सफर जुन्नरची




सह्याद्रीच्या वारकऱ्यांना ह्या बुलंद, बेलाग साह्यकड्यांची वारी करायला फक्त निम्मित लागते मग ऊन, वारा, पाऊस काहीही असो भटक्यांना त्याची फिकीर नसते कारण ह्या वारकऱ्यांना सह्याद्री अन सह्याद्रीचा मुकुटमणी शोभणारे गडकिल्ले सतत खुणावत असतात. मग आमच्या परिवाराची कार्टी तरी याला कसा अपवाद राहतील. आमचं तर असय, जसं एखादा कार्यक्रम करणारे कलाकार तारखा धरतात तसंच काहीसं वर्षातल्या काही तारखा आम्ही धरून ठेवल्यात. प्रजासत्ताक दिन, जून शिवराज्याभिषेक सोहळा, स्वातंत्र्य दिन अन वर्षाचा शेवट याव्यतिरिक्त इतर दिवशीही भटकंती चालूच असते म्हणा पण गेली - वर्षे जो काही सह्याद्री पालथा घातला त्यात आमच्या या ठरलेल्या तारखांच्या मोहीमा आजपर्यंत कधी चुकल्या नाहीत अन त्या कधी चुकणार हि नाहीत. त्याच कारण लिहीत गेलो तर त्यावर एक वेगळा ब्लॉग होईल आणि तो होणारच आहे. त्यामुळेच दरवर्षी प्रमाणे यंदाही वर्षाचा शेवट अन सुरुवात गडावरूनच होणार. त्यात जोडून सुट्ट्या आल्यात म्हंटल्यावर - किल्ले केल्याशिवाय आमचं मन कुठलं भरतंय मग काय थोडी पुस्तक चाळली गुगल भावड्याचा सॅटेलाइट विव्ह मदतीला घेतला आणि याआधी दोनवेळेस वेळेस जुन्नर मधूनच पुढे कळसुबाई अन हरीशचंद्रगड साठी गेलो होतो त्यामुळं जुन्नरला असलेली दुर्गांची खाण पालथी घालायची हे ठरलेलं होतं. त्यामुळं आपसूकच यावेळी थोडी वेगळी मोहीम आखली.
    सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाण आणि याच बुलंद गडदुर्गांनी नटलेला निसर्गरम्य तालुका म्हणजे जुन्नर. जुन्नर तालुक्यात किल्ले, १२ लेणी समूह, अनेक प्राचीन मंदिरे आहेत. हे एवढं सार भटक्यांच्या समोर वाढून ठेवलंय म्हंटल्यावर निवड तर जुन्नरचीच होणार. आता एवढे किल्ले अन दिवस फक्त ते ३ मग कुठले किल्ले निवडायचे हा प्रश्न. पंक्याला इचारलं तर पंक्या म्हणतो, " कुठंबी चल भावा पण मला सोडून जाऊ नको." याला रायगडाला जाताना एकदा सोडून काय गेलो तवा पासनं भाऊ तारीख ठरली कि चार दिवस अगोदर पासूनच दररोज फोन करून सांगतय मी हाय बरं. विक्याला सांगितलं चावंड, कुकडेश्वर मंदिर, नाणेघाट, जीवधन हडसर करू आता क्रम हा ठरवण्यातच विक्याच्या अन माझ्या एवढ्या चर्चा झाल्या कि इचारूच नका तिकडं पंक्याला तर काय आदल्या दिवशी पर्यंत सांगितलं न्हवत कि हे हे किल्ले करतोय. भाऊ फक्त एकाच आशेवर होता जाताना घेत्याल आपल्याला सोबत. चावंड, कुकडेश्वर, नाणेघाट, जीवधन, हडसर हे करायचं ठरलं, फलटण दौऱ्यावर असणाऱ्या आमदार साहेबांना कळवलं त्यांचा निरोप आला नेहमीच्या टोन मध्ये हा जाऊ कि इकडं बाबाला सांगितलं तर तिकडं आसनगावचा सुभा सांभाळणाऱ्या निक्याला ही कळवलं. आता आलं पुढचं नियोजन निघायची वेळ, अगोदर कोणता किल्ला घ्यायचा, मुक्कामाची जागा, पोटापाण्याचा प्रश्न. इंजिनिअरिंग करताना कधी एवढं नियोजन केलं नसल तेवढं नियोजन सह्याद्रीतली दिसांची मोहीम करायला लागतंय पण सगळ्या मोहिमेत सोबत असलेला सह्याद्री हाच आमचा मॅनेजमेंट गुरु अन आमचे CEEOO उर्फ ईका असल्यावर सगळं नियोजन कस पद्धतशीर असतंय. स्वप्न्याच्या टोन वरूनच कळलं होत कि भाऊ डचू देणार, बाबा पण घरी असल्याने नाही येऊ शकला मग काय उरलो फक्त पाच मी, विक्या, पंक्या अन कोणत्याही मोहिमेसाठी तयार असणारा शुभम पण करण अर्जुन जोडीनच शोभत्यात म्हंटल्यावर शशी मागं कसा राहील. ३० डिसेंबर २०१७, संध्याकाळी ला निघायचं ठरलं आजपर्यंत सह्याद्रीची सफारी घडवून आणणारी, गडाच्या पायथ्याला सुखरूप पोहचवणारी सफारी आता मोहिमेवर निघण्यासाठी सज्ज होती आता तिला फक्त एकच आस लागून होती कधी एकदाची हि पोर एकत्र होतील अन कधी मी डौलानं भगवा फडकवत गड जवळ करेल. नेहमी सारखं निघायला उशीर १०:३० ला पंक्याला मुंढव्यातून उचलला तवा कुठं त्याच्या जीवात जीव आला. सातवाहन काळात प्रतिष्ठान म्हणजे अत्ताचे पैठण हि सातवाहन राजांची राजधानी होती तर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर हि उपराजधानी होती. त्यामुळेच प्राचीन काळापासून जुन्नरचे व्यापारी केंद्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. त्यात प्रामुख्याने शिवनेरी, चावंड, हडसर, जीवधन, नारायणगड, निमगिरी, हरिश्चंद्रगड, सिंदोळा हे किल्ले येतात तर दार्या घाट, माळशेज घाट, नाणेघाट हे प्रमुख प्राचीन घाटमार्ग येतात. कल्याण बंदरातून येणार माल हा जुन्नर मधूनच पुढे जाई याच व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती केली गेली.


