किल्ले रोहिडा व रायरेश्वर पठार

स्वातंत्र्यदिन मोहीम किल्ले रोहिडा व रायरेश्वरच पठार
१५ ऑगस्ट २०१७
राहून गेलेला रोहिडा रायरेश्वरचा ब्लॉग

सह्याद्री, इथं येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या सौंदर्याची भुरळ तर पाडतोच पण पावलोपावली इथं घडलेल्या इतिहासाची साक्षही देतो. गगन भेदू पाहणारा सह्याद्री, रयतेच्या स्वतंत्र्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांचा पराक्रम ही कसा उत्तुंग व अफाट आहे याची जाणीव करून देतो. परकीय आक्रमणांना उधळून लावत ज्या गडकोटांच्या छायेखाली सह्याद्रीच्या पदरात हे स्वराज वाढलं ते गडकोट सुद्धा स्वातंत्र्याची प्रतीके आहेत. त्यामुळे नेहमी प्रमाणे यंदाचाही स्वातंत्र्यदिन सह्याद्रीत साजरा करून हॅट्रिक साधायची होती पण जून जुलै मधेच रायगड, हर्णे बंदर, फत्तेगड, तिकोना अशी भटकंती झाल्यामुळे १५ ऑगस्ट साठी घरून परवानगी भेटेल याची खात्री न्हवती त्यामुळे कोणतही प्लानिंग केलं न्हवतं. पण तरी जवळच अगोदर पुरंदर जायचं ठरलं पण निलेश बोलला पोर लांब जायला नको म्हणतायत मग वाटलं यावेळी अता कात्रज लेकवरच समाधान मानावे लागेल की काय पण सकाळी ८ ला परत विक्याला फोन केला कुठं जायचं तर म्हंटला सर्दीने जाम झालोय आणि किल्यावर जायचं म्हंटल तर दोघेच आहोत काय करायचं आणि उशीर झाल्यामुळे जवळचा कोणता किल्ला करायचा हे ठरतं न्हवतं, मग काय जून मध्ये रायगडाहून येताना भोर मधून दिसलेला रोहिडा उर्फ विचित्रगड अचानक क्लिक झाला थोडी पुस्तकं व गुगल चाळल आणि जवळच्याच रायरेश्वरलाही आजच्या भटकंतीत सामील करायचं ठरलं.


पण अता दोघांसाठी सगळ्यात मोठा Rock patch होता घरून परवानगी घेण्याचा पण तोही लिलया सर झाला कारण त्यांनाही माहित आहे यांना काय घरात स्वस्थ बसवत नाही. स्वप्नया तयार झाला पण आमदार साहेब थोडं कामात असल्यामुळे बोलले १२ ला निघू पण मग खूप उशीर होईल म्हणून दोघेच जायचं ठरलं. कोणत्याही मोहिमेसाठी ७-८ जण फिक्स असतात, आजपर्यंत कमीत कमी ४ जण तरी असायचो पण आज मात्र ऐनवेळी सगळ्यांनीच कलटी टाकली त्यामुळे काही झालं तरी आजचा स्वातंत्र्यदिन रोहिड्यावर करायचाच होता त्यामुळे दोघेचं निघालो. विक्या आणि मी फक्त दोघांनीच किल्ला करण्याची ही पहिलीच वेळ अन तेही 2 व्हीलरवर त्यामुळे सह्याद्रीची सफारी घडवून आणणाऱ्या सफारीची आठवण येणार हे नक्की होत. सकाळी १०:३० ला घरून निघून दुपारी १ वाजता भोर मार्गे रोहिड्याच्या पायथ्याला बाजारवाडीत पोहोचलो.


    महाबळेश्वरच्या डोंगर रांगेवर वसलेला किल्ला म्हणजे रोहिडा उर्फ विचित्रगड उर्फ बिनीचा किल्ला. किल्यावरून संपुर्ण भोर प्रांतावर लक्ष ठेवता येते. १६५६ साली रोहिडा बांदल देशमुखांकडून महाराजांनी स्वराज्यात सामील केला बाजीप्रभू देशपांडे बांदलांचे मुख्य कारभारी होते या लढाईनंतर बाजीप्रभू स्वराज्यात सामील झाले. पुन्हा १६६६ ला पुरंदरच्या तहात गड मोघलांच्या ताब्यात गेला व परत १६७० गड मावळ्यांनी स्वराज्यात सामील केला. गडाची चढाई तशी काही फारशी अवघड नाही पावसाळा होता पण पाऊस न्हवता पण अचानक येणारे काळे ढग आणि सुटलेला भररार्ट वारा सर्दी झालेल्या पवार साहेबांची काळजी वाढवत होता. ऑगस्ट म्हणजे सह्याद्री भटकण्यासाठीचा सुवर्णकाळ श्रावणसरी सरल्या की सह्याद्री हिरवा शालू पांघरून सज्ज असतो असंच काहीसं रूप गड चढताना बघायला मिळत होत. त्या एका डोंगर दांडेवरून जाणारी गडाची वाट अन पसरलेल्या हिरव्या गालीछ्यातुन मुंग्यांसारखी रांग करून वाट काढत जाणारी माणसं.


