
पंक्या उर्फ
पंकज गायकवाड
बाबा उर्फ
निलेश हडगे
शुभम पवार
वैभव पवार
अन मी म्हणजे
मीच
![]() |
सुधागड महादरवाजा |
![]() |
जिगरी |
![]() |
किडेकरी बाबा |
![]() |
सरसगड दिंडी दरवाजा |
![]() |
कोर्लईचा खाडी कडील दरवाजा |
![]() |
Comments
Post a Comment