जुन्नर मध्ये रस्ता विचारून पुढे चावंडकडे निघालो रस्ता माहित नसल्याने आता एकच आधार होता गावची पाटी त्यामुळं सगळेजण रस्त्यात कुठं चावंड गावची पाटी दिसते का यावरच सगळे नजरा लावून होतो. जसा जसा चावंड जवळ येत होता त्याचा शंकू सारखा दिसणारा आकार, ताशीव कडे, गडाची भव्यता लांबूनच दिसून येत होती. त्यात आधी विक्याने चंद्राच्या उजेडात ताम्हिणी घाटात हेडलाईट बंद करून गाडी चालवल्यापासून चादणं पडलं  कि भावाची हेडलाईट बंद करायची खाज मिटत नाही पण त्यामुळं आम्हाला चांदण्याच्या उजेडात नाहून निघालेला गड दिसत होता. रात्री :३० च्या सुमारास चावंड गावात पोहोचलो सकाळी उठून गड सर करायचा असल्याने आता मुक्कामाच्या जागेची शोधाशोध चालू झाली. महाराष्ट्रात कुठंही गेलं तरी भटक्यांच्या मुक्कामाची हक्काची जागा म्हणजे ZP ची शाळा. जागा बघून शाळेत मुक्काम करायचं ठरलं. शांतीत गावकऱ्यानां त्रास देता टेन्ट टाकत होतो तर बेनी कुत्री लागली भुकायला. शाळा, कुत्रं अन त्यात बिबट्यांचा इलाका जुन्नर म्हंटल्यावर याआधी खिरेश्वरला शाळेत झोपताना पंक्याचा अन माझा कुत्र्यावरून झालेल्या बाचाबाचीचा किस्सा निघाल्याशिवाय राहात नाही. पंक्या म्हणतो झोपू दे कुत्र्याला टेन्ट जवळ बिबट्या नाही येनार, मी म्हणतोय कुत्रं बघून बिबट्या आला तर. शाळेच्या मागचं डोक्यावर गड होता. तिथंच व्हरांड्यात दाटीवाटीने टेन्ट मध्ये पडी दिली. आता सकाळी लवकर उठून गड सर करायचा एवढी एकच आस. सकाळी च्या सुमारास गड चढायला सुरुवात केली. गड चढताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एका गोष्टीच सुख मात्र होत ते म्हणजे कोणतंही ओझं घेउन चढण्याच नाही तर सगळा सरंजाम सोबत घेऊन गड चढायची सवयच लागलीये आम्हाला पण आजचा मुक्काम जीवधनवर असल्याने तेवढं आर्धा दिवस तरी यातून सुटका होती. चावंडची चढाई तशी काही अवघड नाही आर्ध्यापर्यंत प्रशस्त सरकारी पायऱ्या केलेल्या आहेत तर पुढच्या भागात कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत या मार्गाने तासाभरात गडावर येता येते. चावंड किल्ला नेमका कुणी बांधला याचे पुरावे सापडत नाहीत. बहामनीचे साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर ज्या प्रमाणे आदिलशाही कुतुबशाही निर्माण झाल्या त्याचप्रमाणे १४८५ साली मलिक अहमदने निजामशाही स्थापन केली त्यात त्याला उत्तर कोकण पुणे प्रांत मिळाला त्यात चावंडचे नाव आढळते. .. १६३६ मध्ये निजामशाहीला मुघल आदिलशाह यांच्या पासून वाचवण्यासाठी शहाजी राजांनी केलेल्या तहात चावंड मुघलांच्या ताब्यात गेला. गडाला अनेक नावे आहेत चामुंड, चावुंड, चावंड हि नावे गाडावर असलेल्या चामुंडा देवीच्या नावावरून आली असावीत. पुढे स्वराज्यात मावळ्यांनी किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी गडाचे नाव प्रसन्नगड ठेवले. पुढे पेशवे काळात राजकीय कैदी ठेवण्यासाठी गडाचा वापर होई. पायऱ्या चढून वर आल्यानंतर कातळात कोरलेला गडाचा दरवाजा लागला त्यावर बारीक गणेश शिल्प कोरलेले आहे.

किल्ले चावंड प्रवेशद्वार

आम्हला गडावर असणाऱ्या सलग सात टाक्यांचे म्हणजेच सप्तमातृका यांचे प्रमुख आकर्षण होते. आम्ही लवकर निघाल्यामुळे अजून तरी गडावर कोणीच न्हवतं फक्त आम्ही पाच जण. दरवाज्यातून डाव्या बाजूने पुढे गड फेरीसाठी निघालो तर वाटेत हरिश्चंद्रगडावर आहे तशीच पुष्करणी पाहायला मिळाली त्यातील पाण्याची अवस्था लईच वाईट होती. पुष्कर्णीच्या देवड्यांमध्ये भग्न अवस्थेत पडलेली महादेवाची पिंड, गणेश मूर्ती आढळली. समोरच पडलेली कमान त्याखाली महादेवाची पिंड आहे तिथेच तुटलेल्याला अवस्थेतला नंदी आहे. गडावर अशे भरपूर अवशेष वाईट अवस्थेत पडून आहेत त्यावर संपूर्ण गवत मजल्याने ते नजरेस पडत नाहीत थोडा आडवाटेवरला किल्ला असल्याने सहसा इकडं कोणी फिरकत नाही. पण ह्या आडवाटेवरल्या गडांच्या अनवट वाटा तुडवल्याशिवाय त्या गडाचं अन तिथं घडलेल्या इतिहासच महत्त्व कळत नाही. ह्या सगळ्या वास्तू कॅमेऱ्यात कैद करून विक्याच्या अन माझ्या थोड्या येगळ्यायेगळ्या पोझ संपल्यानंतर सात टाक्यांच्या शोधात पुढे निघालो काही ठिकाणी गडाची तटबंदी शिल्लक आहे.

गडावरील अवशेष

गडाच्या मध्यभागी असलेल्या छोट्या टेकडीवर चामुंडा देवीचे मंदिर आहे. चारही बाजुंनी गडाचा माथा पालथा घातला जिथून गडफेरीसाठी सुरुवात केली तिथे येऊन पोहोचलो पण सात टाक्या कधी मागे गेल्या कळलंच नाही पुष्करणीच्या थोडे पुढे डाव्या हाताने जाणारी वाट सप्तमात्तृकांडे जात होती मग पुन्हा त्या वाटवर जाऊन टाक्यांजवळ आलो. इथं काताळ कोरून केलेल्या भल्यामोठ्या पाण्याच्या सात टाक्या आहेत. टाक्यांच्या बाजूलाच दगडांचा ढीग आहे. हि दगड टाक्यांच्या बांधकामावेळी निघालेली असावीत. इथं पहिल्या टाकीत उतरायला पायऱ्या लहानसा दरवाजा आहे त्यावर गणेश शिल्प कोरलेले आहे. या सात टाक्यांलाच सप्तमातृका म्हणतात सप्त मातृका म्हणजे ब्राम्ही, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ मानली जाते. पण यामध्ये नेमकी कोणती चामुंडा कोणती ब्राम्ही याची माहिती मिळत नाही. या सप्तमातृका म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना. सगळ्यांचे सगळ्या अँगल ने फोटो झाल्यावर शुभम भाऊंनी त्यांचं ३६० डिग्रीच अस्त्र काढलं अन टाक्यांचे फोटो काढले.  गडांवर असलेल्या या टाक्यांवरून भविष्यातली पाण्याची गरज बघून केलेलं नियोजन जलव्यवस्थापन कळतं.


