संडे भटकंतीनामा - ढवळगड व किल्ले दौलतमंगळ (भुलेश्वर मंदिर)
आषाढ उजाडू
लागला कि आभाळात काळ्या ढगांची गर्दी वाढू लागते. गेली तीन-चार महिने पिवळा मळवट भरून
बसलेला सह्याद्री हिरवा शालू पांघरण्यास सज्ज होतो. उन्हानं तापलेल्या त्या कातळकड्यांना
आस लागते ती सह्यद्रीच्या जटांमधून कोसळणाऱ्या जलधारा आपल्या अंगाखान्द्यावर झेलण्याची.
पावसाळा म्हंटल कि वर्षाऋतू पण हाच वर्षाऋतू शेतकऱ्यांसाठी व उन्हानं सैर-भैर फिरणाऱ्या
पक्षी प्राण्यांसाठी आनंद ऋतू बनून येतो. पावसाळ्यात स्वातंत्र्य दिनाची मोहीम सोडली
तर आम्ही जास्त कुठं भटकायला जात नाही पण आमच्या ठेलेल्या तारखा सोडून इतरवेळीची रविवार
ते रविवारची भटकंती चालूच असते. रविवारी भटकायचा प्लॅन करणं म्हणजे महाकठीण काम कारण
कामांमुळे रविवारी सुट्टी मिळते का नाही याची खात्री नसते अन मिळालीच तरी पूर्ण दिवस
नाही १० ते ११ पर्यंत माघारी फिरावं लागतंय पण भटकायची आवड असली कि काही ना काही करून
सवड मिळतेच फक्त अंगात भटकायचा किडा असला पाहिजे. आमच्या वारी गडकोटांचीच्या परिवाराचे
सरदार उमराव शुभम बाबा पंक्या त्यांच्या त्यांच्या जहागिरीत व्यस्त असल्यामुळं त्यांना
सकाळी एवढ्या लवकर उठून येणं जमत न्हवतं. तरी राहुल्या,बाबा, पंक्या कधी कधी येत असत,
शुभम निगडीला असल्यानं त्याला येणं शक्य न्हवतं. स्वप्न्या यायचा पण फलटणला गेल्या पासून
तोही बंद झाला त्यामुळं मी अन विक्याच. आमचं नशीब पण भारी कि घरापासूनच जवळच असलेली
भुलेश्वर डोंगररांग व इतिहास संपन्न वैभवशाली पुरंदर तालुका लाभला. जर रविवारी याच डोंगरांगेत कुठं
ना कुठं तरी भटकत रहायचं हे चालूच असायचं कधी कानिफनाथ, कधी मल्हारगड, कधी रामदरा तर
कधी आमचा वडकीचा मिनी केंजळगड, कधी मस्तानी तलाव मार्गे ज्वाला मारुती तर कधी दिवे
घाटाच्या अंगाखांद्यावर. हा ब्लॉग अशाच आमच्या जून,जुलै महिन्यात झालेल्या रविवारच्या
उनाडक्यांचा भटकंतीनामा आहे.
सुट्टी असली नसली तरी रविवारी पहाटे साडे-पाच सहाला विक्याला
फोन करायचा, "हा निघतोय रे तिकडून उत्तर यायचं "हां ये" परत विक्याच्या
घरी गेलं कि फोन करायचा कारण भाऊ कधी कधी हां ये म्हणून झोपी जायचा म्हणून परत फोन
करून "हां ये खाली आलोय" मग भाऊ प्रकट व्हायचे अन ठरायचं कि आज इकडं जायचं.
