जावं सह्याद्रीत...!

सह्याद्री म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आणि इथले गडकिल्ले म्हणजे त्या विद्यापीठातील विषय. सह्याद्रीच्या या दऱ्या खोऱ्यात पाऊल पडलं कि आपसूकच हे विद्यापीठ आपल्याशी बोलू लागत अन इथले विषय असलेले गडकिल्ले इथं घडलेल्या इतिहासातून प्रेरणा देत आलेल्या आव्हानांना कसं सामोरं जायचं यासोबत आयुष्य जगण्याची कला शिकवतात. जावं त्या सह्याद्रीच्या कुशीत धरावी ती गडाची आडरानातली अनवट वाट अनुभवावी ती पाय जड करणारी चढण. जावं सह्याद्रीत त्या कडेकपारीतून घुमणारा शिवनामाचा गजर ऐकून व्हावं तृप्त. जावं सह्याद्रीत त्या बेलाग कातळ कड्यांशी सलगी करायला अनुभवावा त्या राकट कड्यांमधून ओघळणारा मायेचा पाझर. जावं सह्याद्रीत पहावी ती सूर्यनारायणान सूर्योदय अन सूर्यास्ताला मुक्त हस्ते केलेली रंगांची उधळण. जावं सह्याद्रीत कराव्यात गुजगोष्टी सह्याद्रीचा अनमोल दागिना असणाऱ्या त्या गडकोटांसोबत. कधी काळी गजबजून गेलेला गड आज ओस पडलाय गडावर गेल्यावर इथं घडलेल्या इतिहासाशी एकरूप झालं कि हेच ओस पडलेले दगड धोंडे आपल्याशी बोलू लागतात. गडावर गेल्यावर ठेवावा माथा त्या महाद्वाराच्या पायरीवर मायबाप जाणत्या राजाच्या ...