सप्तमातृका 

      पुढे वाट टेकडीवर असलेल्या चामुंडा देवीच्या मंदिराकडे वळवली. चामुंडा देवी प्रामुख्याने राजस्थान, बिहार या प्रदेशात आढळते. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड ध्वजावर अग्नीपुराणाप्रमाणे चार हात शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे. मंदिरात देवीची शेंदूर लावलेली प्राचीन मूर्ती आहे. आजूबाजूला मंदिराचे जुने अवशेष आहेत आताचे नवीन मंदिर हे गावकऱ्यांनी बांधलेले आहे. गडावरून माणिकडोह धरणाचा सुंदर नजर दिसतो. गड बघून झाल्यानंतर परतीच्या मार्गाला लागलो. गड उतरून आल्यावर कुकडेश्वर कडे मार्गस्थ झालो. चावंड ते कुकडेश्वर मध्ये फक्त किमी आहे.  पुढे १५ मिनिटांत कुकडेश्वरला पोहोचलो. कुकडेश्वर म्हणजे जिथे कुकडी नदीचा उगम होतो. आपल्या संस्कृतीत जिथे नदीचा उगम होतो तिथे हमखास महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. मंदिर जवळ पाण्याचे कुंड आहे तिथे पाण्याचा जिवंत झरा आहे इथेच पूर्वी गोमुख असल्याचे सांगितले जाते. कुंडातील थंडगार पाण्यात हात पाय धुवून मंदिरात जाण्यासाठी निघालो. मंदिराच्या आवारात मुर्त्या मंदिराचे बरेच जुने अवशेष आहेत. कुकडेश्वर मंदिर १००० वर्षांपूर्वी शिलाहार राजांनी बांधल्याचे कळते.  हेमांडपंथी शैलीचे मंदिर त्यावर भरपूर नक्षीकाम केलेलं आढळते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच गणेशपट्टी लावली आहे त्याखाली शिवयंत्र तर खाली उंबरठ्यावर कीर्तिमुख आहे. दाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले आहत. मंदिराच्या सभामंडपात खांबांवर कोरलेले गंधर्व क्षय अश्या रितीनी कोरले आहेत जणू संपूर्ण मंदिराचा भार ते आपल्या खांद्यावर पेलत आहेत. तिथेच डाव्या बाजूला शिव पार्वतीची मूर्ती आहे.

 सभामंडप, कुकडेश्वर मंदिर 



कुकडेश्वर मंदिर  

     मंदिराच्या खांबांवर बऱ्याच ठिकाणी कीर्तिमुखाचे शिल्प पाहायला मिळते. मंदिराचे बांधकाम दगड एकेवर एक रचून केलेले आहे इथं कुठल्या प्रकारच्या चुन्याचा उपयोग केलेला नाही. आज जे काही मंदिर शिल्लक आहे ते पुरात्तत्व खात्याने केलेल्या संवर्धनामुळे. दर्शन मंदिर पाहणी झाल्यानंतर बाहेर आजी भेटल्या त्यांना मंदिराच्या बांधकामाविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितलं,  "जो कोण मंदिराला पार लावतोय त्याच्या संग कायतर अघटित घडतय त्यामुळं मंदिराच्या कळसाचा काम झालेलं नाही". मंदिर बघितल्यानंतर पुन्हा भगवे डौलानं फडकवत सफारी आता नाणेघाट अन जीवधन कडे कूच करायला सज्ज होती. काल रात्रीच्याच जेवणावर सकाळी किल्ला केला आता मंदिर झालं दुपार झाली अजून पर्यंत कोणाच्याही पोटात काहीच नव्हतं. आता एवढी दगडात जीव ओतून घडवलेली कलाकुसर बघितल्यावर कसली आलिया भूख. पण तरी अधूनमधून पोटातून आवाज येतच होता. भूख लागली कि लोकांच्या पोटात कावळे आरडतात पण आमचं थोडं येगळं हाय आमच्या पोटात कोंबड्या आरडत्यात मग आता त्या कोंबड्याचा आत्मा शांत तर करायलाच पाहिजे कुकडेश्वर वरून गाडी बाहेर काढल्या काढल्या समोरच पोल्ट्री दिसली, कोंबड्या बघून पवार साहेब खुश झाले पण त्या पोल्ट्रीत कोणच न्हवत परत शोधाशोध समोरच एका घराच्या अंगणात कोंबड्या दिसल्या तिथं विचारलं तिथून सुद्धा नकार मग गाडी काढली परत फिरवली चावंड कड तिथं गावात इचारून बघावं म्हंटल तर तिथं त्यांनी सांगितलं पुढं १० किमी आटपाळे शिवाय काय कोंबड मिळायचं नाही त्यामुळं आता चलो आटपाळे तिथं कोंबड घेतलं. विक्याने त्याला नीट मॅग्नेट का मॅरनेट (मला तर अजून काय ते कळलेल नाही) ते केलं तवा कुठं 'हमारे मन में हड्डी फुटी'. ह्या सगळ्या धावपळीत बिचारा पंक्या मात्र गपगार होता कारण भाऊ माळकरी माणूस मग काय आता रात्री ग्रेव्ही अन भात शिवाय पर्याय न्हवता भावाला. रात्रीची व्यवस्था झाल्यानंतर आता आमहाला खुणावत होता तो सातवाहनकालीन महाराष्ट्राचा राष्ट्रीय महामार्ग नाणेघाट. गाडीत बसल्यावर शांत कुठं कोण बसतंय तवा कोण ना कोण सापडतयच, मग त्याची खेचत गाडी नाणेघाटाच्या दिशेनं दिमटीवली. वाटेत अंजनवाळे गावा जवळ एकाच डोंगर रांगेवर असलेली लहान मोठे सुळके दिसतात. हा डोंगर म्हणजे व्हराडी डोंगर गावकऱ्यांकडून या डोंगरात व्हराड लुप्त झाल्याची कथा सांगितली जाते म्हणूनच त्याला व्हराडी डोंगर म्हणतात.


     असंल काही दिसलं कि आमचं एकच असतंय घ्या गाडी साईडला अन काढा फोटो रोडवरून येणारी जाणारी लोक पण म्हणत असतील हि पोर हिथं का फोटो काढतायात पण लोकांना सगळे डोंगर एकसारखेच दिसतात पण आमच्या सारख्यांना असलं काही दिसलं किंवा सह्याद्रीचा कोणताही डोंगर बघितला कि मनात अनेक विचार चालू होतात. त्याचा आकार, त्याची रचना, त्याला काही इतिहास आहे का? त्याचावर काही बांधकाम असलं का? आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यावर जायची वाट कुठून असेल. हे असं सगळं त्याच्या डोक्यात घुटमळत असतंयजसं जसं घाटगर जवळ येत होत तसं जीवधनचा वानरलिंगी सुळका डोकंवर काढत होता. याआधी नाणेघाटाबद्दल बरच ऐकलं होत वाचलं होत आज मात्र प्रत्यक्ष नाणेघाट बघणार, अनुभवणार होतो. नाणेघाटला ट्रेक करत सुद्धा येता येते पण पुढं जीवधन करायचा असल्याने आम्ही तो टाळला. नाणेघाटाला पोहचताच वाटेत असलेला भला मोठा दगडी रांजण आपलं स्वागत करून आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात घेऊन जातो. नाणेघाट म्हणजे सातवाहन कालीन महाराष्ट्राचा राष्ट्रीय महामार्ग. नाणेघाटचे बांधकाम सातवाहन काळात इ..पू. पहिल्या शतकात हे खोदकाम झाले.