नेहमी प्रमाणे शनिवारी रात्री विक्याचा फोन आला उद्या जाऊ म्हणून पण दरवेळी सारखं कुठं
जायचं हे माहित नाही. सकाळी पहाटे साडे पाचलाच विक्याच्या इथे जाऊन थांबलो अन कॉल केला. अर्धा तास वाट बघितल्यावर पवार साहेब आले, तिथंच सोसायटीत थांबून कुठं जायचं
याची शोध शोध सुरु होती. आमचा ढवळगड व किल्ले दौलतमंगळ ( भुलेश्वर मंदिर ) राहील होत
लांब असल्यामुळं सारखं राहून जायचं ते आज करायचं ठरलं लगेच कसं,कोणत्या मार्गे जायचं हे सगळं काढून १० मिनटात प्लॅन बनवून गाडीला किक
मारून बुंगाट. सोलापूर रोडने अंतर वाढत होत म्हणून दिवे घाट मार्गे निघालो. लांबूनच
कानिफनाथांना नमस्कार करून दिवे घाटात आलो. दिवे घाट आता हिरवा शालू पांघरून सजला होता.
दिवे घाट सर करून वर आल्यानंतर काळेवाडी मार्गे आंबळे कडे निघालो आधी ढवळगड करायचा
होता. काळेवाडी रोडवर डाव्या हाताला थाटात विराजमान असलेला मल्हारगड उर्फ सोनोरीचा
किल्ला होता तर उजव्या अंगाला आकाशाला गवसणी घालणारा इंद्रनील पर्वत पुरंदर व वज्रगड
अजून ढगांच्या आड पहुडलेले होते. पुरंदर तालुक्याला अंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झालं
आहे आणि त्यासाठी लागणारं जमीन हस्तांकरण सरकारकडून चालू होत तेव्हा इथं पर्यंत विमानतळाची
जमीन आहे विमानतळ झाल्यानंतर या भागला होणारा फायदा तिथलं अर्थकारण यावर मोक्कार चर्चा
करत आम्ही दोघं निघालो होतो जस आंबळे जवळ येत होत GPS गायब होत चाललं एका फाट्यावर
रस्ता विचारून पुढे निघालो. भेकराईनगर ते ढवळगड हे ४० किलोमीटर अंतर आहे. वाटेत सिंगापूर
गाव लागतं. सिंगापूर झाल्यानंतर आंबळे गावची पाटी दिसते तिथून आत निघालो.
गावातल्या
लोकांनां किल्ला कुठं आहे विचारलं पण त्यांना किल्ला आहे म्हणून माहित नाही त्याच किल्ल्याला
ते ढवळेश्वराचं मंदिर म्हणून ओळखतात. गडाकडे जाताना गावात वाटेत गढी दिसली मग तिथं
थांबून गढी पाहायला गेलो. सरलष्कर दरेकर इनामदार यांची हि गढी. छत्रपती शाहू महराजांनी
आंबळे हे गाव सरदर दरेकरांना इनाम म्हणून व लष्करी खर्चासाठी दिले होते त्याच आंबळे
गावात हि गढी पाहायला मिळते. गढीचा काही भाग संवर्धन करून त्यावर रंगरांगोटी करून स्मारक
उभं केलं आहे तर काही काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष आहेत व मोठे दरवाजे सुस्थितीत पहायला
मिळतात. गढी समोरच असलेल्या मंदिराच्या बाजूने देखील तट व दरवाजे आहेत. गढी पाहून आम्ही
पुढे गडाकडे निघालो तेवढ्यात बारीक पाऊस चालू झाला.