        पायथ्याच्या बाजारवाडी गावातून गडावर जाण्यास १:३० तास लागतो. वारी गडकोटांची परिवाराचं धोरणंच आहे पोटासाठी कितीही ओझं घेऊन चढू पण खायला कुठं कमी पडता कामा नये. इथं पाठीवर जास्त काही ओझं न्हवत पण तरीही सोबत आणलेला चकली, चिवडा, बिस्किटे त्यात पण व्हरायटी क्रीम, साधे, नारळाच्या फ्लेवरच बिस्कीट असा सगळा शाही थाट करत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून चढत गडाचा पहिला दरवाजा गाठला. गडाचा घेरा लहान असल्यामुळे व्यवस्थीत संपूर्ण गड पाहायला १ तास पुरतो तटबंदीे काही ठिकाणी शिल्लक आहे तर गडाचे ६ बुरुज मावळ्यांच्या वैभवशाली पराक्रमाची साक्ष देत दिमाखदार शैलीत उभे आहेत. ३ दरवाजे पार केल्यावर आपण गडमाथ्यवर येतो इथे तिसऱ्या दरवाज्यावर डाव्या व उजव्या कोपऱ्यात मराठी व फारसी भाषेत शीलालेलख कोरलेला आहे. या वरून समजते की मोहम्मद आदिलशाहने गडाची दुरुस्ती केली होती. याचा शिलालेखाच्या शेजारी दोन सुरेख हत्ती शिल्प कोरण्यात आली आहेत. गडावर आल्यानंतर आशा वास्तू डोळ्यांखालून घालून अभ्यासणे म्हणजेच डोळस भटकंती.


गडावरील वास्तू व हिरवाईने नटलेला भोवतालचा पसिसर कॅमेऱ्यात कैद केला. आभाळाला गवसणी घालणारा सह्याद्री असल्यावर अनत्यात आपले फोटो काढायला विक्या असेल तर विषयच नाही आमची युती फक्त एकाच वाक्यावर होते तू माझे फोटो काढ मी तुझे काढतो अस करत करत फक्त दोघांचे मिळून ३.५ जीबी फोटो कधी झाले कळलंच नाही. पुढे गडफेरीसाठी गेल्यावर वाटेत चुन्याचा घाणा लागतो. रोहिडेश्वरच्या मंदिरा शेजारी बालेकिल्ल्याचे अवशेष दिसतात. किल्याचा घेरा लहानच पण त्यात चुन्याचा घाना, तटबंदीला लागून असलेला दिंडी दरवाजा, एकाच रांगेतील भली मोठी कातळ कोरीव टाकी, रोहिडमल्ल मंदिर तसेच आम्ही अजूनही शत्रूशी दोन हात करायला तयार आहोत असं सांगणारे शिरवले बुरुज, पाटणे बुरूज, दामगुडे बुरुज, वाघजाईचा बुरुज, फत्ते बुरुज, सदरेचा बुरुज अशे सहा भरभक्कम बुरुज अन थेट रायरेश्वर पासून महाबळेश्वर पर्यंत अन इकडं राजगड तोरण्या पर्यंतचा अफाट सह्याद्री नजरेत साठवायला मिळणं म्हणजे आमच्यासारख्या भटक्यांसाठी पर्वणीच.


स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांची शौर्यगाथा आभाळा एवढी किती अफाट आहे हे सांगत असमानता फडकणाऱ्या तिरंग्याखाली गारद देऊन गड उतरू लागलो तिथंच ८-१० वर्षाच्या ताई व दादाची भेट झाली एवढा दिड-दोन तासाचा ट्रेक करून हे छोटे मावळे आई वडिलांसोबत आले होते हे पाहून सकाळी लय लांब नको जायला म्हणणाऱ्या आमच्या पोरांची आठवण झाली त्या छोट्यांनाही तिरंग्या सोबत फोटो काढायचा मोह आवरता आला नाही.