कल्याण बंदरातून येणारा माल जुन्नर हूनच पुढे पैठणला जाई त्यावेळी कोकण जुन्नरला जोडणारा नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता.  सातवाहन हे ..पू. २३० ते .. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र, कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर पैठण ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. ..पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. नाणेघाट रचना हि डोंगर खोदून केलेली आहे. इथं अनेक गुहा आहेत या प्रत्येक गुहे समोर पाण्याचं टाकं पहायला मिळत. इथं असलेल्या दगडी रांजणाचा वापर जकातीचे पैसे टाकण्यासाठी केला जात असे. व्यापाऱ्यांनी घाटाचा वापर केल्याबद्द्दल रांजणात पैसे टाकले जात हा दगडी रांजण म्हणजे त्यावेळचा टोल नाकाच. गणेश मूर्ती, कातळावर कोरलेले हनुमान शिल्प, दगडी रांजण, गुहेत भिंतींवर कोरलेले शिलालेख, कातळात कोरलेल्या पायऱ्या स्थापत्य शास्त्राची सारी अदभूत किमया इथं अनुभवायला मिळते.

नाणेघाटातील हनुमान शिल्प, गुहा, पाण्याच्या टाक्या, दगडी रांजण


     आम्ही सगळे नाणेघाटाची पाहणी करत होतो तेव्हा तिथं एक युटूबर सुद्धा होता. हातात धरून दांडक अन त्यावर कॅमेरा लावून चालू होत सगळं त्याच शुटिंगू . कुठंही गेलं तरी पर्यटक कोण आणि सह्याद्रीचे भटके कोण लगेच ओळखायला येतात तेव्हा त्यांनही आम्हला पाहिलं आणि नाणेघाटाची माहिती, इतिहास याच्या बद्दल त्याच्या कॅमेऱ्यासमोर बोलण्यास सांगितलं . मी अन इक्यान जमेल तेवढी माहिती सांगितली अन आम्ही जीवधनची वाट धरली. दुपारचे तीन साडे तीन वाजले होते ऐन जानेवारीतच सूर्या शेठ भयंकर तापला होता. नाणेघाटाच्या वर असलेल्या हॉटेल्स कडून उजवीकडे जाणारी कच्ची वाट जीवधनकडे जाते. त्याच रोडनं गाडी जिथवर जाईल तिथवर नेऊन गड चढायला सुरुवात करायची ठरलं. हॉटेल्स संपल्यानंतर एक घर लागते तिथं गाडी लावून मुक्कामाला लागणाऱ्या सामानाची जमवाजमव करत होतो तर कळलं पंक्याने ह्या जुन्नर मोहिमेसाठी खास तीन जोड शूज घेऊन आलाय. तीन बुटाड का रे पंक्या म्हंटल तर म्हणतंय, "चढताना कंडिशन बघून शूज चेंज करायचा" पंक्याच तीन शूज घेऊन चढायचं खरं कारण म्हणजे मागच्यावेळी भर पासवत केलेला हरीश्चंद्रगड होता कारण भाऊ पिकनिकला आल्या सारखं पायात सॅन्डल अंगात जिनची पॅन्ट घालून आला होता हे असलं सगळं अन तेही पावसतला ट्रेक म्हंटल्यावर चढताना फाटून हातात येणारच की बरं एवढ्यावर थांबतोय तो पंक्या कुठला आता उतरताना तरास नको म्हणून दोन हजाराच्या जिनच्या पॅन्टला कट करून भावानं त्याची हाफ पॅन्ट केली. त्यावेळी पंक्या नवनी होता म्हणा पण आता भाऊ थोडं तयार झालाय गडावर जायच्या आधी तिथली माहिती गोळा करतोय कुठला किल्ला, कुठून चढायचं, किती वेळ लागणार सगळं. हे आमचं असं मोक्कार हसत बॅगा भरायचं चालू असताना तेवढ्यात धुमाळ मामा आले अन आमचा सगळं पसरा बघून म्हणाले , " काय पोरांनो मुक्काम हाय वाटत गडावर "  मग त्यानां व्हयं म्हणून गडाकडं जायची वाट विचारली तर म्हणाले, "चला म्या येतो संग", त्यांना म्हंटल नको उगा कशाला, दाखवा इथूनच वाट जातो आम्ही तर म्हंटले, "चला तिथवर वाट दावतो मग जावा तुम्ही पूड". सह्याद्रीत कुठंही आसा कधी काही झालं, कुठं वाट चुकली तर नेहमी मदतीला धावून येणारी हक्काची जिवाभावाची माणसं म्हणजे सह्याद्रीतली माणसं. मग धुमाळ काकांच्या घरापासून जीवधनाची वाट धरून चालू लागलो. त्यांच्या घरापासून जीवधनच्या मुख्य वाटेवर यायला अर्धा तास लागतो.


रगरगत्या उन्हांत कुसळातून वाट काढत इथल्या तिथल्या गप्पा टप्पा हाणत निघालो तर धुमाळ मामांनी काल वानरलिंगी सुळक्यावर घडलेला किस्सा सांगितला. दोन ट्रेकर सुळका चढत होतो तेही कुठल्या रोपच्या मदतीशिवाय म्हणजे फ्री क्लाइंबिंग करत होते तर म्हणे त्यातला एक जण सुळका चढत असताना दीड-दोनशे फुटांवरून खाली पडला व सुळक्याच्या पलीकडल्या बाजूला घसाऱ्यावर असलेल्या झाडाला अडकला तेव्हा त्याच्या सोबतच्याने आरडाओरड करून गावकऱ्यांना बोलवलं तेव्हा कुठं पाच सहा तासाच्या मेहनतीनंतर त्याला बाहेर काढता आलं. सह्याद्री जितका प्रेमळ लोभस वाटतो तितकाच तो रौद्र अन राकट सुद्धा आहे त्यामुळंच इथं पडणारं प्रत्येक पाऊल जपूनच टाकायला लागतं. धुमाळ मामांनी जंगलात जाणाऱ्या वाटच्या तोंडावर आणून सोडलं आणि पुढची वाट सांगून परतीच्या मार्गाला लागले. अत्तापर्यंत मोकळ्या सपाट रानातून चालत होतो पण आता जंगलातुन वाट काढत वानरलिंगी सुळक्याचा पायथा गाठायचा होता. धुमाळ मामांनी सांगितलेल्या मळलेल्या वाटेवरून गडचढू लागलो. जीवधनला दोन वाटा आहेत एक घाटगर गावातून तर दुसरी नाणेघाटातून आम्ही नाणेघाटाकडील बाजूने चढत होतो. एवढा वेळ उन्हातून चालत होतो जेव्हा जंगलाचा टप्पा लागला तवा कुठं थोडं हायसं वाटलं. वानरलिंगी सुळका नजरे समोर ठेवून गड चढायचा होता, सुळक्यापासून डावीकडे जाणारी वाट गडावर जाते हे माहीत होत पण जंगलाचा टप्पा चालू झाल्यावर गर्द झाडीमुळे एवढा उंच सुळका कुठल्या कुठं गायब झाला कळलंच नाही. जंगलात नेहमी एक मळलेली वाट आणि जनावरांमुळे तयार झालेल्या अनेक वाटा असतात त्यामुळं नेहमी वाट चुकते तसंच आमचं झाला जंगलाच्या टप्यात अर्धा तास चालतोय न चालतोय तोवरच वाट चुकल्या सारखं जाणवू लागल सुळका तर दिसतच न्हवता. सहयाद्रीतल्या या आडवाटेवरच्या वाटा तुडवणं काही सोपं नाही इथं पसरलेली भयाण शांतता सगळ्या सारख्याच दिसणाऱ्या वाटा मधूनच कुठूनतर दाट झाडीतून येणारा आवाज त्यामुळं हळूहळू बत्या गुल व्हयला चालू होतात.