![]() |
प्रवेशद्वाराल लागून असलेली तटबंदी |
![]() |
गढीला असणाऱ्या प्रवेशद्वारंपैकी एक प्रेवशद्वार |
चिखल असलेल्या कच्या रस्त्याने
पुढे आल्यावर गड दिसू लागला. एका लहानश्या टेकडी वर किल्ला आहे. रस्ता खराब होता पण
आम्ही जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत गाडीवरच जाणार. गडाखाली असलेल्या हनुमान मूर्ती
पर्यंत गाडी जाते. शेंदूर चढवलेल्या हनुमंताचं दर्शन घेतलं व मूर्तीच्या पलीकडं गेलो
तर काय त्या साईडला पण सेमच मूर्ती या हनुमंतरायाची खासियत म्हणजे एकाच शिळेवर मागून
पुढून हनुमान कोरलेले आहेत कुठूनही दर्शन घ्या. गड चढताना लिंबाच्या झाडाखाली गणपतीची
मूर्ती दिसते. गड चढायला जास्त वेळ लागत नाही गाडी पासून १० मिनटात गडाच्या दरवाजा
जवळ येतो. गडाचा दरवाजा पडलेला आहे त्याची फक्त आर्धी कमान शिल्लक आहे तसेच दरवाजाला
लागून असलेला बुरुज थोडीफार तटबंदी शिल्लक आहे. गडावर ढवळेश्वराचं मंदिर आहे. गडाचा
माथा खूपच लहान आहे. गडावर पाण्याच्या दोन टाक्या आहेत. गडावरून सासवड पर्यंतचा प्रदेश
न्ह्याळता येतो. गडावर पोहचल्यावर पाऊस बंद झाला.
![]() |
ढवळगडाचे प्रवेशद्वार |
हा गड कोणी बांधला याचा इतिहास या
बद्दलची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सह्याद्रीच्या दुर्गवैभवात असे काही अपरिचित किल्ले
जे काळाच्या ओघात गर्दीपासून दूर आपले ऐतिहासिक अस्तित्व टिकवून आहेत. ढवळेश्वराचं
दर्शन घेऊन गड बघून झाल्यावर गाडी काढून निघालो जात असताना वाटेत चुन्याचा घाना दिसला
व काही जोती देखील आमच्या अंदाजानुसार हा गड पुरंदर चा इशारा गड असावा किंवा या भुलेश्वर
डोंगररांगेला जिथं जिथं घाट आहेत तिथं आपल्याला गड पाहायला मिळतो त्यामुळं घाटाचा पहारेकरी
म्हणून हा गड असावा. पुन्हा पाऊस सुरु व्हायच्या आत आम्हाला भुलेश्वर गाठायचं होतं.
आंबळे गावातून भुलेश्वर १२ किलोमिटर आहे. दौलतमंगळ किल्ला म्हणजेच आजचे भुलेश्वर मंदिर.
भुलेश्वर मंदिराबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी नृत्य
केले आणि महादेवांना पार्वतीची भुरळ पडली त्यानंतर त्यांचा हिमालयात विवाह झाला. महादेवाला
पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली, म्हणून ते ठिकाण भुलेश्वर नावाने ओळखले.
![]() |
भुलेश्वर मंदिर |
देवगिरीच्या
यादवांच्या काळात बऱ्याच हेमांडपंथी मंदिरांची बांधणी झाली त्यापैकीच १२ व्या शतकात
बांधलेलं हे पुरातन मंदिर पुढे १६३४ साली आदिलशाही सरदार मुरार जगदेव याने या मंदिराच्या
भोवती तटबंदी बुरुज बांधून त्याला किल्ल्याचे रूप दिले. मंदिराकडे जाताना वाटेतच दोन
भग्न बुरुजांचे अवशेष दिसतात. हे दोन बुरुज, पाण्याच्या टाक्या व तटबंदीचे काही अवशेष
पडलेल्या कमानी इथं अगोदर किल्ला होता हे सांगायला आज एवढ्याच वास्तू इथे शिल्लक राहिल्या
आहेत. पुढे छ. शाहू महाराजांच्या दरबारातील ब्रह्मेंद्रस्वामी यांनी १७३७ मध्ये भुलेश्वर
मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार होत राहिला पण त्याच मंदिराच्या
संरक्षणसाठी जे तट बुरुज बांधले गेले ते मात्र जीर्णोद्धारा पासून कायम उपेक्षित राहिले.