गर्दी नसल्याने हवा तसा गड पाहिला त्यामुळे बॅटरी फुल चार्ज झाली व रायरेश्वरची आस लागल्याने bear greylls style मध्ये अर्ध्या तासात गड उतरला. रोहिडा ते रायरेश्वर ३५ किमी अंतर आहे आणि त्यात रस्ता माहीत नसल्याने जाऊ की नको ही धकधक मनात कारण ४ ला रोहिड्याचा पायथ्याला पोहोचलो रायरेश्वर करायचा म्हंटल तर उशीर होणार ही माहीत होतं तरी बघू पुढचं पुढे म्हणत रस्ता विचारत विचारत गाडी रायरेश्वराच्या दिशेने दमटावून संध्याकाळी ५:३० ला रायरेश्वरला पोहचलो तर वाटेत आंबवडे गावात कान्होजी जेधे, जिवा महाले यांची समाधी व ब्रिटिशकालीन झुलता ब्रिज लागतो पण उशीर झाल्यामुळे थेट रायरेश्वर गाठायचं ठरवलं पुढे कोरले ते रायरेश्वर ६ किमीचा अतिदुर्गम घाट लागतो तिथून अगदी जवळच डावीकडे रौद्ररूप धारण करून गांधी टोपीच्या आकारासारखा दिसणारा केंजळगड तर उजवीकडे हिरवी झालर पांघरन दाट धुक्यात हरवलेल्या रायरेश्वराचे दर्शन घडते. पुढे एक वाट केंजळगड कडे जाते तर दुसरी रायरेश्वरच्या लोखंडी शिड्यांजवळ जाते.

     १५ मिनिटांची चढाई करून लोखंडी शिड्यावरून रायरेश्वरच्या पठारावर पोहोचता येते. रायरेश्वर म्हणजे पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही विस्तृत असं, ७ रंगांची माती आढळणारं, जिथं भरतो सह्याद्रीचा फुलोत्सव या साऱ्या नैसर्गिक सौंदर्या सोबत इथं घडलेल्या इतिहासाची देखील भुरळ पडते व प्रश्न पडतो एक १५ वर्षांचा मुलगा लालमहालातील आयशोआराम सोडून या कडेकपारीत कशाला आला असेल तर रयतेला होणाऱ्या हालअपेष्टा परकीयांच्या जाचातून होणारा त्रास व मातृभूमीवर झालेले आक्रमण यातून ही भूमी स्वतंत्र करून रयतेच स्वराज्य झालं पाहिजे हे त्या लहानग्या शिवबाने जाणलं होत म्हणूनच आपल्या सवंगड्यांसह महाराजांनी शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताची धार धरून स्वतंत्र स्वराज्याची शपथ घेतली व १२०० वर्षाचा अंधकार दुरु करून रयतेच राज्य निर्माण केलं अन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच त्या पिंडीवर नतमस्तक होण्याचं भाग्य आज आम्हाला लाभलं.


रायरेश्वरच पठार अंदाजे हे अडीच ते तीन हजार एकरावर पसरले आहे मंदिराचे पुजारी जंगम यांनी सांगितलं तीन हजार एकर पेक्षाही जास्तच आहे. धुक्यात हरवलेल्या पठारावर पांढऱ्या निळ्या पिवळ्या रंगाची विविध फुल पसरली आहेत पाऊस आणि धुके नसतील तर सह्याद्रीचा फुलोत्सव इथं पहायला मिळतो. त्यामुळेच कास पठारची इच्छा पण इथं पूर्ण झाली. पुजाऱ्यांसोबत भौगोलिक व स्थानिक राजकीय चर्चा करणयातच संध्याकाळचे ७ वाजले अन त्यात सह्याद्रीची माणसं म्हंटल्यावर चर्चा थांबत्यात कुठल्या अता यावेळेला रायरेश्वर सोडणारे आम्ही दोघेच होतो पण आजवर जी काही भटकंती केली त्यात आम्हला आत्मविश्वास व ऊर्जा देणारा एकमेव मंत्र म्हणजे सह्याद्री असे पाठीराखा अन शिवराय असे शक्तीदाता. त्यामुळे कितीही उशीर झाला तरी चिंता कसली. रात्री घरी पोहचायला १२ वाजले पण झोपतांना डोळे बंद केले की आजच्या भटकंती चित्र नजरेसमोर धावू लागली. त्यात एक गोष्ट मनात राहून गेली की लवकर निघालो असतो तर केंजळगड व स्वराज्यासाठी खर्ची पडलेले शिलेदार कान्होजी जेधे व जिवा महाले यांची समाधी पाहता आली असती पण असो असे unplanned trek चं पुढच्या भटकंतीसाठी नवी ऊर्जा देतात.

  






Comments

Popular posts from this blog

रणसंग्राम फोंड्याचा, किल्ले फोंडा, गोवा

आमचं राजं छत्रपती झालं...!

संडे भटकंतीनामा - ऐतिहासिक सासवड नगरी व सरदार पानसे वाडा