पाच वाजत आले होते आणि अजून आम्ही गडाच्या अर्ध्यावर सुद्धा आलो नव्हतो. अंधार पडला तर अजून अवघड होणार. आम्ही वाट चुकलोय हे तर कळलं पण मग आता नेमकं जायचं कुठल्या वाटेनं सह्याद्रीत नुसतं आत जाणारी वाट माहिती असून चालत नाही तर इथं बाहेर पडायच्या वाटा सुद्धा माहिती असाव्या लागतात मग सगळ्यांनी आप आपला भूगोल पाजळायाला सुरुवात केली इकडं माझी विक्याची अन पंक्याची पॅनल वरची चर्चा बसली तर तिकडं शुभम पुढं जाऊन वाट शोधू लागला. आम्ही इकडून नुसतं "हाय का रे वाट, हाय का रे वाट ?” करत होतो. भावानं सुळक्या जवळ जाणारी एक वाट शोधली पण तिथून चढण लय मुश्किल होत आणि जवळ रोप नव्हता त्यामुळं ती वाट कॅन्सल केली मग खाली येऊन त्यांन सगळा रिपोर्ट दिला वरून सुळका दिसतोय पण वाट सापडत नाही परत शुभम दुसरीकडं वाट शोधायला गेला तिकडं त्याला वाट सापडली मग तिथूनच ओरडला " हाय रे वाट हाय या इकडं या " याच आवाजाच्या माग माग जात आम्ही शुभम पर्यंत जाऊन पोहचलो. याआधी सुद्धा अनेक वेळा सह्याद्रीत वाटा चुकल्या पण हा सह्याद्रीच पुढं वाट शोधायला शिकवत आणि शेवटी धैर्य देणारा आपला मंत्र आहेच "सह्याद्री असे पाठीराखा शिवराय असे शक्तीदाता ". शुभमनं वाट हुडकून केलेली कामगिरी म्हणजे मूर्ती लहान अन कीर्ती महान. सुळक्याचा पायथ्याशी येऊन पोहचलो इथून उजवीकडची वाट सुळक्याकडे जाते तर डावीकडील वाट गडावर जाते.


वानरलिंगी सुळका म्हणजे सातशे-आठशे फूट उंचीचा जीवधन किल्ल्यापासून वेगळा झालेला अजस्त्र अभेद्य बेलाग खडा सुळका. एकदा का होईना हा सुळका सर करायचा असं मनात ठरवून आम्ही गडाची वाट धरली. आता पंक्या येताना गडाचा अभ्यास करून आला होता पण थोडा अर्धवट कल्याण दरवाजाच्या अलीकडं पंधरा फुटाचा रॅक पॅच आहे आणि तो काही अवघड नाही हे आम्हला माहित होतं पण रॅक पॅच चढायला अवघड आहे, मोठा रोप लावावा लागतो हे पंक्यानं नेमकं कुठं वाचलं काय माहीत अन त्यात वर येताना वाटाड्या सोबत असलेला पन्नास फुटाचा रोप बघून भावाची थोडी फाटली आणि मधूनच त्याला काय झालं काय माहित मी परत जातो म्हणू लागला. काही अवघड नाही आपण आरामात जाऊ असं काय काय सांगून भावाला तयार केला बरं हे सगळं गोड गोड फक्त इथं लिहायला झाल मी आणि विक्यानी पंक्याला नीट पद्धतशीर आमच्या भाषेत समजावून सांगितल. पंक्याला आमची समजावण्याची पद्धत आवडली वाटत कारण एवढा वेळ शुभम ट्रेक लीड करत होता अन आम्ही सगळे त्याच्या मागे पण आता पंकज भाऊ फुल जोमात होते शुभमला मागं टाकून स्वतः तो ट्रेक लीड करत होता अन तेही शेवटच्या कातळाच्या टप्प्यात आता पंक्याला नेमकं कोणत्या भाषाते समजावून सांगितलं असेल ते तुम्ही घ्या समजून.

जीवधनहून दिसणारा नानाचा अंगठा


जीवधनचा शेवटचा काताळकडा  

जंगलातून वर आल्यानंतर उजव्या हाताला डोंगर आणि डाव्या हाताला दारी अन त्यातून आम्ही वाट काढत आलेलं दिसणार घनदाट जंगल व समोर दिसणारा नानाचा अंगठा अन त्याच्या टोकावर भगव्या रंगाची उधळण करत मावळतीला जाणारा सूर्य हा सगळा नजारा डोळ्यात साठवत पुढे निघालो. जीवधनच्या कातळकड्यांना भिडल्यानंतर पदोपदी इथं जाणीव होते ती इथं घडलेल्या इतिहासाची. इ. स. १६३५ च्या वेळी निजामशाही अस्ताला जात असताना थोरले महाराज साहेब सरलष्कर शहाजी महाराजांनी बुडत्या निजामशाहाजीला आधार दिला. जीवधनवर मोघलांच्या कैदेत असणाऱ्या लहानग्या मुर्तजाला सोडवले व पेमगिरी गडावर नेऊन स्वतः निजामशाहीचा कारभार हाताळला. सातवाहन काळात बांधलेला हा किल्ला नाणेघाटाच्या संरक्षण फळीतील प्रमुख किल्ला. इथं १८१८ साली इंग्रजांनी केलेल्या हल्ल्यामुळे काताळात कोरलेल्या पायऱ्या उध्वस्त झाल्या आहेत त्यामुळे पावसाळ्यात इथली वाट अवघड होते. पुढे १०, १५ फुटांचा रॉकपॅच लागतो इथे गावकऱ्यांनी दोर लावला आहे. हा रॉकपॅच सर केल्या नंतर गडाच्या दरवाजात येता येते. हा गडाचा कल्याण दरवाजा गोमुखी आकाराची रचना असलेला काताळात घडवलेला कल्याण दरवाजा त्यावर तीन शिल्प आहेत चंद्र, वर्तुळ व मधोमध पक्षी कोरलेला आहे. इंग्रजांनी केलेल्या हल्ल्यामुळे गडाच्या दारातच मोठ्या शिळा पडल्या आहेत इथून दारात उभा राहूनच समोर नाणेघटाचा संपूर्ण नजरा दिसतो.

दगडात बांधलेला कल्याण दरवाजा 

संध्याकाळी साडेसहा वाजता आम्ही गडमाथा गाठला मध्येच वाट चुकल्यामुळे अर्धा तास वाया गेला पण अंधार पडायच्या आत गडावर दाखल झालो. कल्याण दरवाजातून वर आल्यावर उजव्या हाताला पाण्याचे टाके आहे त्याच्या बाजूला असलेल्या कातळावर बॅगा टाकून, दिसभर उन्हानं तापलेल्या पण आता कुठं शांत होत असलेल्या त्या काळ्या कातळाला पाठ टेकवून निळ्या आकाशाकडे पाहत सगळे निवांत पडलो ह्या काळ्या कभिन्न कातळातून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे गड चढून आलेला थकवा कुठल्या कुठं निघून गेला.

जिगरी...