पूर्वाभिमुख असलेलं भुलेश्वर मंदिर हेमाडपंथी व मराठा या दोन्ही वास्तुशैलींच मिश्रण
बघताच मंदिर क्षणी अचंबित करून टाकत. मंदिराच्या समोर असलेल्या नगरखान्याकडे जाताना
द्वारपाल दिसतात त्यावरील आखीव रेखीव नक्षीकाम लक्ष वेधून घेतं. मंदिरासमोर मोठी घंटा
टांगलेली आहे. नगारखाना, सभामंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. मंदिरात प्रवेश करताच
भला मोठा नंदी पाहायला मिळतो.
![]() |
नंदी |
नंदीवर शिल्पांकित केलेला साजशृंगार अप्रतिम आहे. आम्ही
आजवर बघतलेल्या प्राचीन मंदिरांपैकी हा नंदी मोठा होता. अगोदर स्वतंत्र नंदीमंदडप असावा
जीर्णोद्धारानंतर संपूर्ण मंदिर एका छताखाली आलं. गाभाऱ्यात प्रवेश करतेवेळी उबंरठ्यावर
दोन्ही बाजूला दोन कीर्तिमुख दिसतात तर चौकटीवर गणेशपट्टी कोरलेली आहे. गाभाऱ्यातील
शिवलंगाचे दर्शन घेऊन मंदिर प्रदक्षिणा मारण्यासाठी निघालो. गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस
असलेल्या भिंतीवर वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत त्यामध्ये युद्धप्रसंग, सिंह, हत्ती
इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे
अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. मंदिराच्या
गाभा-याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीरूपी दुर्मीळ
शिल्प आहे. दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दगडात जीव ओतून केलेली
हि कलाकुसर स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणजे भुलेश्वर मंदिर.
मंदिराला प्रदक्षिणा
मारून बाहेर आलो बाहेर सायकलिंग करत आलेली मंडळी दिसली एवढ्या लांब सायकलिंग करत कसं
काय येतात काय माहित ज्याची त्याची आवड. आमचं कसंय नको तिथं पाय कशाला दुखवायचे आम्ही
तर जिथं पर्यंत गाडी जाते तिथवर थाटात गाडीवरच अन जात नसली तरी विक्या घालतोयच सुट्टी
नाय. दहा वाजत आले होते विक्याला काम असल्यामुळं दौरा आवरता घेत बऱ्याच दिवसांपासून
रखडत असेलेला ढवळगड अन भुलेश्वरचा प्लॅन पूर्ण झाला याचा आनंद घेऊन घराकडं निघालो.
आजची भटकंती म्हणजे पावसाळी जत्रे पासून दूर सह्याद्रीच्या कुशीत इतिहासाच्या सानिध्यात
पुरंदर तालुक्यातील अपरिचित ऐतिहासिक वास्तूंच्या शोधात इकडं फक्त दर्दी भटक्यांची
वर्दी विकेंडला सकाळी १० पर्यंत अंथरुणात पडून राहण्यापेक्षा घराबाहेर पडून आम्हाला
इतिहासात रमायला आवडतं चार नवीन गोष्टी अनुभवता अन जगता येतात. सकाळी ६ ला निघाल्यापासून
१0: ३० पर्यंत या चार
साडे-चार तासांत दोन किल्ले,
एक गढी, पुरातन मंदिर एवढं सगळं अगदी निवांत बघून पुढच्या रविवारची वाट बघत आम्ही दोघ
राहिलेला रविवार आपापल्या कामावर रुजू झालो, सुट्टी कसली मिळतीया. असा हा आमचा संडे
भटकंतीनामा.
भटकंती दिनांक
२१/०७/२०१९
ढवळगड, इनामदार गढी, किल्ले दौलतमंगळ(भुलेश्वर मंदिर)
![]() |
भुलेश्वर मंदिरात असलेले रामायणातील प्रसंगाचे शिल्प |
![]() |
गर्भगृहातील शिवलिंगद्वारपालकिल्ले दौलतमंगळच्या बुरुजांचे अवशेषकिल्ले ढवळगडढवळेश्वर मंदिरढवळगडावर असलेला चुन्याचा घाणाहनुमान मूर्ती |
Comments
Post a Comment