अजून थोडा उजेड बाकी होता आणि मुक्कामाची जागा शोधायची होती त्यामुळे घाई केली टेन्ट टाकण्यासाठी जागेची शोधाशोध आणि चुलीसाठी सरपणचा शोध चालू केला. कोठी जवळ पोर दिसली त्यांना विचारपूस केली तर हि पोर घाटगरच्या बाजूने चढून आली होती त्यांचा सात जणांनाचा ग्रुप नायरणगाव वरून आला होता. कोठीजवळ त्यांची जेवणं चालू होती ते दिवसा गडावर आल्यामुळे त्यांना मुक्कामासाठी जागा माहित असेल म्हणून त्यांनाच विचारलं तर कळलं एक तर कोठीत आणि दुसरं भैरवनाथाच्या मंदिराजवळ जागा भेटू शकते पण कोठीत सगळा काळोख अन सगळी कोठी वटवाघळांनी भरलेली होती आणि आता अंधारात मंदिराजवळ जागा शोधन शक्य न्हवत त्यामुळं कोठीच्या शेजारी असलेल्या छोट्या टेकाडावर टेन्ट टाकायचा अन कोठीच्या दाराजवळच आधीच्या चुली होत्या त्यामुळं तिथंच स्वयंपाक करून पोटपूजा करायची ठरलं. नारायणगाव हुन आलेली पोर खालच्या गुहेत मुक्काम करणार होती त्यांच्या जवळ खाली अंथरायला जास्त काही न्हवत म्हणून आमच्या जवळचे फ्लेक्स त्यांना दिले अन स्वयंपाकाच्या तयारीला लागून त्या पोरांना जेवयलाला यायचं आमंत्रण दिल. संपूर्ण गडावर फक्त आम्ही पाच आणि तो सात जणांचा ग्रुप एवढेच जण होतो. विक्यानं मुदपाकखाण्याचा कारभार हातात घेतला त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू, कापाकापी हे सगळं शशी शुभम बघू लागले तोवर इकडं मी आणि पंक्या ने टेन्ट उभा केला आणि सगळ्या सामानाची व्यवस्था लावली आणि पुन्हा विक्याला जॉईन झालो. कोठाराच्या दाराजवळ हा सगळा प्रपंच चालू केला खरा पण आतमध्ये कोठीत जायची कोणाची तयारी न्हवती कारण आतमध्ये काही दिसतच न्हवत नुसता सगळा काळोख त्यामुळं मग म्हंटल सकाळी उठून बघू आत मध्ये काय आहे ते. भात शिजायला टाकला पंक्याच जाईल त्या प्रत्येक ट्रेकला ठरलेलं असतयाचं वत लय मोठं हाय आपल्याकडं वत म्हणत भावानं भातात पाणी वाढवून ठेवलं आणि शिजल्यावर तो भात आहे का खीर हेच कळत नव्हतं. त्यामुळं आता पोटाची सगळी दारोमदार होती ती कोंबड्यावर त्यामुळं ते बिगडताकामनाये याची काळजी विक्यानं घेतली.

मुदपाकखाण्याचा कारभार 

कोठी जवळ आडोसा होता पण सगळे जेवायला बसतील एवढी जागा न्हवती. आधीच थंडीन सगळी वाट लागली होती त्यात टेन्ट थोडा उंचीवर होता तिथं जेवायला जावं तर कोणताही आडोसा नव्हता त्यामुळं तसंच दाटीवाटीनं कोठाराजवळ बसायचं ठरवलं. भूका लागल्यामुळे मिळेल तेवढ्या जागेत बसून चंद्राच्या अन टॉर्चच्या उजेडात पोटातली रिकामी जागा भरू लागलो. थंडीमुळे घास ताटातून तोंडापर्यंत नेईपर्यंत पार थंडगार होऊन जात होता. तिकडं दुनिया ३१ डिसेंबर साजरा करत होती तर आम्ही इकडं सह्याद्रीच्या सानिध्यात थंडगार वारे अंगावर झेलत चमचमणाऱ्या ताऱ्यांच्या खाली अन त्यात ताटात उजेड कमी पडेल म्हणून वर खुद्द चंद्रराव हजर होते व सोबत सगळी जिवलग मंडळी असा सगळा सेवन स्टारला सुद्धा लाजवेल असा सरंजाम म्हंटल्यावर इथं कुणाला काय पडलंय त्या ३१ डिसेंबरच. जेवण चालू असताना थोडीफार रेंज होती मग स्वप्न्याला फोन केला तर आमदार साहेब तिकडं फलटणला झोपायची तयारी करत होते. या ट्रेकला न आल्यामुळं सगळ्यांनी आधी स्वप्न्याला शिव्या घातल्या आता घरी आहे म्हंटल्यावर स्वप्न्या कुठलं उलट शिव्या देतोय मग अजून चार शिव्या जास्त घातल्या अन दिवसभरातली सगळी तंगडतोड कळवली आणि पंक्याचा शूजचा किस्सा रॉक पॅचला घाबरून परतीची वाट धरण्याचा किस्सा सागून धर पंक्याला बोल म्हणून दिल दोघात जुंपून. जेवणं उरकून सगळे टेन्टकडे निघालो.


आकरा वाजत आले होते थंडीनं चांगलाच जोर धरला होता मग सगळे शेकोटी पेटवून बसलो. सकाळपासून केलेली तंगडतोड, जुन्या मोहिमांचे किस्से, जुन्नर तालुक्याला लाभलेली गडकिल्ल्यांची देणगी अन तिथं घडलेला इतिहास याच परिसरात शिवजन्माच्यावेळी शहाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रम असा सगळा इतिहासाचा जागर करत चर्चा रंगायला सुरवात झाली तर तिकडं लांबवर घाटगर, आटपाळे गावात थिर्टीफस्टच्या पार्टीमध्ये चढलेला डीजेचा आवाज इकडं गडापर्यंत येत होता. सकाळी चावंड दुपारी कुकडेश्वर, नाणेघाट अन संध्याकाळी जीवधन अता एवढी तंगडतोड केल्यानंतर पायांना आता ओढ लागली होती ती तंबूत जाऊन पडी देण्याची. सह्याद्रीच्या कुशीत पहुडण्याची मज्जाचं वेगळीये एकदा का पाठ ह्या काळ्या कातळाला टेकली कि सगळा थकवा कुठल्या कुठं निघून जातो अन सह्याद्री त्याच्या कवेत आपल्याला सामावून घेतो. सकाळचा नजारा डोळ्यात सामावण्यासाठी आधी झोपताना पूर्व दिशा कुणीकडं येते फक्त एवढं बघून ठेवायचं. सूर्या शेठला नाणेघाटाच्या माथ्यावरून अस्ताला जाताना बघितलं होत म्हणजे आता सकाळी सूर्या शेठ घाटगर गावाकडून उगवणार. टेन्ट मध्ये जाऊन पाय पसरल्यानंतर झोप कधी लागली कळलं नाही मग कसलं न्यू ईअर अन कसलं काय सकाळी उठल्यावर विक्यानं सांगितलं खालच्या गुहेतली पोरं आली होती विश करायला.

जीवधनवरील गुहा 

सकाळी मी अन विक्या लवकर उठलो शशी, शुभम, पंक्याला उठवलं पण उठायला कोणी तयार न्हवतं साडेसहा वाजत आले होते आता कुठं तांबडं फुटू लागलं होतं अजून सूर्योदयाला वेळ होता म्हणून मी आणि विक्या गड पाहण्यासाठी निघालो. रात्री नुसता अंधार असलेल्या धान्य कोठारात आधी जायचं ठरवलं. हि जागा नेमकं कशासाठी वापरली जात असावी हे कळत नाही कारण याची रचना पहिली तर घरासारखी आहे.

वरती दारात कमळाचे फुल कोरलेले आहे तर दाराच्या कमानीवर दोन पूर्णाकृती हत्ती शिल्प व मधोमध लक्ष्मी शिल्प कोरलेले आहे आणि त्याखालोखाल केलेले नक्षीकाम पाहायला मिळते. दारातून आतमध्ये गेल्यानंतर मोठी खोली आहे त्यालाच लागून डाव्या व उजव्या हाताला दोन मोठ्या खोल्या आहेत गावकरी यालाच कोठी म्हणतात. हे सगळं बांधकाम कातळात खोदकाम करून केलेले आहे. १८१८ साली झालेल्या शेवटच्या मराठा इंग्रज युद्धामध्ये हि कोठारे पेटवून दिली गेली उसळलेल्या आगडोंबामुळे इथली सगळी संपत्ती बेचिराख झाली त्या आगीची राख अजूनही इथल्या भिंतींवर पहायला मिळते. आजही २०० वर्षांनंतर त्या कातळ भिंतींना चिटकून राहिलेली हि राख मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची साक्ष आहे. कोठारातून बाहेर पडून पुन्हा गडफेरी साठी निघालो सूर्य आता सह्याद्री मंडळ सजवू लागला होता. समोरच्या डोंगराच्या पलीकडून उगवणारा सूर्य लांबवर पसरलेल्या माणिकडोह जलाशयाच्या पाण्यावर आपल्या किरणांनाचा वर्षाव करत होता. सह्याद्री म्हणजे अशी जागा जिथं सूर्यनारायण सुद्धा आपल्या रंगांची उधळण करण्यासाठी आतुर असतो. इथं वातवरणात पसरलेलं पिवळं सोन अन त्यात नाहून निघणारा सह्याद्री म्हणूनच तर म्हणतो आम्ही जिवंतपणी स्वर्ग जगतो तो इथेच. डोळे भरून हा सगळा नजारा जगल्यानंतर सह्याद्रीवर पसरलेल्या रंगछटा कॅमेऱ्यात कैद करून घेतल्या.

स्वर्ग...

तो पर्यंत इकडं सगळी पोर उठली होती. गड बघून झाल्यानंतर पुन्हा चूल पेटवली. आमच्या प्रत्येक ट्रेकला रात्री केलेल्या भाताचं रूपांतर सकाळी बिर्याणीत करायची पद्धतच आहे कारण मुदपाकखाण्याचा आदेशच आहे काय शिल्लक ठेवायचं नाही सगळं मिक्स करून दाबून हाणायचं. पोटपूजा उरकून सगळी आवराआवरी करून गड उतरू लागलो. दरवर्षीप्रमाणे यावर्षाचीही सुरुवात पारुषीचं झाली. तासाभरात गड उतरून पायथ्याला आलो. उतरताना जंगलाचा टप्पा झाल्यानंतर माजलेल्या कुसळातून वाट काढत गाडीच्या दिशेने चालू लागलो. आता आस लागली होती हडसरची उर्फ पर्वतगडाची त्यामुळं सफारी पुन्हा डौलानं भगवे फडकवत पुढचा गड जवळ करायला सज्ज होती. पुढे जुन्नर गाठून हडसरचा मार्ग धरला. या संपूर्ण प्रवासात कुकडी नदीवर बांधलेल्या माणिकडोह धरणाचा विस्तृत जलाशय आमच्या सोबत होता त्यामुळं चांगली जागा बघून घरणात डुबकी मारायचं ठरलं. जुन्नरच्या पुढे वाटेत बिबट निवारण केंद्र आहे. बिबट्या बघावा म्हणून तिथं थोडा वेळ थांबलो पण आतमध्ये जायची परवानगी नसल्यामुळे गेट वरूनच बिबट दर्शन करून पुढची वाट धरली. हडसरच्या पर्वतगडाची प्रचंडता लांबूनच नजरेस येत होती. हडसर गडावर जाण्यासाठी दोन वाट आहेत एक खिळ्याची वाट आणि दुसरी हडसर गावातून घळीतून जाणारी वाट. दुपारचा एक वाजत आला होता गावात वाट विचारून आम्ही घळीच्या वाटेने गड चढायला घेतला.

हडसर गावातून दिसणारी घळीची वाट 

हडसर गडाची निर्मिती सातवाहनकालीन आहे. नाणेघाटाच्या संरक्षणसाठी असलेल्या गडांपैकी एक किल्ला म्हणजे हडसर उर्फ पर्वतगड. काही वझं घेऊन चढायचं नसल्यामुळे निवांत सगळे गड चढू लागलो. तासाभराची चढाई करून वर आल्यानंतर खिंडीत खोदलेल्या पायऱ्यांजवळ वाट येऊन पोहचते. दगडात बांधून काढलेल्या ह्या शंभर एक पायऱ्या वर येई पर्यंत सगळ दम काढतात. वर आल्यानंतर एक वाट शेजारच्या पठारावर जाते तर एक वाट गडाच्या मुख्य दारा जवळ जाते. चढताना गडाने झेललेल्या तोफांच्या माऱ्याच्या खुणा स्पष्ट दिसतात. ह्या पडलेल्या भिंती, पडके बुरुज मावळ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची साक्ष देत इथला दगड अन दगड स्वराज्यासाठी झिजलाय याची जाणीव करून देतात. पायऱ्या चढून पुढे गेलं कि काताळात घडवलेला दरवाजा आपलं स्वागत करतो. गडाच्या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे कातळाच्या आड दडून असलेला दरवाजा संपुर्ण गड चढून आल्याशिवाय नजरेस पडत नाही. दरवाजाच्या दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत तिथून पाच सहा पायऱ्या चढून गेल्यावर आम्ही गडाच्या माथ्यावर पोहचलो. इथून पुढे महादेव मंदिराकडे जाताना मोठा तलाव लागतो या तळ्यात थोडं फार पाणी शिल्लक होत त्यामध्ये भरपूर कमळं फुलली होती. तळ्याच्या मधोमध एक पडझड झालेले अवशेष आहेत हे पाहून झाल्यावर सगळे महादेव मंदिराकडे निघालो. मंदिराचे काम केल्यामुळे ते जास्त पुरातन वाटत नाही मंदिरासमोर दारातच नंदी आहे. उंबरठ्यावर किर्तीमुख पाहायला मिळते तर वरती चौकटीवर गणेश शिल्प कोरलेले आहे. मंदिराच्या सभामंडपात एका बाजूला हनुमान मूर्ती तर दुसरीकडे गरुडमूर्ती आणि गणेश मूर्ती आहे तर गर्भगृहात महादेवाची पिंड आहे.

महादेव मंदिर, किल्ले हडसर उर्फ पर्वतगड 

तिथून पुढे गडफेरीसाठी आम्ही निघालो. गडाचा पसारा मोठा असल्याने मोठ्या प्रमाणत सपाट प्रदेश आहे त्यामुळे गावकरी त्यांची जनावरे चरण्यासाठी गडावर घेऊन येतात. जळण, चारा, गडावरच्या टाक्यात, तलावात असणारे पाणी यांची गावकऱ्यांना मदत होते. शिवकाळात स्वराज्य राखत पायथ्याच्या गावातल्या रयतेला आपल्या कुशीत सामावून घेत आधार देणारे हे गडपुरुष आजही ३५० वर्षांनंतर रयतेला आधार देत आहेत. मंदिरापासून पुढे आल्यानंतर दगडात घडवलेली गणपतीची मूर्ती दिसली. आखीवरेखीव असलेली हि मूर्ती उजाड अवस्थेत पडून आहे. मूर्तीच्या सोंडेखालच्या भागला तडा गेला आहे. सह्याद्रीतल्या प्रत्येक गडावर वेगवेगळ्या आसनात विराजमान झालेले गणराज पहायला मिळतात. गडावर वर्षानुवर्षे ऊन, वारा, पाऊस झेलत अनेक राजवटी पाहिलेले गडगणेश आपले ऐतिहासिक अस्तित्व टिकवून आहेत. समोरच निमगिरी दिसत होता ह्या मोहिमेत हा गड सामील केला न्हवता पण सकाळी जीवधन वरून निघाल्यावर ठरवलं होत कि वेळ असला तर निमगिरी किल्ला करून जायचं पण हडसरलाच चार वाजत आले होते आणि आम्ही अजून गडावरच होतो त्यामुळं निमगिरीचा प्लॅन थोडा साईडला ठेवला.

गडगणेश

हडसर आडवाटेवरला किल्ला असल्यामुळे गडावर फारसं कोणी फिरकत नाही त्यामुळं हवा तसा गड पाहायला मिळतो. गड बघून झाल्यांनतर परतीच्या मार्गाला लागलो. अर्ध्याच तासात गड उतरून पायथ्याला आलो आता ओढ लागली होती ती फक्त पाण्यात उडी हाणायची मग हडसर गावाच्या पुढं आल्यावर लहान पोर भेटली त्यानं विचारला पावायला चांगली जागा कुठंय मग सरळ पोरांनी सांगितलेल्या दिशेनं गाडी दिमटवली ती धरणाच्या पाणवठ्याकडे तर इकडं मध्येच वरच्या लाईटीच्या तारा बघून पंक्याचा इंजिनिअरिंगचा कीड वळवळला HT लाईन HV लाईन कंडक्टर असलं काय काय सांगत होता कुठलं कोण लक्ष देतंय इथं दोन दिवस अंघोळ न्हवती कोणाची त्यामुळं समोर दिसत होता तो फक्त अभेद्य सह्याद्रीच्या मधोमध अथांग पसरलेला शहाजीसागर जलाशय. गाडी लावून पटकन कपडे काढून सगळी पोर पाण्याकडं पळाली. जरवेळी पावायला न येणार कोण ना कोण संग असोतयच यावेळी होता तो पंक्या मग काय बाहेर थांबून फक्त आमचे फोटो काढायचं काम भावावर सोपवलं. आमच्यात पट्टीतलं पवणारी दोन गाबडी म्हणजे एक ईक्या अन दुसरा शुभम हि दोघ आघाडीवर, मी आणि शशी त्यांच्या मागं मागं आधी वाटलं दिसभराच्या उन्हामुळं पाणी काय नॉर्मल असल पण पाण्यात उतरल्यावर करंट मारल्यासारख्या झिणझिण्या आल्या अंगाला पाणी एकदम थंडगार पण पाण्यात उतरल्या उतरल्या दोन दिवसांचा शिणवटा कुठल्या कुठं निघून गेला.

माणिकडोह उर्फ शहाजीसागर जलाशय 


पाच वाजत आले होते पोहून झाल्यानंतर निमगिरी होईल का याचा जरा विचार केला पण वेळ कमी होता व एक दिवस अजून मुक्काम वाढला असता त्यामुळे निमगिरी पुढच्या मोहिमेसाठी राखून ठेवला. आम्ही केलेल्या नियोजनाप्रमाणे दोन दिवसात या जुन्नर मोहिमेतील चावंड, जीवधन, हडसर हे ३ किल्ले नाणेघाट, कुकडेश्वर मंदिर सगळं कस वेळेत पद्धतशीर पणे बघून म्हणण्यापेक्षा जगून झाल होत कारण सह्याद्री बघण्याचा नाही तर जगण्याचा विषय आहे. पोहल्यावर आता लवकरात लवकर पोटातल्या भट्टीत लागलेली आग विझवायची होती त्यामुळं सगळं उरकून वाटेत जाताना शहाजीसागर जलाशय उर्फ माणिकडोह धरणाचे उघडलेले दरवाजे बघून परतीचा मार्ग धरला. नेहमीच्याच मंचरच्या ऑल टाईम बेस्ट उंबर ढाब्यावर पोटाची भट्टी विझवली व समोरच असलेल्या महेश खवा केंद्रावर दोन दोन ग्लास बासुंदी मारून घराची वाट धरली. जुन्नरची भटकंती हि एक दोन दिवसात उरकणारी नाही त्यामुळंच निसर्गाने नटलेल्या व तितकाच इतिहास संपन्न असलेल्या जुन्नर मोहिमेची पुन्हा एकदा आखणी करायचं ठरलं आणि मग त्यात नारायणगड, निमगिरी, सिंदोळा हे राहीलेले किल्ले करायचे. ह्या दोन दिवसाच्या भटकंतीत भरपूर काही जगायला मिळालं थर्टी फस्टला झिंगून गेलेल्या सिमेंटच्या जंगलापासून दूर जिवलगांसोबत सह्याद्रीच्या सानिध्यात इतिहास उलगडणाऱ्या आड वाटा जगायला मिळाल्या. सकाळी वातावरणात पसरलेलं पिवळं सोन अन सूर्याने सह्याद्रीवर उमटवलेलेया रंगछटा तर कुकडेश्वरची दगडात जीव ओतून घडवलेली कलाकुसर पहायला मिळाली तर तिकडं अथांग पसरलेल्या शहाजी सागराभोवती दिवसा उन्हानं राकट, कणखर वाटणारा पण रात्रीच्यावेळी घोंगावणारा वारा अंगावर झेलत निद्रिस्त झालेला सह्याद्री अनुभवायला मिळाला.
जिवलगांची नाव सरळ सरळ घेण्यात काय मज्जा नाही विक्या पंक्या म्हंटल कि कसं आपल्या माणसाला हाक मारल्या सारखं वाटतंय. हि वरची सगळी इरसाल पात्र अन त्यांची ही नीट पद्धतशीर नावं -
विक्या, ईका, पवार साहेब म्हणजे विकास पवार
स्वप्न्या, आमदार साहेब, जाड्या म्हणजे स्वप्नील ननावरे
करण अर्जुनची जोडी म्हणजे शशी पवार, शुभम पवार
काका, पंक्या म्हणजे पंकज गायकवाड

आणि मी म्हणजे मी.

वारी गडकोटांची परिवार

गणराज व नानाचा अंगठा 

सह्याद्रीतली माणसं...

सूर्योदय थेट छावणीतून 

हडसरचा दुसरा दरवाजा आणि पहारेकऱ्यांच्या देवड्या 

किस्सा जंगलातला

सह्याद्रीतलं पिवळं सोनं

जीवधनचा गोमुखी कल्याण दरवाजा 



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

रणसंग्राम फोंड्याचा, किल्ले फोंडा, गोवा

आमचं राजं छत्रपती झालं...!

संडे भटकंतीनामा - ऐतिहासिक सासवड नगरी व सरदार पानसे वाडा